पनवेल : पनवेल खारघर उपनगरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या सेक्टर २७ येथील रांजणपाडा गावात मागील तीन दिवसांपासून दूषित पाण्यामुळे तोंडातून उलट्या, जुलाब आणि पोटदुखी या आजारांमुळे गावकरी हैराण झाले आहेत. गावकऱ्यांसह या सेक्टरच्या परिसरातील अनेक गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये रहिवासी सुद्धा दूषित पाण्याच्या तक्रारी करत आहेत. पनवेल महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने याची गंभीर दखल घेऊन या परिसराला पाणी पुरवठा करणारी मुख्य जलवाहिनीवरील जलजोडणी रद्द करुन नवीन जलवाहिनी टाकण्याचे काम हाती घेतले आहे.

रांजणपाडा गावातील उमेश चौधरी यांनी दिलेल्या माहितीनुसार चार दिवसांपासून दूषित पाण्याचा त्रास नागरिकांना होत आहे. गावातील आणि शेजारच्या सोसायट्यांमधील अनेक कुटुंबांमध्ये मलमिश्रीत पाण्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. या बाधित रुग्णांमध्ये लहान मुले, महिला, पुरुष आणि ज्येष्ठ नागरिकांचा समावेश आहे. गावातील अनेक नागरिकांची तब्येत दिवसांदिवस बिघडत आहे. ज्यांची परिस्थिती आहे ते डॉक्टरांचा सल्ला घेत आहेत. तर गावातील आर्थिक दुर्बल घटक श्रेणीतील कुटूंब मेडिकल दूकानातून जुलाब आणि उलट्या थांबविणारी औषधे खरेदी करुन वैद्यकीय उतारा शोधत आहेत. दूषित पाण्यामुळे शरीरातील द्रवपदार्थांची कमतरता जाणवत असल्याने गावालगतच्या मेडिकल दूकानातून इलेक्ट्रोल पावडरची मागणी अचानक वाढली आहे.

गावातील पाणी पुरवठ्यामध्ये मलमिश्रीत पाणी शिरल्याने ही स्थिती झाल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. या दरम्यान रांजणपाडा गावकऱ्यांनी महापालिका प्रशासनाकडे जलवाहिनी दुरुस्ती, तातडीने स्वच्छ पिण्याचे पाणी पुरवठा आणि तरल मलनि:सारण यंत्रणा व्यवस्थित करण्याची मागणी केली आहे. तब्येतीप्रमाणे गावात मोबाइल व्हॅनव्दारे आरोग्य सेवा तातडीने देण्याची कार्यवाही पालिकेने द्यावी अशी मागणी येथील रहिवाशांकडून होत आहे.पनवेल महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने या घटनेची गंभीर दखल घेत गावाला पाणी पुरवठा कऱणारी ६ इंच व्यासाची जलवाहिनीतून होणारा पाणी पुरवठा बंद करुन गावातील मुख्य जलवाहिनीवरील जलजोडण्या इतर जलवाहिनीवर वळवल्या आहेत. तसेच पाच मजूरांचे पथक मंगळवारपासून नेमकी कुठे जलवाहिनीला गळती आहे का याचा शोध घेतल्याची माहिती पालिकेचे उपअभियंता विलास चव्हाण यांनी दिली.

पनवेल महापालिकेकडे रांजणपाडा गावामध्ये दूषित पाणी पुरवठ्याची तक्रार आल्यावर तातडीने पाणी पुरवठा विभागाला नेमका कुठून पाणी गळती आहे ते शोधण्याचे आदेश दिले आहेत. तसेच तेथील रहिवाशांना तातडीने टँकरमार्फत शुद्ध पाण्याचे वाटप केले जाईल अशा सूचनाही प्रशासनाला दिल्या आहेत. पालिकेच्या फिरत्या वैद्यकीय मोबाइल व्हॅनव्दारे नागरिकांना उपचार व औषधे पुरवली जातील- मंगेश चितळे, आयुक्त, पनवेल महापालिका