रबाळे येथील पोलीस शिपाई बेपत्ता झाल्याची घटना ताजी असताना आता सानपाडा येथे कार्यरत असणाऱ्या अन्य एका पोलीस कर्मचाऱ्याने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. आत्महत्येचे कारण अद्याप समोर आले नासले तरी कौटुंबिक तणावातून आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
स्वप्निल लोहार असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. स्वप्नील हे सानपाडा पोलीस ठाण्यात पोलीस शिपाई पदावर कार्यरत असून त्यांनी उलवा येथील राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केल्याचे आज समोर आले आहे. एवढ्या पस्तीशीचे असणाऱ्या पोलीस शिपायाने अशा पद्धतीने आपले जीवन संपवले म्हणून परिसरात आणि पोलीस वर्तुळात हळहळ व्यक्त केली जातं आहे.
स्वप्नील यांचा विवाह काही वर्षांपूर्वी झाला असून त्यांना एक मुलगाही आहे. ते राहण्यास उलवा येथे असून सानपाडा पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. काही दिवसापूर्वी त्यांची पत्नी आणि मुलगा गावी गेले होते. सध्या ते घरात एकटेच राहत होते.
गुरुवारी पहाटे दोनच्या सुमारास त्यांचे त्यांच्या पत्नीशी फोन वर बोलने झाले काही वादातून त्यांनी आता मी आत्महत्या करतो असे रागात म्हटले. अडचणीच्या वेळी कामाला येईल म्हणून स्वप्नील यांनी त्यांच्या काही सहकार्याचे मोबाईल क्रमांक पत्नीला दिले होते. त्यामुळे स्वप्नील यांच्या पत्नीने घाबरून ही बाब स्वप्नील यांच्या एका सहकार्याला फोन करून ही माहिती दिली.
ही माहिती उलवा पोलिसांना मिळताच त्यांनी तात्काळ स्वप्नील याच्या राहत्या घरात पथक पाठवले. स्वप्नील दरवाजा उघडत नसल्याने पोलिसांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता स्वप्निल गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. या घटनेची नोंद उलवा पोलिसांनी घेतली असून पुढील तपास सुरु आहे. अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्जुन राजने यांनी दिली.