नवी मुंबई : नवी मुंबईतील पामबीच मार्गालगत पाणथळ जागांच्या ठिकाणी दुर्मीळ पक्ष्यांच्या छायाचित्रणास आलेल्या हौशी पर्यटक आणि छायाचित्रकारांना खासगी विकसकांच्या सुरक्षा यंत्रणा मज्जाव करत केल्याने याविषयी तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. या पाणथळ जागा निवासी संकुलांसाठी खुल्या करण्याचा सरकारी यंत्रणांचा प्रयत्न यापूर्वीच वादात सापडला आहे.
हेही वाचा >>> नवी मुंबई महानगरपालिकेचे मोरबे धरण काठोकाठ भरले!
फ्लेमिंगो तसेच अन्य दुर्मीळ पक्ष्यांचा हा अधिवास बिल्डरांच्या घशात जाऊ नये यासाठी नवी मुंबईतीलच नव्हे तर राज्यभरातील पर्यावरण संघटना संघर्ष करत आहेत. असे असताना ‘ही जागा खासगी मालकीची आहे’ असा पवित्रा घेत येथे येणाऱ्या नागरिक तसेच पर्यटनप्रेमींची अडवणूक केली जात असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
रविवारी सकाळी पक्ष्यांचे फोटो काढताना खासगी विकासकाच्या सुरक्षारक्षकांनी हटकले. हा अधिकार सुरक्षारक्षकांना कुणी दिला? ही जमीन खासगी आहे असे हे सुरक्षारक्षक सर्वांना सांगत आहेत. – डॉ. अरुण कुऱ्हे, पक्षीप्रेमी
पाणथळ जागांबाबतच्या आरक्षणांचा वाद न्यायालयात आहे. यापूर्वीही तलावाच्या परिसरात जाण्यास मज्जाव करण्याचा प्रयत्न झाला होता. छायाचित्रकार आणि नागरिकांना मज्जाव केला जात असेल तर ते धक्कादायक आहे. -सुनील अग्रवाल, पर्यावरणप्रेमी