नवी मुंबई: नवी मुंबईत गेल्या दोन दिवसात तीन ठिकाणी पार्किंग केलेल्या कारच्या काचा फोडून आतील ऐवज चोरी करण्याच्या तीन घटना घडल्या आहेत. यातील दोन घटना वाशी सारख्या कायम गजबजलेल्या आणि पे अँड पार्क सुविधा असणाऱ्या  ठिकाणी झाल्या असून एक ऐरोली येथे झाली आहे. या घटनांच्या मुळे रस्त्यावर वाहन पार्किंग करणे धोक्याचे ठरत आहे.

नवी मुंबईत पार्किंग केलेल्या गाड्यांच्या काचा फोडून आतील ऐवज चोरी केल्याच्या घटना कमी झाल्या होत्या. मात्र आता पुन्हा दोन दिवसात तीन घटना घडल्याने एखादी टोळी कार्यरत झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. धक्कादायक बाब म्हणजे कायम गर्दी असलेल्या ठिकाणीही अशा घटना घडल्याने चोरट्यांचे धाडस वाढल्याचे दिसून येत आहे तर पोलिसांच्या कार्यशैलीवर प्रश्न चिन्ह उमटत आहे.

सीबीडी येथे राहणारे व ट्रान्सपोर्टचा व्यवसाय करणारे जसपालसिंग सिद्धू हे कामानिमित्त वाशी येथे आले होते. त्यांनी त्यांची कार वाशी सेक्टर १७ येथील एका ठिकाणी पार्किंग मध्ये पार्क केली होती. ते रात्री सव्वा सात वाजता एका कार्यालयात गेले व घरी जाण्यास सव्वा नऊ वाजता तेथून  बाहेर पडले. ते गाडी जवळ आले असता गाडीची काच फोडलेली आढळून आली. त्यांनी तात्काळ गाडीच्या आतील काही चोरी झाले का याची तपासणी केली असता गाडीतील एक बॅग आढळून आली नाही. याच बॅगेत त्यांनी १५ लाख ७० हजार रुपयांची रोकड ठेवली होती. चोरी झाल्याची खात्री पटल्यावर त्यांनी वाशी पोलीस ठाण्यात कळवले. पोलिसांनी घटनास्थळी येत पाहणी करून गुरुवारी अपरात्री अनोळखी व्यक्ती विरोधात गुन्हा नोंद केला आहे.

दुसऱ्या घटनेत वसई येथे राहणारे जतीन गोहिल हे कामानिमित्त ऐरोली येथे आले होते. आपले काम आटोपल्यावर ते सेक्टर १९ येथील पूवाज नावाच्या हॉटेल मध्ये जेवण करण्यास गेले . जेवण करून घरी जाण्यासाठी गाडी जवळ आले असता गाडीची काच फोडलेली आढळून आली तसेच आतील ७० हजार रुपयांचा लॅपटॉप, ७०० रुपयांचा चार्जर, अन्य एक ४५ हजार रुपयांचा लॅपटॉप अन्य काही किरकोळ किमतीच्या वस्तू अशा एकूण १ लाख १६ हजार ७५० रुपयांच्या बारा वस्तूंची चोरी झाल्याचे समोर आले. यात काही कागदपत्रांचा समावेश आहे. हि चोरी बुधवारी सकाळी साडे आठ ते पावणे दहाच्या दरम्यान झाली आहे.  या प्रकरणी रबाळे पोलिसांनी अनोळखी व्यक्ती विरोधात गुन्हा नोंद केला आहे.

तिसऱ्या घटनेत चेंबूर येथील बांधकाम व्यवसायिक अक्षय बागल हे वाशीत आले होते. त्यांनी वाशी  स्टेशन परिसरातील भगवान महावीर मार्गावर आपली गाडी पार्क करून एका ठिकाणी कामानिमित्त गेले होते. परत आल्यावर त्यांच्या गाडीची काच फोडून आतील ९ लाखांची रोकड चोरी झाल्याचे उघडकीस आले. हि घटना ७ तारखेला संध्याकाळी ७ वाजून १० मिनिटे ते सात वाजून ३६ मिनिटे दरम्यान घडली आहे. या प्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या यातील वाशी येथे घडलेल्या घटनेत दोन्ही ठिकाणी गाड्या या पे अँड पार्क सुविधा असणाऱ्या ठिकाणी पार्क केलेल्या होत्या. तर तिन्ही चोरीच्या घटना या गजबजलेल्या  ठिकाणी झाल्याने चोरट्यांना पकडणे पोलिसांच्या समोर आव्हान उभे राहिले आहे.