नियोजनबध्द वसवलेल्या नवी मुंबई शहरात पार्किंगचा प्रश्न दिवसेंदिवस अधिक जटील होत असून शहरातील नो पार्किंग जागेतच पार्किंग केलेल्या वाहनांची गर्दी पाहायला मिळत आहे. नवी मुंबई शहरातील सीवूड्स  विभागाला अल्पावधीतच कमालीचे महत्व प्राप्त झाले आहे. सीवूड्स रेल्वेस्थानक परिसरातच झालेल्या मॉलमध्ये या परिसराला एक वेगळे महत्व प्राप्त झाले आहे.परंतू या मॉलमुळे सीवूड्स पूर्व पश्चिम भागाला महत्व आलेले असताना अनेक समस्यांचाही विळखा पडला आहे. सीवूड्स पश्चिमेला याच मॉलच्या बाहेर रस्त्यालगत असलेला बसथांबा हा बसथांबा की पार्किंगचा थांबा असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे या परिसरात विविध बेकायदेशीर फेरीवाले आपले बस्तान बसवत असून त्यामुळे या परिसराल बकाल स्वरुप प्राप्त झाले आहे. तर बसथांबा आहे.त्या थांब्यावर बस थांबतात तेथेच बेकाया पार्किंगच्या वाहनांची गर्दी पाहायला मिळते त्यामुळे बस थांबणार कुठे व प्रवाशांनी बसथांब्यावर थांबायचे कुठे असा प्रश्न निर्माण झाला आहे. मॉलमध्ये जाणाऱ्यांची गर्दी मोठी असून  पार्किंगसाठी जागाच अपुऱ्या पडत असल्याने नो पार्किंगच्या ठिकाणीच वाहनांची गर्दी पाहायला मिळत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> ठाणे ग्रामीण पोलीस भरती : नवी मुंबईत एकाच मार्गावरून दुहेरी वाहतूक

नवी मुंबई शहर झपाट्याने विकसित झालेल शहर आहे अल्पावधीतच या शहराला वेगळे महत्व प्राप्त झाले आहे. सुरवातीला वाशी रेल्वेस्थानक परिसरात असलेल्या अनेक मॉलमध्ये वाशी परिसरातही अशीच स्थिती अद्यापही पाहायला मिळते. परंतू सीवूड्स रेल्वेस्थानकानजीकच झालेल्या मॉलमुळे या विभागाचे महत्व वाढलेच परंतू त्याबरोबरच समस्याही वाढल्या आहेत. काही वर्षापूर्वी पादचारी मोकळा श्वास रेल्वेस्थानक गाठत असल्याचे पाहायला मिळत होते.परंतू आता याच स्थानकापर्यंत पोहचण्यासाठी गर्दी व वाहनांची संख्या यातून मार्ग काढताना नागरीकांना द्राविडी प्राणायाम करावे लागतात. सीवूड्स रेल्वेस्थानकाच्या पश्चिमेला सथानकातून बाहेर पडताच असलेल्या मुख्य रस्त्यालगत अनेक रहिवाशी सोसायट्या आहेत. परंतू या सोसायट्यामध्ये राहणाऱ्या नागरीकांनाही  बेकायदा पार्आकिंगमुळे आपल्या सोसायट्यांचे प्रवेशद्वार गाठताना दमछाक होते. कारण सोसायट्यांच्या सर्वच प्रवेशद्वारावर बेकायदेशीर पार्क केलेल्या वाहनांची गर्दी असते. सीवूड्स पश्चिमेला असलेल्या बसथांब्यावर तर बस थांबायला जागाच नाही. वाहनचालकांना रस्त्यावरच बस थांबावी लागते.तसेच याच परिसरात असलेल्या विविध खाद्यपदार्थ .वाईन्स शॉप यामुळे बसथांब्यावरच रस्त्यावरच बिनधास्तपणे धुम्रपान केले जाते. बसथांब्यावर प्रवाशांना बसण्यासाठीच्या जागेवर दारुच्या बाटल्या व सिगारेटचा खच पडलेला असतो.तर परिसरात सर्वत्र दुर्गंधी व कचरा पडलेला असतो. त्यामुळे सीवूड्स पश्चिमेला असलेला बसथांबा हा बसथांबा आहे की धुम्रपान करण्यांचे ठिकाण असा प्रश्न निर्माण झाला आहे.

हेही वाचा >>> नवी मुंबई : कांदा बटाटा बाजाराची सिडको अभियंत्यांकडून पाहणी

पालिका विभाग अधिकाऱ्यांचे यांच्याकडे दुर्लक्ष झाले असून तक्रार प्राप्त झाल्यानंतर मात्र पोलीस व पालिका अधिकारी फक्त नावापुरती कारवाई करतात. तर वाहतूक विभागाचे तर येथे दुर्लक्षच झाले आहे. त्यामुळे सीवूड्स पूर्व तसेच पश्चिमेचा परिसर झपाट्याने विकसित झाला पण झपाट्याने समस्याही वाढल्या अशी स्थिती आहे. त्यामुळे सरकारी आस्थापनांनी याकडे जाणीपूर्वक लक्ष देण्याची आवश्यकता आहे.

सीवूडस परिसरात मॉलमुळे प्रचंड गर्दी झाली आहे.स्थानकाच्या पश्चिमेला अतिशय बिकट अवस्था असून रसत्यावरुन चालणेही कठीण झाले आहे. स्थानकाच्या बाहेरील मुख्य रस्त्यालगत खाऊगल्ली व दारुगल्ली झाली की काय अशी स्थिती आहे. बसथांब्याला पार्किंगचे स्वरुप आले आहे. त्यामुळे याबाबत संबंधित व्यवस्थांनी याकडे जाणीवपूर्वक लक्ष देण्याची गरज आहे.अन्यथा या ठिकाणी कोणतीही मोठी दुर्घटना घडण्याचा शक्यता आहे.

राहुल  त्रिपाठी, नागरीक

सीवूड्स सथानकाच्या पश्चिमेला व पूर्वेला प्रत्यक्ष पाहणी करुन पार्किंगबाबत योग्य ती कार्यवाही करण्यात येईल. वाहतुकीला अडथळा निर्माण होणार नाही याबाबत मॉल व्यवस्थापनाशीही बातचीत करण्यात येईल.तिरुपती काकडे, उपायुक्त वाहतूक विभाग

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Seawoods west bus stop has become parking spot zws