नवी मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उद्घाटनाच्या दौऱ्यापूर्वी महामुंबई परिसरात सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. ठाणे, नवी मुंबई आणि मुंबई भागात पोलीस सुरक्षेत मोठी वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती पोलीस सुत्रांनी दिली. पंतप्रधान आजपासून दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आहेत. नवी मुंबई आणि मुंबई परिसरातील वेगवेगळ्या प्रकल्पांचे उद्धाटन मोदी यांच्या हस्ते केले जाणार आहे. नवी मुंबई विमानतळासाठी राज्य सरकारने ४८ तासांपुर्वीच नव्या पोलीस ठाण्याची घोषणा केली आहे. या पार्श्वभूमीवर नवी मुंबई पोलिसांनी वाशीपासून ‘अटल सेतू’पर्यत विशेष पोलीस बंदोबस्त ठेवला आहे. पंतप्रधानांच्या सुरक्षेसाठी महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या विशेष सुरक्षा पथकांनी मागील तीन दिवसांपासून विमानतळ परिसराचा ताबा घेतला आहे.

८ आणि ९ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र दौऱ्यावर येणारे पंतप्रधान मोदी बुधवारी त्यांच्या दोन दिवसीय दौऱ्याची सुरुवात करतील. या दौऱ्यात ते विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचे तसेच मुंबई मेट्रो लाईन-३ च्या अंतिम टप्प्याचे उद्घाटन करतील. पंतप्रधान मोदी बुधवारी दुपारी ३ वाजता नवी मुंबई येथे पोहोचतील आणि नव्याने बांधलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा पाहणी दौरा करतील. त्यानंतर ३:३० वाजता ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन करतील आणि विविध प्रकल्पांचे उद्घाटन व लोकार्पण करतील. या प्रसंगी पंतप्रधान मोदी जनतेला संबोधित करतील.

नवी मुंबई विमानतळ महत्वाचे केंद्र

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हा भारतातील सर्वात मोठा ग्रीनफिल्ड विमानतळ प्रकल्प असून सार्वजनिक-खासगी भागीदारी (PPP) पद्धतीने विकसित करण्यात आला आहे. मुंबई महानगर प्रदेशासाठी हा दुसरा आंतरराष्ट्रीय विमानतळ ठरणार असून छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाबरोबर (CSMIA) मिळून तो वाहतूक कोंडी कमी करण्यात आणि मुंबईला जागतिक बहुविमानतळ प्रणालीमध्ये स्थान मिळवून देण्यात मदत करेल. ११६० हेक्टर क्षेत्रफळावर विकसित करण्यात आलेला हा विमानतळ जगातील सर्वाधिक कार्यक्षम विमानतळांपैकी एक ठरेल आणि दरवर्षी ९ कोटी प्रवासी (MPPA) व ३.२५ दशलक्ष मेट्रिक टन मालवाहतूक हाताळू शकेल.

या दौऱ्यात वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीमुळे दोन्ही शहरांमध्ये पोलिस उच्च सतर्कतेवर आहेत, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. स्थानिक पोलिसांबरोबरच विशेष सुरक्षा गट (SPG), विशेष सुरक्षा युनिट (SPU), बॉम्ब निकामी पथक (BDS) आणि वाहतूक पोलिसांचे कर्मचारी सुरक्षा व्यवस्थेचा भाग म्हणून तैनात करण्यात आले आहेत, अशी माहिती सुत्रांनी दिली. पंतप्रधान मोदी दुपारी साडेतीन वाजता विमानतळाचे उद्घाटन करतील आणि देशाला विविध पायाभूत सुविधा प्रकल्प अर्पण करतील तसेच कार्यक्रमाला संबोधित करतील. ९ ऑक्टोबर रोजी पंतप्रधान मोदी मुंबईत यूकेचे पंतप्रधान किअर स्टार्मर यांचे स्वागत करतील. सीईओ फोरम आणि ग्लोबल फिनटेक फेस्टच्या सहाव्या आवृत्तीला उपस्थित राहतील, असे निवेदनात म्हटले आहे. पंतप्रधान मोदी गुरुवारी युनायटेड किंगडमचे पंतप्रधान सर किअर स्टार्मर यांचे शहरात स्वागत करतील. दोन्ही देशांचे पंतप्रधान मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटर येथे होणाऱ्या सीईओ फोरममध्ये सहभागी होतील. दोन्ही नेते नंतर ग्लोबल फिनटेक फेस्टच्या सहाव्या आवृत्तीला उपस्थित राहतील. ते या फेस्टमध्ये मुख्य भाषणेही देतील.