पनवेल: प्रस्तावित विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्गिकेच्या मधोमध मेट्रोसाठी मार्गिका तयार करण्यात येत आहे. या मार्गिकेवर पूर्वी ३४ स्थानके प्रस्तावित होती. ही संख्या आता ५० पेक्षा अधिक होणार आहे. यासाठी अभ्यासगट नेमण्यात आला आहे, अशी माहिती मुंबई महानगर रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) सूत्रांनी दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सुधारित प्रस्तावानुसार नायगाव ते अलिबागपर्यंत (बलावली) ही मेट्रो धावणार आहे. यापूर्वी खारबाव ते अलिबाग (बलावली) दरम्यान मेट्रो प्रस्तावित होती. यादरम्यान ३४ स्थानके होती.

विरार-अलिबाग बहुउद्देशीय महामार्गासाठी २०१० मध्ये १० हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित होता. मात्र, १३ वर्षांनंतर याच महामार्गिकेसाठी एमएसआरडीसी ‘हुडको’कडून कर्ज घेऊन ही मार्गिका ५२ हजार कोटी रुपयांना बांधत आहे. या मार्गिकेच्या द्रुतगती मार्गाचे बांधकाम सुरुवातीच्या चार वर्षांत पूर्ण केल्यानंतर मेट्रोच्या कामाला सुरुवात करण्याचे उद्दिष्ट एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक अनिल गायकवाड यांचे आहे. भूसंपादनासाठी १८ हजार कोटी आणि बांधकामासाठी २० हजार कोटी रुपयांहून अधिक तसेच इतर कामांसाठी १४ हजार कोटी रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे.

हेही वाचा… एपीएमसी- पर राज्यातील आवक घटली; ट्रक चालक संपाचा परिणाम… 

विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्गिकेवरील प्रस्तावित मेट्रो ही नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि मुंबईच्या मेट्रो मार्गिकेला जोडण्यात येणार आहे. प्रत्येक ३ ते ४ किलोमीटरवर मेट्रोचे स्थानक प्रस्तावित केले आहे. पनवेल तालुक्यामध्ये नांदगाव, करंजाडे, कोंडले आणि रिटघर या गावांच्या मध्ये या मेट्रोची स्थानके प्रस्तावित आहेत. या मार्गिकेवर पूर्वी ३४ स्थानके प्रस्तावित होती. ही संख्या आता ५० पेक्षा अधिक होणार आहे.

याबाबत एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक अनिल गायकवाड यांच्याशी संपर्क साधला, मात्र त्यांचा संपर्क होऊ शकला नाही.

भूसंपादन कागदावरच…

या मार्गिकेचा सर्वाधिक लाभ सिडकोच्या नैना प्रकल्पाला मिळणार आहे. न्हावा शेवा-शिवडी सागरी मार्ग, मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग, मुंबई-गोवा महामार्गांना हा मार्ग जोडला जाणार आहे. दरम्यान, रायगड जिल्ह्यातील ६८ गावांपैकी २८ गावांची जमीन दरनिश्चितीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. मात्र दरनिश्चिती प्रक्रिया पुढे रखडल्याने अंतिम निवाडा आणि नुकसानभरपाईची रक्कम मिळेपर्यंत शेतजमिनी एमएसआरडीसीच्या ताब्यात येण्याची शक्यता नाही़.

८ ते ९ किलोमीटरवर आंतरबदल…

बहुउद्देशीय मार्गिकेवर प्रत्येक ८ ते ९ किलोमीटरवर आंतरबदल असल्याने वाहनचालकांना इतर द्रुतगती महामार्गांप्रमाणे वळसा घालून प्रवास करण्याची गरज नाही. पनवेल तालुक्यातील बोर्ले सांगडे या गावाजवळ हा मार्ग मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाला जोडण्यात येणार आहे. रायगड जिल्ह्यात असे आंतरबदल प्रस्तावित केले आहेत.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The proposed virar alibag multi purpose corridor is being constructed for the metro there will be more than 50 stations dvr