ओहोटीच्या काळात हजारो प्रवाशांचे हाल

उरणच्या मोरा व अलिबागच्या रेवस बंदरातील वषरेनुवर्षे साचलेला गाळ ही मोठी अडचण होऊ लागली आहे. या दोन्ही बंदरांतील गाळाचे प्रमाण वाढल्याचा प्रमाण जलवाहतुकीवर झाला असून ओहोटीच्या वेळी ही वाहतूक बंद ठेवावी लागत आहे. गेल्या आठवडय़ापासून हा प्रकार सुरू झाला आहे. या पाश्र्वभूमीवर मेरिटाइम बोर्डाने शंभर वर्षांपूर्वीची गाळ काढण्याची पद्धत बंद करून आधुनिक पद्धतीचा वापर करीत दोन्ही बंदरांतील गाळ काढावा, अशी मागणी कोकणवासीय उत्कर्ष संस्थेने मेरिटाइम बोर्डाच्या बंदर अधिकाऱ्यांकडे केली आहे.
उरण मोरा ते भाऊचा धक्का मुंबई ही जलसेवा बारमाही सुरू असते. या जलमार्गातून दररोज सातआठ हजार प्रवासी प्रवास करीत आहेत. पावसाळ्यातील चार महिने वगळता रेवस (अलिबाग) ते भाऊचा धक्का ही जलसेवा आठ महिने सुरू असते. त्यामुळे रायगड जिल्हातील तसेच कोकणातील अनेक ठिकाणचे प्रवासी स्वस्तात व आनंददायी प्रवास करू शकतात. या जलमार्गावरील तिकीट दरांत वाढ झालेली असली तरी वाहतुकीचा खोळंबा होण्याची शक्यताच नसल्याने अनेक प्रवासी या मार्गालाच प्राधान्य देत आहेत. मात्र सध्या या सेवेला साचलेल्या गाळाचे ग्रहण लागले आहे.
मोरा तसेच रेवस बंदरातील चिखलाचा गाळ काढण्यासाठी महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाकडून लाखो रुपयांच्या निविदा काढून गाळ काढला जात असल्याचा दावा केला जातो. प्रत्यक्षात या दोन्ही बंदरातील गाळ कमी न झाल्याने दर पंधरा दिवसांनी येणाऱ्या ओहोटीच्या वेळी तसेच आमावस्येला ही सेवा बंद करावी लागते. रोजगार तसेच व्यवसायासाठी मुंबईत जाणाऱ्या शेकडो चाकरमान्यांना याचा फटका बसत आहे. या तुलनेने नौदलाच्या करंजा ते मुंबई तसेच जेएनपीटी ते गेटवे ऑफ इंडिया या सेवा नियमित सुरू असतात. त्यांच्याकडून आधुनिक तंत्राचा वापर करून गाळ काढला जात असल्याने महाराष्ट्र मेरिटाईम अडचण उद्भवत नाही.
बोर्डाने अशीच अत्याधुनिक यंत्रणा राबवून या दोन्ही बंदरांतील गाळ काढावा अशी मागणी, कोकणवासीय उत्कर्ष संस्थेचे अध्यक्ष गोपीनाथ चव्हाण यांनी केली आहे.