नवी मुंबई : खड्डे आणि वाहतुक पोलिसांच्या नियोजनाअभावी सोमवारी रात्री नवी मुंबईकरांना वाहतुक कोंडीचा मन:स्ताप सहन करावा लागला. येथील मुलुंड-ऐरोली मार्ग, ठाणे – बेलापूर मार्ग, तळवळीसह ऐरोलीतील अंतर्गत मार्गावर मोठ्याप्रमाणात वाहतुक कोंडी झाली होती. त्यामुळे कामानिमित्ताने बाहेर पडणाऱ्या नागरिकांचे हाल झाले. गणेशोत्सवानिमित्ताने हजारो नागरिक रस्ते मार्गाने कोकणात निघाले होते. त्यांनाही या वाहतुक कोंडीचा फटका सहन करावा लागला.

मुलुंड ऐरोली मार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. गणेशोत्सवानिमित्ताने कोकणात जाणाऱ्या नागरिकांची वाहनेही याच मार्गाने वाहतुक करत होती. परंतु येथे खड्डे पडल्याने आणि पोलिसांचे नियोजन नसल्याने मोठ्याप्रमाणात वाहतुक कोंडी झाली. या वाहतुक कोंडीमुळे मुलुंड ऐरोली मार्गावर ऐरोली चौक ते भांडुप पंपिंग स्टेशनपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. काही वाहन चालकांनी विरुद्ध दिशेने वाहतुक सुरु केल्याने कोंडीत भर पडली. त्याचा परिणाम ठाणे-बेलापूर मार्गावरही झाला. येथील मार्गावर ऐरोली ते घणसोली येथील रिलायन्स काॅर्पोरेट पार्कपर्यंत वाहतुक कोंडी झाली होती.

ठाण्याहून नवी मुंबईत हजारो नोकरदार कामानिमित्ताने वाहतुक करत असतात. या वाहतुक कोंडीचा परिणाम त्यांना सहन करावा लागला. मुख्य मार्गावर वाहतुक कोंडी झाल्याने काही वाहन चालकांनी अंतर्गत मार्गे वाहतुक सुरु केली. त्यामुळे तळवळी मार्ग, रबाळे रेल्वे स्थानक मार्ग येथेही वाहतुक कोंडी झाली होती.