Travel from Belapur to Gateway India in just 60 minutes ssb 93 | Loksatta

बेलापूर ते गेट वे इंडियाचा प्रवास फक्त ६० मिनिटांत, नवी मुंबई, मुंबईकरांसाठी ‘वॉटर टॅक्सी’ची सफर सुरू

बेलापूर ते गेट वे ऑफ इंडिया या जलप्रवास सेवेला आज बेलापूर येथून सुरुवात झाली आहे. त्यामुळे,नागरिकांना एका तासात नवी मुंबईतून मुंबई शहर गाठता येणार आहे.

बेलापूर ते गेट वे इंडियाचा प्रवास फक्त ६० मिनिटांत, नवी मुंबई, मुंबईकरांसाठी ‘वॉटर टॅक्सी’ची सफर सुरू
बेलापूर ते गेट वे इंडियाचा प्रवास फक्त ६० मिनिटांत (छायाचित्र – लोकसत्ता टीम/ग्राफिक्स)

नवी मुंबई – रोजची रस्ते वाहतूक व वाहतूक कोंडीची कटकट, तसेच रेल्वे प्रवासात प्रचंड गर्दी यांच्यातून सुटकारा मिळण्यासाठी नवी मुंबई ते गेटवे ऑफ इंडिया या जलसेवेचा प्रारंभ राज्याचे कॅबिनेट मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते व बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांच्यासह विविध मान्यवरांच्या हस्ते पार पडला. बेलापूर ते गेट वे ऑफ इंडिया या जलप्रवास सेवेला आज बेलापूर येथून सुरुवात झाली आहे. त्यामुळे,नागरिकांना एका तासात नवी मुंबईतून मुंबई शहर गाठता येणार आहे.

नवी मुंबई शहराला विस्तीर्ण सागरी किनारा लाभला आहे. त्यामुळे येथून जलवाहतुकीचा पर्यायही उपलब्ध होऊ शकतो. या अनुषंगाने बेलापूर ते मुंबई असा जलप्रवास करण्याचे नियोजन आखण्यात आले आहे. आज ७ फेब्रुवारीपासून बेलापूर ते मुंबई वॉटर टॅक्सी प्रवास सर्वसामान्यांसाठी सुरू करण्यात आला आहे. यामुळे वाढत्या वाहनांमुळे होणारे प्रदूषण कमी करण्यासाठीही मदत होणार आहे.

हेही वाचा – नवी मुंबई : लकी जँकेट मुळे घरफोडीत यश मात्र…

दिवसेंदिवस खासगी वाहनांची संख्या वाढत आहे. परिणामी रस्ते मार्गाने प्रवास करताना विशेषतः मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडीची समस्या उद्भवते. त्याचबरोबर भरमसाठ वाहनांमुळे वायू प्रदूषणातही भर पडत आहे. त्यामुळे जास्तीत जास्त सार्वजनिक वाहतुकीचा पर्याय उपलब्ध करून नागरिकांचा प्रवास सुकर आणि प्रदूषण कसे कमी करता येईल, यावर शासनाकडून भर देण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने मोठ्या प्रमाणावर विद्युत बसचा पर्याय उपलब्ध केला आहे. शिवाय आता जलवाहतुकीकडेही भर दिला जात आहे. याअनुषंगाने नवी मुंबईतून जलवाहतूक प्रवास सुरू करण्यात आला असून, बेलापूर-मुंबईचा प्रवास अवघ्या ६० मिनिटांत पार करता येणार आहे.

महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाकडून बेलापूरमध्ये जेट्टी बांधून वॉटर टॅक्सी सेवा मागील वर्षी सुरू करण्यात आली होती. मात्र, ८०० रुपये भाडे असल्याने या सेवेकडे नागरीकांनी पाठ फिरवली होती. त्यामुळे, याचे भाडे कमी करावे म्हणून आमदार मंदाताई म्हात्रे यांनी अधिवेशनात मागणी केली होती. त्यांच्या मागणीला यश आले असून आता हे भाडे २५० व ३५० रुपये आकारून ही सेवा सुरू करण्यात आली आहे.

टप्प्याटप्प्यात नवी मुंबईहून मुंबई, जेएनपीटी, एलिफंटा, रेवस या ठिकाणी जाण्यासाठी वॉटर टॅक्सीचा पर्याय उपलब्ध होणार आहे. प्राथमिक स्वरुपात बेलापूर ते मुंबई असा प्रवास सुरू करण्यात आला आहे. ही वातानुकूलित वॉटर टॅक्सी २०० आसन क्षमतेची असून याकरिता प्रवाशांना २५०-३५०रुपये मोजावे लागणार आहेत. या सुरू होणाऱ्या वॉटर टॅक्सीला नवी मुंबईकर किती पसंती देतात, हे पुढील कालावधीतच स्पष्ट होईल.

नवी मुंबई व मुंबई जल वाहतुकीने जोडण्यासाठी बेलापूर ते गेट ऑफ इंडिया या जलसेवेचा प्रारंभ करण्यात आला आहे. याचे आधीचे दर कमी करून प्रवाशांना परवडेल असे दर ठेवण्यात आले आहेत. प्रवाशांचा प्रतिसाद पाहून जलप्रवासाचे दर आणखी कमी करण्याचा प्रयत्न केला जाईल, तसेच जलवाहतुकीच्या फेऱ्यांची संख्याही प्रतिसादानुसार वाढविण्यात येईल, असे मंत्री दादा भुसे म्हणाले.

हेही वाचा – नवी मुंबई : जे.एम.बक्षी बंदराला भूमिपुत्रांचा दणका, बंदरात भरती झालेल्या बाहेरील १० कामगारांना काढले

बेलापूर येथून याआधी सुरू करण्यात आलेल्या जल वाहतुकीचे दर आठशे रुपये ठेवण्यात आले होते. ही जलवाहतूक बेलापूर ते भाऊचा धक्का इथपर्यंतच होती. परंतु, आता बेलापूर ते गेटवे ऑफ इंडिया अशा फेऱ्या होणार असून, त्यांचे दरही २५० व ३५० रुपयांवर आणण्यात आलेले आहेत. आगामी काळात जलवाहतुकीच्या फेऱ्या प्रवासांच्या प्रतिसादानुसार वाढवण्यात येतील, असे मेरीटाईम बोर्डचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमित सैनी म्हणाले.

…अशा असतील फेऱ्या

  • सकाळी ८.३० वा बेलापूर ते गेटवे ऑफ इंडिया
  • संध्याकाळी ६.३० वा. गेटवे ऑफ इंडिया ते बेलापूर

मराठीतील सर्व नवी मुंबई ( Navimumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 07-02-2023 at 12:16 IST
Next Story
नवी मुंबई : जे.एम.बक्षी बंदराला भूमिपुत्रांचा दणका, बंदरात भरती झालेल्या बाहेरील १० कामगारांना काढले