पंतप्रधान म्हणून उद्धव ठाकरे यांच्याकडे पाहिलं जात असल्याचा उल्लेख सामना या वृत्तपत्रातून करण्यात आला आहे. यावर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यानुसार, उद्धव ठाकरे हे पंतप्रधान होऊ शकत नाहीत, असं मत आठवले यांनी व्यक्त केलं आहे.

नवी मुंबई विमानतळाच्या कामात येथील पुरातन लेणी उद्धवस्त केली जात असल्याच्या तक्रारी ग्रामस्थांकडून केल्या जात असल्याने आठवले यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट दिली. यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.

आठवले म्हणाले, “उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झालेलेच आहेत, मात्र पतंप्रधान होणं इतकं सोप काम नाही. पंतप्रधान होण्यासाठी संपूर्ण देशभर तुमचा पक्ष असला पाहिजे. महाराष्ट्रातील संख्याबळाच्या जोरावर ही बाब अशक्य आहे. केवळ इच्छा असूनही उपयोग नाही त्यासाठी आपली तेवढी राजकीय ताकद असली पाहिजे. त्यानुसार उद्धव ठाकरे यांची ताकद पंतप्रधान होण्याइतपत आजिबात नाही. कारण शिवसेना महाराष्ट्राच्या बाहेर ताकद वाढवू शकत नाही. त्यामुळे त्यांची जरी इच्छा असली तरी त्याचं पंतप्रधान होणं ही बाब माझ्या दृष्टीकोनातून अशक्य आहे.”