उरण : उरण नगरपरिषदेकडून पहिलाच वायुवरील शवदाहिनी प्रकल्प उभारण्यात आला आहे. एक कोटी खर्चाच्या वायू शवदाहिनी प्रकल्पामुळे वेळ, पैशाचीही मोठ्या प्रमाणावर बचत होणार आहे. पर्यावरणाचे रक्षण, प्रदूषणाला पर्याय ठरणारा प्रकल्प अद्यापही उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे. मात्र या प्रकल्पाचे काम पूर्ण झाले असून महिनाभरात हा प्रकल्प सुरू होईल असा दावा उरण नगर परिषदेने केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

उरण नगरपरिषदेने शहरातील बोरी येथे उभारलेल्या एक कोटी खर्चाच्या प्रकल्पामुळे नागरिकांचा वेळ, पैशाचीही मोठ्या प्रमाणावर बचत होणार असून पर्यावरणाचे रक्षण व प्रदूषणाला पर्याय ठरणार आहे. मात्र परिसरातील नागरिकांना शवदाहिनी कार्यान्वित होण्याची प्रतीक्षा लागून राहिली आहे. उरण शहरवासीयांसाठी पर्यावरणपूरक वायुवर चालणारी शवदाहिनी बोरी स्मशानभूमीत उभारण्यात आली आहे. सुमारे एक कोटी रुपये खर्च करून उभारलेला वायूवर आधारित शवदाहिनी प्रकल्प लाकडांवर जळीत करण्यामुळे होणाऱ्या मोठ्या प्रमाणावरील प्रदूषणाला पर्याय ठरणारा आहे. त्याशिवाय नाममात्र दराच्या आकारणीमुळे पैशांचीही मोठ्या प्रमाणावर बचत होणार आहे.

उरण शहराची लोकसंख्या ३५ हजारांहून अधिक आहे.त्यातच परिसरातील वाढत्या औद्योगिक पसाऱ्यामुळे लोकसंख्येत वाढ चालली आहे. त्यामुळे वाढत्या वाहतुकीमुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. अपघातातील आणि बेवारस मृतदेहाच्या दहनाचा ताणही उनपला सोसावा लागत आहे. तशी शहरातील लोकसंख्येच्या तुलनेत शहरात बोरी,भवरा, मोरा अशी तीन ठिकाणी स्मशानभूमीची व्यवस्था आहे. दररोज रात्री- अपरात्री मृतदेहांचे दहन करण्यासाठी स्मशानभूमीत येणाऱ्या मृतदेहांची विल्हेवाट लावण्यासाठी मृतांच्या नातेवाईकांना लाकूडफाटा उपलब्ध करून देण्याचे काम उरण नगर परिषदेला करावे लागते.

सध्याच्या प्रचलित पद्धतीनुसार अंत्यविधीसाठी कमीत कमी ५०० ते ७५० किलो लाकूडफाटा लागते. यासाठी साधारणपणे पाच हजारांहून अधिक खर्च करावा लागतो.त्याशिवाय मृतदेहांची राख होईपर्यंत नातेवाईकांसह आलेल्या आप्तेष्टांना नाहक तीन-चार तास अंत्यसंस्कारासाठी ताटकळत स्मशानभूमीतच बसावे लागते. उनपच्या या शवदाहिनीमुळे नागरिकांचा त्रास कमी होण्यास मदत मिळणार आहे.

नगर परिषदेच्या माध्यमातून वायू शव दाहीनेचे काम पूर्ण झाले असून वायूवाहिनीची जोडणीही देण्यात आली आहे. हा प्रकल्प महिनाभरात कार्यन्वित करण्याचे प्रयत्न सुरू आहे. – निखिल दोरे, अभियंता, उरण नगर परिषद

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uran municipal council gas cremation work completed asj