लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नवी मुंबई हेटवणे धरणाच्या जलशुद्धीकरण केंद्र आणि जलवाहिनीवर देखभाल-दुरुस्तीचे काम सिडको महामंडळाने हाती घेतल्यामुळे बुधवार व गुरुवारी द्रोणागिरी, जेएनपीटी, उलवे, खारघर, तळोजा या सिडको क्षेत्रात पाणीपुरवठा बंद राहणार आहे. यामुळे सिडको क्षेत्रातील रहिवाशांनी पाण्याची साठवणूक करण्याचे नियोजन करावे, असे आवाहन सिडकोतर्फे करण्यात आले आहे.

खारघर, तळोजा या क्षेत्रात सध्या पाणीटंचाईची समस्या भेडसावत आहे. मागणीप्रमाणे पाणी मिळत नसल्याने गृहनिर्माण सोसायट्यांमधील रहिवाशी पाण्याचे टॅंकर खरेदी करुन तहान भागवत आहेत. उन्हाळ्यात रहिवाशांच्या अंगाची लाही लाही होत असताना अपु-या पाणी पुरवठ्यामुळे नागरीक हैराण झाले आहेत. संबंधित पाणी प्रश्न सोडविण्यासाठी सिडको मंडळाने पाणी गळती रोखण्याकडे लक्ष केंद्रीत केले आहे.

बुधवार व गुरुवारच्या कामामध्ये डीएफसीसी कॉरीडॉरमध्ये जलवाहिनीमध्ये बदल करणे आणि पाच ठिकाणची जलवाहिनीची पाणी गळती रोखण्याचे काम सिडको मंडळाने हाती घेतले आहे. काही प्रमाणात का होईना, रहिवाशांना पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी सिडकोचे हे प्रयत्न सुरू आहेत.

सिडको महामंडळाच्या जनसंपर्क विभागाने सोमवारी जाहीर केलेल्या प्रसिद्धी पत्रकामध्ये हेटवणे धरणातून जलशुद्धीकरण केंद्र व मुख्य जलवाहिनीवर नियोजित देखभाल व दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आल्याचे स्पष्ट केले आहे. हे काम बुधवारी (ता. ९) सकाळी सहा वाजेपासून ते गुरुवारी (ता.१०) सकाळी सहा वाजेपर्यंत सुरू राहणार असल्याने २४ तास पाणीपुरवठा पूर्णतः बंद राहील. त्यानंतर पुढील शुक्रवारी सकाळी सहा वाजेपर्यंत (२४ तास) पाणीपुरवठा कमी दाबाने सुरू होणार असल्याने रहिवाशांनी पाण्याचा वापर जपून करावे असे आवाहन सिडकोने केले आहे. पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी सिडको प्रशासन आवश्यक ती खबरदारी घेत असून, नागरिकांनी सहकार्य करावे, असेही सिडकोने स्पष्ट केले आहे.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Water supply to ulwe kharghar and taloja on wednesday and thursday will be closed mrj