उरण : जेएनपीटी बंदरावर आधारीत सेझमध्ये सावरखार गावातील भूमिपुत्र तरुणांना नोकरीत प्राधान्य द्या या प्रमुख मागणीसाठी सोमवारपासून गावातील तरुणांनी सेझ प्रकल्पाच्या प्रवेशद्वारावर उपोषण सुरू केले आहे. या आंदोलनाची दखल न घेतल्यास सेझ प्रकल्पाचे प्रवेशद्वार बंद करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

जेएनपीटी (न्हावा-शेवा) बंदराच्या उभारणीसाठी सावरखार गावातील शेतकऱ्यांच्या सर्व जमfनी संपादित करण्यात आल्या आहेत. त्यामुळे येथील प्रकल्पात निर्माण होणाऱ्या रोजगारात (नोकऱ्या) स्थानिक भूमीपुत्रांना प्राधान्य मिळावे ही मागणी आहे. या उपोषणाची सुरुवात सावरखारमधील अनिल घरत, परेश ठाकूर व गणेश घरत या तरुणांनी केली आहे. उपोषणाला काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत, जेएनपीटीचे माजी विश्वस्त कॉ. भूषण पाटील, विश्वस्त रवींद्र पाटील, सावरखारचे माजी अध्यक्ष अंकुश घरत आदींनी पाठिंबा दिला आहे.

हेही वाचा – पनवेल: वाहनचोरीची डोकेदुखी कायम; चार दिवसांत आठ वाहनांच्या चोरीची नोंद

जेएनपीटी सेझ प्रकल्पाचे भूमिपूजन २०१४ ला नऊ वर्षांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले होते. यावेळी सेझ प्रकल्पात दीड लाख नोकऱ्या निर्माण होणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र प्रकल्प सुरू होण्यासाठी नऊ वर्षे लागली आहेत. सध्या या सेझमध्ये डी.पी. वर्ल्डने आपला प्रकल्प सुरू केला आहे. या प्रकल्पात नोकर भरती सुरू असून यामध्ये स्थानिक प्रकल्पग्रस्तांना डावलण्यात येत आहे.

हेही वाचा – नवी मुंबई : एपीएमसीत जुन्नर हापूसची आवक वाढली

भूमिपुत्र प्रशिक्षणापासून वंचित

तर दुसरीकडे मागील नऊ वर्षांपासून प्रकल्पात निर्माण होणाऱ्या भविष्यातील रोजगाराच्या पार्श्वभूमीवर स्थानिकांना प्रशिक्षण देण्याची मागणी करूनही कोणत्याही प्रकारचे प्रशिक्षण आजपर्यंत देण्यात आलेले नाही. त्यामुळे अनुभवाविना स्थानिकांना पुन्हा एकदा नोकरीत डावलले जात आहे. त्यामुळे जेएनपीटी प्रशासनाने सेझच्या नोकरभरतीत हस्तक्षेप करून प्रकल्पग्रस्तांना नोकरीत सामावून घेण्याची मागणी या आंदोलनात करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे तातडीने सेझमधील प्रकल्पावर आधारीत प्रशिक्षण सुरू करण्याचीही मागणी केली आहे.