पाऊस हा सर्वात शुद्ध नैसर्गिक जलस्रोत आहे. परंतु पावसाचे पाणी ढगांतून जमिनीकडे प्रवास करताना त्याचे सूक्ष्म जलबिंदू भोवतालच्या हवेच्या संपर्कात येतात. या हवेत असलेले आणि पाण्यात सहजपणे विरघळणारे विविध प्रकारचे प्रदूषक वायू, धूलिकण या पावसाच्या पाण्यात मिसळतात. अंतिमत: हे पावसाचे पाणी घराच्या छपरावर किंवा गच्चीवर पडते तेव्हा त्यामध्ये पक्ष्यांची विष्ठा, धूळ  आणि इतर कचरा मिसळतो. यामुळे  हे पाणी अशुद्ध होते. हे पाहता, पावसाचे पाणी जलसंधारणाद्वारे वापरात आणण्यापूर्वी गाळणे आणि शुद्ध करणे आवश्यक असते.

ते करण्यासाठी विविध पर्याय आहेत. हे पाणी कशासाठी वापरले जाणार आहे, त्यावर उपलब्ध पर्यायांपैकी कोणता पर्याय वापरावा हे ठरवता येते. जर पावसाचे पाणी शौचालयाच्या फ्लश टँक्ससाठी, वाहने धुण्यासाठी, बागेतील झाडांना घालण्यासाठी, अग्निशमन यंत्रणेसाठी आणि तत्सम दुय्यम गोष्टींसाठी वापरायचे असेल, तर साध्या वाळूच्या गाळण पद्धतीचा वापर करता येईल. परंतु हे पावसाचे पाणी आंघोळीसाठी, स्वयंपाकासाठी आणि अगदी पिण्यासाठीही वापरायचे असेल, तर हे पाणी वाळूच्या गाळणीतून प्रवाहित झाल्यानंतर ते कार्बन पावडर (अ‍ॅक्टिव्हेटेड चारकोल) अथवा जेलच्या गाळण यंत्रातून प्रवाहित करून पुढे अतिनील किरण (अल्ट्राव्हॉयोलेट रेज्) तसेच ‘रिव्हर्स ऑस्मोसिस’सारख्या तंत्रज्ञानाचा वापर करून अतिशुद्ध करण्यात येते. अशा प्रकारची गाळण यंत्रणा गच्चीवरील पाणी खाली वाहून नेणाऱ्या नळांमध्ये बसवता येते. याचा एक फायदा असा की, गच्चीवरून खाली वाहणाऱ्या पाण्याच्या स्तंभाच्या दबावामुळे गाळण प्रक्रिया वेगाने होऊ शकते. अनेकदा हे पाणी परत उलटे फिरवून गाळण माध्यमातून प्रवाहित केले जाते. यामुळे त्या गाळणीची भोके खुली राहतात.

शोष खड्डय़ांमध्ये मात्र एवढी प्रगत गाळण यंत्रणा वापरण्याऐवजी विविध आकारांच्या दगड-गोटय़ांचे थर तयार करून त्यावर बारीक वाळूचा थर पसरविण्यात येतो. या शोष खड्डय़ाला जोडलेल्या नळाच्या टोकाला जाळी असतेच. या नळाद्वारे गुरुत्वाकर्षणाच्या उच्च दाबाखाली वाहून शोष खड्डय़ात आलेले पाणी या नैसर्गिक गाळण्यातून प्रवाहित होऊन जमिनीत मुरते आणि जमिनीच्या पाणीसाठय़ात भर घालते. परंतु जमिनीत मुरणारे हे पाणी सर्व प्रकारच्या प्रदूषकांपासून मुक्त असायला हवे. अन्यथा अशी प्रदूषके जमिनीखालील भूजलात मिसळून जातील आणि हे भूजल प्रदूषित होऊन निरुपयोगी ठरेल.

विद्याधर वालावलकर

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२

office@mavipamumbai.org