डॉ. अंजली कुलकर्णी
शस्त्रक्रिया वेदनारहित व्हावी यासाठी रुग्णाला भूल देण्याचे शतकानुशतके प्रयत्न झाले. इसवीसनपूर्व काळापासून अफू, चरस, भांग यांसारख्या अमली पदार्थाचा वापर शस्त्रक्रियेच्या वेळी भूल देण्यासाठी केला जात होता. यामुळे रुग्णाच्या वेदना कमी होत. मात्र ज्याला खऱ्या अर्थाने आधुनिक भूलशास्त्र म्हणता येईल, त्या भूलशास्त्रातील प्रयोगांना एकोणिसाव्या शतकात सुरुवात झाली. भूलशास्त्रातील या सुरुवातीच्या प्रयोगांत नायट्रस ऑक्साइड या वायूचा वापर केला गेला. लाफिंग गॅस म्हणून संबोधला गेलेला हा वायू एक प्रकारची झिंग आणणारा वायू म्हणून प्रसिद्ध आहे.
भूलीसाठी नायट्रस ऑक्साइडचा वापर सुरू होण्यास १८४४ सालची एक घटना कारणीभूत ठरली. हॉरेस वेल्स हा हार्टफोर्ड येथील अमेरिकन दंतवैद्य एका प्रदर्शनाला गेला होता. या ठिकाणी नायट्रस ऑक्साइडच्या प्रभावाखालील एक माणूस धडपडला आणि त्याच्या गुडघ्यांना इजा झाली; पण त्याच्यावरील नायट्रस ऑक्साइडचा प्रभाव कमी होईपर्यंत वेदनांची त्याला जाणीव काही झाली नाही. हे पाहिल्यानंतर वेल्स याने स्वत:चाच दात, भूलीसाठी नायट्रस ऑक्साइड वापरून, दुसऱ्या एका दंतवैद्याकडून काढून घेतला. त्यानंतर अल्पकाळात त्याने स्वत:हून तयार झालेल्या एका दंतवैद्यक विद्यार्थ्यांचा दात काढण्याची शस्त्रक्रिया केली; परंतु दात काढताना हा विद्यार्थी थोडासा ओरडल्यामुळे हॉरेस वेल्स याचा हा प्रयोग अयशस्वी झाल्याचे मानले गेले.
हॉरेस वेल्सचा सहकारी असणाऱ्या विल्यम मॉर्टन याने हार्वर्ड मेडिकल स्कूल येथे याच वर्षी एक व्याख्यान ऐकले. व्याख्यात्याने त्यात ‘सल्फ्युरिक इथर’ या नावाच्या द्रावकामुळे माणसाची शुद्ध हरपत असल्याचा उल्लेख केला. हे ऐकल्यावर विल्यम मॉर्टन याने हे रसायन आणून घरच्या प्राण्यांवर त्याचे प्रयोग सुरू केले. या प्रयोगांतून समाधानकारक निष्कर्ष मिळाल्यानंतर, १८४६ साली मॉर्टनने भूलीसाठी हे इथर वापरून, वेदना न होऊ देता एका रुग्णाचा दात काढला. त्यानंतर दोन आठवडय़ांनी मानेला आलेली गाठ काढण्याच्या एका शस्त्रक्रियेच्या वेळी, मॉर्टनने इथरचा यशस्वी वापर करून दाखवला. या वेळी भूल देण्यासाठी मॉर्टनने विशिष्ट प्रकारचे उपकरणही बनवून घेतले होते. यानंतर भूल देण्यासाठी अधिक परिणामकारक रसायनांचा वापर सुरू झाला असला, तरी मॉर्टनने केलेल्या इथरच्या या वापरापासून आधुनिक भूलशास्त्राच्या विकासाला सुरुवात झाल्याचे मानले जाते.
मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२
office@mavipamumbai.org