केरळ सरकारने १९७१मध्ये कोचीन विद्यापीठ स्थापन केले. विज्ञान-तंत्रज्ञानावर भर देण्यासाठी १९८६ मध्ये पुनर्रचना करून ‘कोचीन युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी’ (कोयुसाटे)असे नामांतर केले. १९९६मध्ये भौतिकीय समुद्रविज्ञान विभागाची निर्मिती झाली. विज्ञान-तंत्रज्ञानातील पदवी, पीएचडी, पोस्टडॉक्टोरलपर्यंत सैद्धांतिक, उपयोजित ज्ञानदान हे उद्देश ठेवण्यात आले.
कोयुसाटेच्या अद्ययावतीकरणात यूजीसी, डिपार्टमेंट ऑफ सायन्स टेक्नॉलॉजी, डिपार्टमेंट ऑफ बायोटेक्नॉलॉजीने मदत केली. केंद्र सरकारचे उच्चशिक्षण मंत्रालयही निधी पुरवते. नॉर्वे येथील नॅन्सेन पर्यावरण केंद्रासारख्या आंतरराष्ट्रीय संशोधन संस्थाही, भारत सरकारच्या देखरेखीखाली सामंजस्य करारबद्ध आहेत. या विभागाच्या माध्यमातून या क्षेत्रातील तज्ज्ञांच्या अनुभवाचा लाभ विद्यार्थ्यांना होतो. अन्य संस्थांनाही मनुष्यबळ उपलब्ध होते.
नव्या वैज्ञानिक धोरणानुसार केरळ सरकारने कोचीन विद्यापीठात ‘सेंटर फॉर इनोव्हेशन, टेक्नॉलॉजी ट्रान्सफर अँड इंडस्ट्री कोलॅबोरेशन’ स्थापन केले. या संस्थेच्या माध्यमातून उद्यमी युवांच्या सेवा-उत्पादनांच्या नवकल्पनांतून कारखाने, कार्यालये उभी राहण्यासाठी माहिती, प्रशिक्षण, तज्ज्ञांचे संपर्क आणि कर्ज इत्यादी सहकार्य पुरविले जाते.
भारताच्या किनाऱ्यापैकी १० टक्के किनारा केरळला लाभला आहे. देशाचे १५ टक्के सागरी मत्स्योत्पादन केरळमध्ये होते. साहजिकच विद्यापीठात, समुद्रविज्ञान विभाग महत्त्वाचा ठरतो. १९५८पासूनच कोचीन विद्यापीठ, समुद्रविज्ञान विषयशाखांत पदव्युत्तर शिक्षण देते. तिथे प्रशिक्षण घेऊन सागरी विज्ञान-तंत्रज्ञान पारंगत झालेल्या विद्यार्थ्यांनी जबाबदारीची पदे भूषविली आहेत. २००० साली विद्यापीठाने सागरी प्राण्यांच्या आरोग्यासाठी स्वतंत्र विभाग स्थापन केला. या विभागाच्या साहाय्याने व्यावसायिक, परसदारी वा शेततळी बांधून मासे, कोळंबी, माकुळसारखे प्राणी वाढवतात, विकतात.
कोचीन विद्यापीठ सागरी विज्ञानासंबंधी अन्यही अनेक सेवा देते. उदाहरणार्थ, भारतीय सागरी उद्योजकांना स्वामित्वहक्क मिळवून देणे, समुद्राची खोली मोजणे, पाण्यासारख्या पर्यावरणीय घटकांचे विश्लेषण करणे, पिण्यायोग्य पाण्यातील ई. कोलाय जिवाणूचे प्रमाण ठरवणे, रबरासारख्या बहुवारिकांच्या चाचण्या घेणे, कामगारांना प्रशिक्षण देणे, मृदापरीक्षण, कांदळवनांच्या पर्यावणावर अभ्यासपूर्ण अहवाल देणे, समुद्रातील तलस्थ व प्लवकांचे वर्गीकरण करणे, सागरी जीवांचे खाद्य असणारे शैवाल योग्य दर्जाचे व मुबलक मिळेल असे पाहणे, इत्यादी.
नारायण वाडदेकर ,मराठी विज्ञान परिषद
