नोम चॉमस्की हे नाव भाषाशास्त्रात अनेक अभिनव आणि क्रांतिकारी संकल्पनांशी जोडले जाते. त्यामुळे त्यांना आधुनिक भाषाशास्त्राचे जनक मानले जाते. भाषांची अंतर्गत संरचना जाणून घेण्यासाठी चॉमस्की यांनी तार्किक नियमांपासून वाक्यनिर्मिती करणाऱ्या नियमित, संदर्भमुक्त, संदर्भसंवेदक आणि अनिर्बंध अशा चार व्युत्पत्तीक्षम व्याकरणांचे (जनरेटिव्ह ग्रामर) प्रकार शोधले. ते चॉमस्की श्रेणी म्हणून ओळखले जातात. या वर्गीकरणामुळे संगणकीय भाषांची अभिव्यक्ती क्षमता आणि जटिलता यांची तुलना करता येते. संकलक (कंपायलर) निर्मितीसाठीही या श्रेणीचा उपयोग होतो. कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात नैसर्गिक भाषा प्रक्रियेत (नॅचरल लॅग्वेज प्रोसेसिंग) या व्युत्पत्तीक्षम व्याकरणाचा उपयोग होतो. भाषा आकलन आणि वैश्विक व्याकरण (युनिव्हर्सल ग्रामर) या त्यांच्या संकल्पनाही कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात अत्यंत उपयुक्त आहेत.

हेही वाचा >>> कुतूहल : व्यापक बुद्धिमत्ता प्राप्त होईल?

चॉमस्कींचे पूर्वकालीन अभ्यासक वर्तनवादी होते. त्यांच्या मते मूल जन्मताना त्याच्या मनाची पाटी कोरी असते. नंतर कानावर पडणारी भाषा ऐकून अनुकरणातून आणि प्रोत्साहनातून मूल भाषा आत्मसात करते. परंतु चॉमस्की यांनी भाषा शिकण्याची प्रक्रिया जाणून घेण्यासाठी वैश्विक व्याकरणाचा सिद्धांत मांडला. जगातील सर्व भाषांच्या मुळाशी समान मूलभूत व्याकरणाचे नियम असतात. प्रत्येक मानवी बालकाच्या जनुकात जन्मत:च ते साठवलेले असतात, असे चॉमस्की यांनी मांडले. कोणीही न शिकवता कानावर पडणारी शब्दसंपदा आणि हे अंगीभूत नियम वापरून मुले भाषा आपोआप शिकतात. पूर्वी न ऐकलेली आणि व्याकरणदृष्ट्या अचूक अशी असंख्य वाक्ये मूल सहज निर्माण करू शकते. असे हा सिद्धांत सांगतो. भाषा ही फक्त मानसशास्त्रीय पायावर आधारित नसून तिचा शरीरशास्त्र, मेंदूच्या संरचनेशी संबंध आहे, त्यामुळे कृत्रिम बुद्धिमत्तेची शरीरशास्त्र व न्यूरोसायन्स यांच्याशीही सांगड घालणे गरजेचे आहे हे चॉमस्की यांच्या सिद्धांतांमुळे अधोरेखित झाले.

हेही वाचा >>> कुतूहल : नैतिक आणि सामाजिक भान

चॉमस्की यांनी ‘चॅट जीपीटी’ हे फक्त उचलेगिरी करण्याचे तंत्रज्ञान असून नैतिकतेचा व विवेकी विचारांचा अभाव आहे, असे परखडपणे मांडून कृत्रिम बुद्धिमत्तेच्या त्रुटींवर अलीकडेच भाष्य केले आहे.

चॉमस्की (जन्म : १९२८) यांनी पेन्सेल्व्हिनिया विद्यापीठात शिक्षण घेतले आणि १९५५ मध्ये परिवर्तनीय व्याकरण या विषयातील संशोधनासाठी डॉक्टरेट मिळवली. सध्या ते एमआयटी व ओरिझोना विद्यापीठांमध्ये मानद प्राध्यापक आहेत. त्यांची विविध विषयांवर १५० पुस्तके आहेत. असंख्य पुरस्कारांनी गौरवलेल्या चॉमस्कींच्या विचारांचा ठसा संगणकशास्त्रापासून पुरातत्त्वशास्त्रापर्यंत, न्यूरोसायन्सपासून गणितापर्यंत सर्वदूर उमटला आहे.

प्रा. माणिक टेंबे,

मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org

संकेतस्थळ : http://www.mavipa.org