सव्वा वर्षापूर्वी चॅटजीपीटीने आपल्या आयुष्यात पदार्पण केले. तंत्रज्ञानाची ही झेप अप्रतिम होती. भाषेतील बारकाव्यांची जाण, तऱ्हेतऱ्हेचे लेखन, माहितीचा खजिना आणि त्यातली योग्य माहिती निवडून माणसाशी सुसंगत संवाद साधण्याचे सामर्थ्य – चॅटजीपीटीच्या क्षमता अचंबित करणाऱ्या होत्या. त्याचा हा आवाका पाहून व्यापक कृत्रिम बुद्धिमत्तेची वाट पाहाणाऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या.

पण तज्ज्ञांच्या मते तिथपर्यंत पोहोचण्यात चार-पाच मुख्य अडचणी आहेत. आइनस्टाइन या जगप्रसिद्ध शास्त्रज्ञाच्या मते बुद्धिमत्तेचे खरे लक्षण ज्ञान नसून कल्पनाशक्ती आहे. माणसाकडे अफाट कल्पनाशक्ती असते. काही नवे घडवायची सर्जनशीलता असते. ही सर्जनशीलता चित्र, शिल्प, वादन, नर्तन अशा कलांमधून प्रत्ययाला येते. या बाबतीत कृत्रिम बुद्धिमत्ता थोडी अनुकरण करणारी आहे. तिच्यात अजून उस्फूर्तपणे नवनिर्मिती करण्याची क्षमता आलेली नाही. एखादा माणूस कोणतेही शिक्षण न घेता उस्फूर्तपणे गाऊ शकतो. कृत्रिम बुद्धिमत्तेला मात्र ते शिकावे लागते.

Loksatta kutuhal Limitations of learning
कुतूहल: सखोल शिक्षणाच्या मर्यादा
kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !
Guru Gochar 2024
गुरु कृतिका नक्षत्रात करणार प्रवेश, या राशींच्या लोकांचा होईल भाग्योदय, धन-संपत्तीत होईल चांगली वाढ
Extraordinary women who make everyday life easier for common people
सर्वसामान्यांचे दैनंदिन जीवन सुकर करणाऱ्या ‘असामान्य स्त्रिया’

एका अभ्यासानुसार २०३२पर्यंत आपण व्यापक कृत्रिम बुद्धिमत्ता मिळवू शकतो. तर दुसऱ्या अंदाजाप्रमाणे २०५९पर्यंत ही पायरी गाठण्याची ५० टक्के शक्यता आहे. इतके भिन्न आडाखे पाहून आश्चर्य वाटेल, पण त्यामागे तशीच कारणे आहेत. माणूस परिस्थितीशी जुळवून घेतो. नवे आचार सहजी आत्मसात करतो. तिथे कृत्रिम बुद्धिमत्ता अजून मागे आहे. संवाद करताना समोरच्या व्यक्तीच्या भावना समजून घेणे यातही कृत्रिम बुद्धिमत्तेला खूप पुढे जायचं आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे व्यवहारज्ञान किंवा कॉमन सेन्स. टोमॅटो फळ आहे हे ज्ञान तर ते फ्रूट सॅलडमध्ये घालू नये हे झाले व्यवहारज्ञान. माणूस अनेकदा व्यवहारज्ञान वापरून समर्पक निर्णय घेऊ शकतो. तिथेही कृत्रिम बुद्धिमत्तेला शिकण्याला भरपूर वाव आहे.

असे म्हणता येईल, की ज्या संकल्पना आपल्याला पूर्णपणे काटेकोर व्याख्येत आणि गणिती मॉडेलमध्ये बसवता येत नाहीत, त्या कृत्रिम बुद्धिमत्तेत अजून आलेल्या नाहीत. याच कारणाने काही तज्ज्ञ म्हणतात की आजपर्यंत आपण ज्या मार्गाने चाललो, तो पुरेसा नाही. एखादी अनपेक्षित, अभूतपूर्व कल्पनाच आपल्याला व्यापक कृत्रिम बुद्धिमत्तेकडे नेऊ शकेल आणि त्यासाठी किती वेळ लागेल सांगणे कठीण आहे. व्यापक कृत्रिम बुद्धिमत्ता प्रत्यक्षात आली, तर त्याहूनही अधिक अशी परिपूर्ण (सुपर) कृत्रिम बुद्धिमत्ता दूर नसेल.

– डॉ. मेघश्री दळवी 
मराठी विज्ञान परिषद
ईमेल: office@mavipa.org 
संकेतस्थळ: http://www.mavipa.org