बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्या ‘कोस्टल रोड’ प्रकल्पामुळे बऱ्याच ठिकाणच्या सागरी जीवांच्या विस्थापनाचा प्रश्न निर्माण झाला. यावर संवर्धनात्मक उपाय म्हणून ३२९ जिवंत प्रवाळ वसाहतींपैकी ३०३ वसाहती हाजी अलीच्या किनारी खाडीमधून नेव्ही नगर येथे प्रस्थापित करण्यात आल्या. नोव्हेंबर २०२० मध्ये या ९२ टक्के वसाहती हलवण्यासाठी सागरी जीवशास्त्रज्ञ खूप काम करत होते. या घटनेला एक वर्ष झाल्यानंतर राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेच्या संशोधन अहवालानुसार या वसाहतीतील प्रवाळ चांगल्या आरोग्यपूर्ण परिस्थितीत आहेत, असे सांगण्यात आले आहे. यामध्ये फॉल्स पिलो प्रवाळ, ब्लॅकेंड कप प्रवाळ, व्‍‌र्हेील्ली कप प्रवाळ, फॉल्स आणि साधे फ्लॉवरपॉट प्रवाळ, पोराईट प्रजाती, बन्र्ट कप प्रवाळ आणि समुद्र व्याजन (सी फॅन) अशा अनेक महत्त्वाच्या प्रजाती आहेत. प्रदूषणाने आणि भरावाने पर्यावरणाची हानी होत असतानाही निसर्गातल्या प्रवाळ प्रजातींनी आपले अस्तित्व टिकवून ठेवले. झुझान्थेल्ले हे सूक्ष्मशैवाल प्रवाळांबरोबर सहजीवनात राहत असल्यामुळे प्रवाळ निसर्गत:च रंगीबेरंगी दिसतात. प्रकाशसंश्लेषणात तयार होणारी पोषकद्रव्ये व ऑक्सिजन; हे जीव आश्रयदात्या प्रवाळाला देतात. ज्यावेळी प्रदूषण तसेच वाढीव तापमान किंवा बदलती क्षारता अशा पर्यावरणीय बदलाला प्रवाळ सामोरे जातात, तेव्हा आपल्या सोबत राहणाऱ्या झुझान्थेल्ले या शैवालाबरोबर ते फारकत घेतात. त्यामुळे देखील त्यांचा रंग पांढुरका पडतो. अशी ब्लीच झालेली प्रवाळे रोगास बळी पडून मरतात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> कुतूहल: प्रवाळांच्या वाढीसाठी आवश्यक घटक

गेली चार-पाच वर्षे या किनारी महामार्गासाठी मुंबईच्या पश्चिम किनाऱ्यावर ठिकठिकाणी भराव घालण्यात येत होते. हाजीअली दग्र्यापासून ४०० मीटरवर असलेल्या प्रवाळ वसाहती वाचवणे फार महत्त्वाचे होते. गेल्या वर्षी केलेल्या पाहणीत प्रवाळाच्या २२ नव्या प्रजाती, प्रस्थापित केलेल्या वसाहतींच्या सोबतच नव्याने आढळून आल्या. विविध १८४ दगड आणि बोल्डर्सना डकवलेल्या प्रवाळ वसाहतींपैकी ११ वसाहती जगू शकल्या नाहीत आणि इतर काही पांढुरक्या पडल्या.

या महत्त्वाच्या कामात ‘कांदळवन प्रतिष्ठान’, ‘वनमंत्रालय’ या संशोधन संस्थेने जबाबदारीने कार्य पार पाडले आहे. डिसेंबर २०२० पासून नोव्हेंबर २०२१ पर्यंतची प्रवाळविषयक माहिती नियमितपणे संपादित करण्यात येत होती. सध्या जगलेल्या प्रवाळ भित्तिकांना ‘अर्बन रीफ’ असे नाव दिले आहे. याच पद्धतीने महाराष्ट्राच्या विविध प्रवाळ प्रजाती टिकवण्याचा प्रयत्न केला जात आहे.

– डॉ. नंदिनी विनय देशमुख

मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org

संकेतस्थळ : www.mavipa.org

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Live coral colonies translocated from the haji ali bay to navy nagar zws