पेशींचा आद्यागुणविशेष, सूक्ष्मजीवांचे मूलभूत गुणधर्म आणि संदर्भ मानके हे सर्व काळाच्या वादळातूनही अक्षय राहावे, यासाठी विज्ञानाला सुरक्षित कोषाची आवश्यकता भासते. ही दृष्टी १९२५ मध्ये वास्तवात उतरली ‘अमेरिकन टाईप कल्चर कलेक्शन’ (एटीसीसी) या रूपाने. एटीसीसी हे जगातील प्रत्येक जैवसंशोधकाला विश्वासार्ह, प्रमाणित व मानकीकृत जैवसंपदा देण्याच्या ध्येयाने कार्यरत असलेले एक ना-नफा, पण अमूल्य जागतिक केंद्र आहे.
ही महायात्रा सुरू झाली १९२२ मध्ये, जेव्हा लोर ए. रॉजर्स यांनी ‘अमेरिकन म्युझियम ऑफ नॅचरल हिस्ट्री’तील मुख्य संग्रह एका छोट्याशा सुटकेसमध्ये उचलून वॉशिंग्टन डी.सी.च्या ‘आर्मी मेडिकल म्युझियम’कडे नेला. १९२५ मध्ये या अंकुराला पहिले अधिकृत आश्रयस्थान शिकागो येथील ‘जॉन मॅकॉर्मिक इन्स्टिट्यूट’मध्ये मिळाले. ‘रॉकफेलर फाऊंडेशन’च्या अनुदानाच्या आधाराने या प्रवासाला नवे चैतन्य लाभले.
एटीसीसीची वैशिष्ट्ये म्हणजे पेशीसंवर्धनातील काटेकोरपणा, आनुवंशिक विचलन टाळण्यासाठी गुणवत्ता नियंत्रण, उत्पादन पद्धतीचा (सीडलॉट रणनीतींचा) अवलंब करणे आणि प्रत्येक टप्प्याची विलक्षण अचूकतेने नोंद ठेवणे. आज या संस्थेत मानव व प्राणीपेशीरेषा (सेल लाइन्स), मूलभूत पेशी, हायब्रिडोमा, जीवाणू, बुरशी, यीस्ट, विषाणू, प्रोटिस्ट आणि न्यूक्लीक आम्लपर्यंतची संपन्न जैवविविधता तिच्या भांडारात सुरक्षित विसावलेली आहे.
अलीकडच्या वर्षांत एटीसीसीने ‘डेटा टू व्हायल’ ही अभिनव संकल्पना पुढे आणली. क्लाउड-आधारित एटीसीसी जीनोम पोर्टलच्या माध्यमातून संशोधकांना प्रमाणित व अनुसरणीय अशा संदर्भ-जीनोम्सना थेट प्रमाणित प्रजातींपासून प्राप्त झालेल्या स्वरूपात प्रवेश मिळू लागला. भौतिक व्हायल्स आणि सूक्ष्मपणे संकलित केलेली अनुक्रम माहिती यांतील हे एकास-एक बंधन जणू शास्त्रीय पारदर्शकतेची शृंखला ठरते; ज्यामुळे प्रत्येक टप्प्यावर मागोवा घेणे शक्य होते.
आजची एटीसीसी ही विविध सेवांचे, मानकांचे व आरोग्य भागीदारींचे केंद्रस्थान आहे. फेडरल सोल्युशन्स या उपक्रमांतर्गत एटीसीसी अमेरिकेतील विविध संस्थांशी जैवसंरक्षण व रोगसंशोधन या क्षेत्रांत सहकार्य करते. तसेच बी.ई.आय रिसोर्सेसचे संचालन करते. तिच्या कार्यक्षेत्राचा विस्तार मॅनॅसस, व्हर्जिनिया येथे उत्पादन व वितरणकेंद्रांपर्यंत पोहोचतो. गॅथर्सबर्ग व जर्मनटाउन, मेरीलँड येथे त्यांची संशोधन व विकासकेंद्रे कार्यरत आहेत. येथे त्रिमितीय ऑर्गनॉइड्स, ल्युसिफेरेज रिपोर्टर सेललाइन्स, तसेच क्रिस्पर-संशोधित आयसोजेनिक मॉडेल्स यांचा अभ्यास होतो.
एटीसीसीने केलेला प्रवास म्हणजे जणू विज्ञानातील एक जिवंत वारसा होय… जो सूक्ष्मजगताचे संवर्धन करीत, विज्ञानाला पुढे नेणारा सुवर्णमानक ठरतो.
– डॉ. गिरीश महाजन मराठी विज्ञान परिषद
ईमेल : office@mavipa.org
संकेतस्थळ : http://www.mavipa.org
