कृत्रिम बुद्धिमत्तेने कळत नकळत आपल्या जीवनात प्रवेश केला आहे. आपल्यासारख्या सामान्य माणसांच्या रोजच्या जीवनापासून ते विज्ञान-तंत्रज्ञानातील जटिल कार्यासाठी आता कृत्रिम बुद्धिमत्तेचा सर्रास वापर होत आहे. एव्हढेच नव्हे तर दिवसागणिक त्याच्या वापराची व्याप्ती वाढत चाललेली आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि विज्ञान-तंत्रज्ञानातील बिनीची क्षेत्रे मिळून आता चौथी औद्योगिक क्रांतीच घडवून आणताहेत असे म्हटले जात आहे.

पण मुळात औद्योगिक क्रांती म्हणजे काय आणि याआधीच्या तीन औद्योगिक क्रांती कोणत्या त्याचा आपण थोडक्यात परामर्श घेऊ या. विज्ञान आणि तंत्रज्ञान यांच्यातील नवनवीन शोधांमुळे जेव्हा उद्योग, धंदे किंवा व्यवसाय यांच्यात, त्याचप्रमाणे आपली जीवनशैली, कार्यशैली, राहणीमान आणि विचारशैली हे जेव्हा आमूलाग्र बदलून जाते तेव्हा त्याला औद्योगिक क्रांती म्हणतात. या सगळय़ा गोष्टी समाजरचनेचा (सोशल ऑर्डर) आणि अर्थव्यवस्थेचा (इकॉनॉमी) पाया असल्यामुळे त्यांच्यातील आमूलाग्र बदल हा सामाजिक व्यवस्थेत प्रचंड उलथापालथ घडवून आणतो.

याचे अत्यंत ठळक उदाहरण म्हणजे पहिली औद्योगिक क्रांती. या क्रांतीला सुरुवात झाली साधारणपणे अठराव्या शतकाच्या मध्यापासून. तोपर्यंत अर्थव्यवस्थेचा पाया मुख्यत्वेकरून शेती आणि संबंधित छोटेमोठे धंदे हा होता. मानव शेती आणि त्याला लागणाऱ्या शेतीच्या किंवा घरगुती वापराच्या जरुरी वस्तूंचे, पदार्थाचे आणि अवजारांचे उत्पादन आपल्या वैयक्तिक शक्तीने, सांघिक शक्तीने आणि जनावरांचा वापर करून करीत होता. पण सुमारे १७६० पासून हे चित्र बदलायला सुरुवात झाली.

झपाटय़ाने होणाऱ्या या बदलाचे ‘औद्योगिक क्रांती’ असे नामकरण १७९९मध्ये लुई गियुम-ओटो या फ्रेंच राजदूताने केले. या क्रांतीचा पाया रचला वाफेच्या शक्तीने. वाफेवर चालणाऱ्या इंजिनाने मानवजातीला ‘कृत्रिम शक्ती’ दिली! पूर्वी माणूस हाताने किंवा जनावरांच्या शक्तीच्या साहाय्याने करीत असलेली कामे आता या इंजिनाच्या साहाय्याने सहज आणि अत्यंत कमी वेळात होऊ लागली. साहजिकच याचा वापर नवनव्या क्षेत्रांमध्ये होऊ लागला, विविध यंत्रे निर्माण करण्यात येऊ लागली आणि त्यांच्या साहाय्याने यांत्रिकीकरणातून मोठय़ा प्रमाणावर उत्पादन (मास प्रॉडक्शन) ही संकल्पना अस्तित्वात आली. कारखाने उभे राहिले. समाजरचनेचा आणि अर्थव्यवस्थेचा शेती हा पाया नष्ट होऊन त्याची जागा उद्योगाने (इंडस्ट्री) घेतली. इतिहासकार या पहिल्या औद्योगिक क्रांतीचा काळ १७६० पासून ते १८३० पर्यंत मानतात.

शशिकांत धारणे ,मराठी विज्ञान परिषद