परिपूर्ण बुद्धिमत्ता कशासाठी हवी याचे एक उत्तर सरळ व्यावहारिक आहे. माणसाच्या शारीरिक आणि बौद्धिक मर्यादेपलीकडील कामे करून घेण्यासाठी. आज जग नाना अडचणींना तोंड देत आहे. त्यात हवामान बदलापासून महासाथींचा धोका, प्रदूषण अशा अनेक जटिल समस्यांचा समावेश आहे. सोबत अवकाशाचा विस्तार, पृथ्वीवर सजीवांची उत्पत्ती कशी झाली असेल, अणूच्या अंतरंगात आणखी किती गूढ गोष्टी आहेत, विश्वातील बलांचा परस्पर संबंध, अशा मूलभूत प्रश्नांची उत्तरे आपण शोधतो आहोत. या सगळ्यात परिपूर्ण बुद्धिमत्तेचा उपयोग होईल.

परिपूर्ण बुद्धिमत्ता जलदगतीने आणि अधिक अचूकपणे माहितीचे विश्लेषण करेल. सुरक्षा, उत्पादकता आणि कार्यक्षमता यात कायम माणसाच्या कैकपट सरस असेल. त्यामुळे अवकाश संशोधन, आरोग्य, शेती, अर्थकारण, पर्यावरण, संशोधन, ऊर्जानिर्मिती, उद्याोगधंदे आणि इतर अनेक क्षेत्रांमध्ये झपाट्याने प्रगती करून दाखवेल.

हेही वाचा >>> कुतूहल: परिपूर्ण बुद्धिमत्तेमागील तंत्रज्ञान

वैद्याक आणि औषधशास्त्र या शाखांमध्ये परिपूर्ण बुद्धिमत्तेमुळे मोठ्या क्रांतीची अपेक्षा आहे. आज उपलब्ध असलेली मर्यादित कृत्रिम बुद्धिमत्ता कर्करोगासारख्या रोगांचे निदान अधिक वेगाने करू शकते. मूत्रपिंडाच्या आजाराचा इशारा दोन दिवस आधीच देऊ शकते. परिपूर्ण बुद्धिमत्ता अशी कामे हजारो-लाखो रुग्णांसाठी करू शकेल. प्रतिबंधात्मक आणि उपचारात्मक उपाय सुचवेल. इतकेच काय तर त्यातील काही रोगांसाठी खात्रीचे उपचार शोधण्यात मदत करू शकेल. आधुनिक औषधांनी अनेक आजार नियंत्रणात आणले असले तरी काही अजूनही असाध्य आहेत. परिपूर्ण बुद्धिमत्ता त्यावरच्या संशोधनात प्रचंड उपयोगी ठरेल. अत्यंत अचूक आणि काटेकोरपणे योग्य जागी औषध पुरवण्यातही (ड्रग डिलिव्हरी) नॅनोबॉट्सना परिपूर्ण बुद्धिमत्तेची साथ मिळेल.

उत्पादन आणि वितरणव्यवस्था क्षेत्रात हातात कमी वेळ असताना वेगाने अचूक निर्णय घेणे आवश्यक असते. परिपूर्ण बुद्धिमत्ता प्रणाली विचार करणे, समस्या सोडवणे आणि निर्णय घेणे यात अत्यंत प्रवीण असेल आणि अशी कामे लीलया हाताळू शकेल. मानवी आणि परिपूर्ण कृत्रिम बुद्धिमत्ता या क्षेत्रात एकत्र काम करू लागल्या तर चुका कमी होतील, कार्यक्षमता वाढेल आणि माणसांवरचा ताण कमी होईल.

हवामान आणि पर्यावरण यात शेकडो गोष्टी एकमेकांवर अवलंबून असतात. तिथे परिपूर्ण बुद्धिमत्ता माणसाला साथ देऊन कारणमीमांसा, अचूक अंदाज, आणि योग्य उपाय सुचवू शकेल. मूलभूत संशोधनास नवी दिशा देऊ शकेल. म्हणूनच २४ तास अफाट क्षमतेने काम करणाऱ्या परिपूर्ण कृत्रिम बुद्धिमत्तेसाठी संशोधकांचे प्रयत्न सुरू आहेत.

– डॉ. मेघश्री दळवी

मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org

संकेतस्थळ : http://www.mavipa.org