प्राण्याच्या रक्ताचा दाब मोजण्याचा पहिला प्रयत्न स्टिफन हेल्स या इंग्लंडमधील संशोधकाने १७१९ साली केला. हा प्रयोग त्याने मेजावर बांधून ठेवलेल्या एका घोडय़ावर केला. यासाठी त्याने एक सुमारे चार मिलीमीटर व्यासाची, पावणेतीन मीटर उंचीची काचेची नळी घेतली. त्याला खालच्या बाजूस एक पितळेची नळी जोडली. त्यानंतर ही पितळेची नळी त्याने प्रत्यक्ष घोडय़ाच्या रक्तवाहिनीला जोडली. त्याबरोबर त्या रक्तवाहिनीतून या काचेच्या नळीत सुमारे अडीच मीटर उंचीचा रक्ताचा फवारा उडाला. या फवाऱ्याची उंची घोडय़ाच्या हृदयाच्या स्पंदनानुसार आठ-दहा सेंटिमीटर वरखाली होत होती.
रक्तदाबाच्या या काहीशा ढोबळ मापनानंतर सुमारे शंभर वर्षांनी पाऱ्याच्या मदतीने दाब मोजण्याचा प्रयत्न जिया प्वाझ्ये या फ्रेंच वैद्यकतज्ज्ञाने केला. प्वाझ्येने प्राण्यांच्या धमन्यांमध्ये थेट नळी जोडून ती पाऱ्याच्या दाबमापकास जोडली आणि रक्तदाबाचे मापन केले. अगदी दोन मिलीमीटर व्यासाच्या रक्तवाहिन्यांतील रक्तसुद्धा दाबाखाली असते हे त्याने दाखवून दिले. फ्रेंच शल्यतज्ज्ञ फाइव्हर याने १८५६ साली एका रुग्णाच्या मांडीची रक्तवाहिनी पाऱ्याच्या उपकरणाला जोडली आणि थेट रक्तवाहिनीतील रक्तदाब मोजला. हा रक्तदाब १२० मिलीमीटर भरला. यामुळे मानवी शरीरातील सर्वसाधारण रक्तदाबाची पातळी पहिल्यांदा समजली.
दरम्यान १८५५ साली कार्ल फॉन व्हिएरोर्डट याने कोणतीही इजा न करता रक्तदाब मोजण्यासाठी वेगळी कल्पना सुचवली. ही कल्पना अशी की, रक्तवाहिनीवर बाहेरून बरोब्बर इतका दाब निर्माण करायचा की रक्तवाहिनीत जाणवणारी स्पंदने थांबतील. हा दाब म्हणजेच रक्तदाब. १८८० सालच्या दशकात सॅम्युएल बाश या ऑस्ट्रियन वैद्यकतज्ज्ञाने व्हिएरोर्डटच्या कल्पनेनुसार असे साधन तयार केले. या साधनात पाण्याने भरलेली पिशवी रुग्णाच्या रक्तवाहिनीवर दाबून रक्तस्पंदने थांबवली जायची आणि त्या पिशवीवर दिलेल्या दाबाची रक्तदाब म्हणून नोंद केली जायची. १८९६ साली इटलीच्या रिवा रॉसि याने याच तंत्रास पुढे नेले. त्याने रुग्णाच्या संपूर्ण दंडाला एक पट्टा लपेटून त्याभोवती रबराची पिशवी बसवली. रक्तवाहिन्यांतील स्पंदने थांबेपर्यंत या पिशवीत हवा भरली. त्यानंतर पट्टय़ावरचा दाब पाऱ्याच्या दाबमापकाने मोजला. त्यानंतर १९०५ सालापासून रक्तदाब मोजताना, रक्तवाहिनीतील स्पंदने जाणण्यासाठी स्टेथॅस्कोपचीही मदत होऊ लागली. त्यामुळे हृदयाच्या स्पंदनांच्या वेळचा (सिस्टॉलिक) आणि स्पंदनांदरम्यानचा (डायस्टॉलिक) रक्तदाबही कळू लागला.
डॉ. अंजली कुलकर्णी
मराठी विज्ञान परिषद,वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२ office@mavipamumbai.org