डॉ. जया विकास कुऱ्हेकर
रॉयल सोसायटी ऑफ लंडन १६६० साली उदयाला आली. ५ नोव्हेंबर १६६१ रोजी असा प्रस्ताव मांडण्यात आला की रॉयल सोसायटीत प्रयोगांची मांडणी व फेरतपासणी करण्यासाठी कोणाची तरी पूर्णवेळ नियुक्ती करावी. प्रस्ताव एकमताने मान्य झाला आणि १२ नोव्हेंबर १६६१ रोजी रॉबर्ट हुक यांची नियुक्ती झाली. ११ जानेवारी १६६५ रोजी रॉबर्ट हुक यांची संग्रहालय प्रमुख या पदावर ३० पौंड पगारावर नियुक्ती केली गेली. बायोजेनेसीस विरुद्ध अबायोजेनेसीस हा वाद प्रायोगिक मांडणीतून तपासून पाहण्यासाठी एक भक्कम वैज्ञानिक व्यासपीठ निर्माण झाले.
१६६५ साली, त्यांनी स्वत: संयुक्त सूक्ष्मदर्शक तयार करून त्याखाली कीटक, स्पंज, ब्रायोझोन्स आणि फोरमेनिफेरा यांचे निरीक्षण केले. त्यातील सर्वांत प्रसिद्ध निरीक्षण म्हणजे त्याने बुचाच्या पातळ आडव्या छेदाचे केलेले निरीक्षण. या निरीक्षणात दिसलेल्या छिद्रांना त्यांनी ‘पेशी’ असे संबोधले. त्यांनी वनस्पतीच्या पेशींचा शोध लावला. त्यांनी पेशीच्या भित्तिकेचे निरीक्षण केले. पेशी (सेल) हा शब्दप्रयोगच मुळी त्यांनी सर्वप्रथम प्रचलित केला. बुचाच्या पातळ छेदाचे निरीक्षण करत असताना दिसलेल्या खोक्यांसारख्या रचनेची तुलना त्यांनी मॉनेस्ट्रीमधील खोल्यांशी केली आणि पेशीसाठी ‘सेल’ हा शब्दप्रयोग वापरला व तो पुढे जीवशास्त्रात रूढ झाला. अशीच रचना त्यांना लाकूड आणि वनस्पतीच्या छेदांत दिसून आली.
सूक्ष्मदर्शकाचा प्रायोगिक उपयोग ज्ञानाच्या कक्षा रुंदावण्यासाठी कसा करावा, हे रॉबर्ट हुक यांनी जगाला प्रथम सांगितले. रॉबर्ट हुक हे प्रामुख्याने त्यांच्या ‘मायक्रोग्राफिया’ या १६६५ साली प्रसिद्ध झालेल्या पुस्तकासाठी जगभर ओळखले जातात. यात त्यांनी दुर्बिणीतून आणि सूक्ष्मदर्शकाखाली केलेल्या निरीक्षणांचा सचित्र लेखाजोखा घेतला आहे.
भौतिकशास्त्र, निसर्ग तत्त्वज्ञान, खगोलशास्त्र, भूगर्भशास्त्र, हवामानशास्त्र आणि वास्तुशास्त्र असे त्यांच्या अभ्यासाचे विविध विषय होते. त्यांनी सूक्ष्मदर्शकाखाली शिरा आणि धमन्यांच्या रक्तातील फरक दाखवून दिला. अँटनी व्हॅन ल्युएनहॉक यांनी रॉयल सोसायटीला सादर केलेल्या पहिल्या सूक्ष्मदर्शकाचे आणि सूक्ष्मजीवांचे परीक्षण रॉबर्ट हुक यांनीच केले होते.
कालांतराने रॉबर्ट हुक रॉयल सोसायटीचे सचिव झाले. डिसेंबर १६९१ साली त्यांना भौतिकशास्त्राची विद्यावाचस्पती ही पदवी प्राप्त झाली. रॉबर्ट हुक यांचे काम न्यूटन आणि ह्युजेन यांच्या तोडीचे होते. त्यांच्या कार्यामुळे बायोजेनेसीस विचारधारेला (सजीवांची निर्मिती केवळ आधीपासून अस्तित्वात असलेल्या सजीवांपासूनच होते, अशी विचारधारा) गती प्राप्त झाली.
डॉ. जया विकास कुऱ्हेकर
मराठी विज्ञान परिषद
ईमेल : office@mavipa.org
संकेतस्थळ : http://www.mavipa.org