डॉ. अरुण इनामदार
एखाद्या ठिकाणची माहिती तिथे प्रत्यक्ष न जाता, किंवा त्या जागेच्या संपर्कात न येता ज्या विज्ञानशाखेच्या मदतीने मिळवतात, त्या विज्ञानशाखेला ‘सुदूर संवेदन’ (रिमोट सेन्सिंग) म्हणतात. अशा प्रकारचा अभ्यास प्रथम लष्करांकरिता झाला. जंगलातल्या झाडीत लपून बसलेल्या शत्रूला हुडकून काढण्यासाठी नामी उपाय म्हणून औष्णिक अवरक्त (थर्मल इन्फ्रारेड) कॅमेऱ्याचा उपयोग होऊ लागला. विमानातल्या कॅमेऱ्याने शत्रूच्या प्रदेशाची गुपचूप छायाचित्रे काढणे, असेही प्रयत्न झाले.
१९७०च्या दशकात अमेरिकेने अंतराळात पाठवलेल्या ‘लँडसॅट’ उपग्रहांनी या तंत्रज्ञानाला नवी दिशा दिली. या विज्ञानशाखेचा उपयोग नैसर्गिक संसाधनाचा आणि पर्यावरणाचा अभ्यास करण्यासाठी होऊ लागला. त्यातही आता खूप प्रगती झाली आहे. त्या वेळचे संवेदक (सेन्सर्स) ८० मीटरपेक्षा मोठ्या वस्तूंचीच माहिती देत. आजचे संवेदक एक मीटरहून लहान वस्तूंचीही तपशीलवार माहिती देतात. पूर्वी फक्त दृश्य प्रकाशलहरीच वापरता येत; आता त्याच्या अलीकडच्या अवरक्त (इन्फ्रारेड), आणि पलीकडच्या जंबुपार (अल्ट्राव्हायोलेट) किरणांचाही वापर करता येतो. आज शेकडो मानवनिर्मित उपग्रहांच्या पृथ्वीभोवती फेऱ्या चालू आहेत. त्यांच्याद्वारे दूर अंतराळातून केवळ पृथ्वीचा पृष्ठभाग, नैसर्गिक संसाधने आणि वातावरण यांच्याविषयीच नव्हे, तर पृथ्वीच्या अंतरंगांचीसुद्धा माहिती मिळत असते. ही माहिती देणारे उपग्रह हे जणू आपले अतिरिक्त डोळेच म्हणावे लागतील.
सुदूर संवेदनाचे दोन प्रमुख फायदे आहेत. पहिला म्हणजे जमिनीचे एक सर्वंकष दृश्य मिळते; तर दुसरा म्हणजे अतिदुर्गम प्रदेशाची माहिती मिळणे शक्य होते. भूविज्ञानाच्या बाबतीत तर एखाद्या क्षेत्राचे सर्वेक्षण करण्यासाठी सुदूर संवेदनाचा नुसता प्राथमिक माहिती मिळण्यापुरताच उपयोग होतो, असे नाही. तर तिथे मिळणाऱ्या एखाद्या खनिज-साठयाचा विस्तार किती असेल, जवळच दुसरीकडे तसाच साठा कुठे मिळू शकेल, याचाही अंदाज घेता येतो. कारण एकसारखे दिसणारे आणि रासायनिक गुणधर्म समान असणारे खडक या तंत्रज्ञानाद्वारे प्राप्त होणाऱ्या प्रतिमांमध्ये एकसारखे दिसतात. तसेच भूवैज्ञानिक तिथल्या पाषाणांच्या थरांमधल्या संरचना बारकाव्यांसकट व्यवस्थितपणे ओळखू शकतात. या दोन्ही बाबींचा उपयोग वेगवेगळ्या खनिजांचे साठे, किंवा भूजलाचे अस्तित्व कुठे आहे याचा पत्ता लागण्यासाठी होतो, आणि भूवैज्ञानिकांचा प्रत्यक्ष सर्वेक्षणाचा भार काहीसा हलका होतो. पण प्रत्यक्ष जाऊन प्रतिमांवरून मिळालेल्या माहितीची शहानिशा करणे मात्र अत्यावश्यक असते.
अमेरिका, फ्रान्स, इटली, चीन, जपानसारख्या मोजक्या प्रगत राष्ट्रांच्या बरोबरीने भारतही या क्षेत्रात सक्षमपणे काम करत आहे.
डॉ. अरुण इनामदार
मराठी विज्ञान परिषद
ईमेल : office@mavipa.org
संकेतस्थळ : http://www.mavipa.org