नीरज राऊत, लोकसत्ता

पालघर : जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरणाचे (जेएनपीए) सध्या सुरू असणारा विस्तारीकरण प्रकल्प एप्रिल २०२५ मध्ये पूर्णपणे कार्यरत होणार आहे. वाढवण बंदराची उभारणी झाल्यास पुढील १० वर्षांत १० लाख प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होणार असून महाराष्ट्राचे भविष्य पालघरमध्ये राहणार असल्याचे प्रतिपादन जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरणाचे अध्यक्ष उन्मेश वाघ यांनी केले.

जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरणाचा विस्तारीकरण प्रकल्प अंतिम टप्प्यात असून बंदरातील पद्धतींमधील कार्यक्षमता वाढवली तरी या बंदरात सध्या हाताळणी होणाऱ्या सुमारे साडेसहा दशलक्ष कंटेनरचे प्रमाण १० दशलक्षांपर्यंत पोहोचू शकेल अशी शक्यता आहे. अशा स्थितीत देशातील निर्यात व आयात क्षेत्रात होणारी वाढ व होणारा औद्योगिक विकास पाहता भविष्याच्या दृष्टिकोनातून वाढवण येथे बंदर उभारणी करणे आवश्यक झाल्याचे वाघ यांनी सांगितले. बंदराची आखणी करणे व संकल्पना करून प्रत्यक्ष उभारणी करण्याची प्रक्रिया ही सुमारे १० वर्षांची असल्याने या दृष्टीकोनातून बंदर उभारणीसाठी जोरदार प्रयत्न सुरू असल्याचे ते म्हणाले. वाढवण येथील प्रस्तावित बंदराला पर्यावरण विभागाची मान्यता मिळाली असून सार्वजनिक गुंतवणूक मंडळाची मंजुरी अद्याप मिळालेली नाही. सध्या निवडणूक आचारसंहिता असल्याने मंत्रिमंडळाकडून परवानगी मिळू शकली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा >>> डॉ. हेमंत सवरा यांना पालघरमधून भाजपाचे तिकीट

जेएनपीए येथे सध्या १५ मीटरची खोली प्राप्त असून त्या ठिकाणी १७ हजार कंटेनर क्षमता असणाऱ्या जहाजांची नांगरणी होणे शक्य होणार आहे. मात्र वाढवण येथे १८ ते २० मीटरची नैसर्गिक खोली प्राप्त असून २४ हजार कंटेनर क्षमतेपेक्षा अधिक जहाजांची बंदरात नांगरणी शक्य होणार असून त्यामुळे भारताची सिंगापूर, कोलंबो व इतर आंतरराष्ट्रीय बंदरांवरील अवलंबता संपुष्टात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

पालघर परिसराचा विकास

बंदर उभारणीला केंद्र सरकारची परवानगी मिळाल्यानंतर याच परिसरात अद्ययावत रुग्णालय व ट्रॉमा केअर सेंटरच्या उभारणी होणार आहे.

न्हावाशेवाच्या तुलनेत वाढवण येथे ४३ टक्के जागा उपलब्ध असल्याने जागेचा प्रभावी वापर करण्यासाठी बंदर प्रकल्प आखणी करण्यात आली आहे.

निवडणूक आचारसंहिता संपल्यानंतर पालघर, डहाणू तालुक्यातील स्थानिकांसाठी कौशल्य प्रशिक्षणाचे काम हाती घेण्यात येणार आहे.

प्राधिकरणाच्या आवारात माफक दरात मध्यवर्ती पार्किंग वाहनतळ उभारणी झाली असून वाहन चालकांसाठी विनामूल्य आरोग्य सेवा व माफक दरात भोजनाची व्यवस्था सुरू आहे.

परिसरातील गावांमध्ये उच्च दर्जाच्या शैक्षणिक सुविधा व सामाजिक दायित्व विभागातर्फे विकास योजना राबवण्याचे उपक्रम सुरू आहेत.

जेएनपीएकडून प्राप्त झालेली अनुभवाची शिदोरी घेऊन वाढवण येथे मानवी चेहऱ्यासह विकास साधण्याचा प्रयत्न करण्यात येणार असून या विकासात कृत्रिम बुद्धिमत्तेची जोड देण्यात येणार आहे.

पाण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था

वाढवण येथील प्रस्तावित बंदराच्या ठिकाणी व नियोजित कर्मचारी वसाहतीसाठी आरंभी दोन दशलक्ष लिटर प्रतिदिन व नंतर सुमारे सहा दशलक्ष लिटर पाण्याची आवश्यकता भासणार आहे. अस्तित्वात असणाऱ्या पाटबंधारे प्रकल्पात किंवा समुद्रात वाया जाणाऱ्या पाण्याची साठवणूक करण्यासाठी नव्याने व्यवस्था आखण्यात येणार असून त्यासाठी लागणारा खर्च जेएनपीए उचलणार आहे.