पालघर : गेल्या साडेपाच वर्षांत जिल्ह्यात झालेल्या सुमारे सव्वा लाख प्रसूतींपैकी १४८९ प्रसूती या १०८ सेवेतील रुग्णवाहिकेत झाल्याची माहिती पुढे आली आहे. यामुळे पालघर जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा पूर्णत: सक्षम नसल्याचे हुन्हा आधोरेखित झाले आहे.
गरोदर महिलांची संस्थात्मक प्रसूती व्हावी यासाठी प्रशासन प्रयत्नशील असताना जोखीम घेण्यास वैद्यकीय अधिकाऱ्यांचा अनुभव कमी पडत असल्याने अथवा काही ठिकाणी कर्तव्यामध्ये चुकारपणा दाखवला जात असल्याने धावत्या रुग्णवाहिकेत प्रसूती होण्याचे प्रकार घडत आहेत. दरम्यान, आता असे प्रकार कमी करण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्याची योजना जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने हाती घेतली आहे.
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत रुग्णांना विनामूल्य १०८ प्रणालीच्या रुग्णवाहिका सेवा पुरवली जाते. मार्च २०२० पासून ऑगस्ट २०२५ पर्यंत पालघर जिल्ह्यात १०८ प्रणालीच्या एकूण २९ रुग्णवाहिका कार्यरत असून अशा रुग्णवाहिकेद्वारे करोनाबाधित ७३५५ रुग्णांची तसेच साडेपाच वर्षांच्या कालावधीत दोन लाख ७१ हजार इतर रुग्णांची सेवा झाली आहे. त्यापैकी १४८९ गरोदर महिलांना एका आरोग्य संस्थेतून दुसऱ्या आरोग्य संस्थेत हलविताना त्यांची प्रसूती झाल्याची माहिती पुढे आली आहे.
पालघर जिल्ह्यात दरवर्षी सुमारे २७ हजार प्रसुती होत असून त्यापैकी २२ हजार प्रसूती या शासकीय सेवेतील शल्य चिकित्सक (६० टक्के) व प्राथमिक आरोग्य केंद्र (४० टक्के) येथे होत असतात. त्यामुळे पाच वर्षांत झालेल्या एकूण प्रसूतींच्या सुमारे एक टक्का प्रसूती या रुग्णवाहिकेत गरोदर मातांच्या स्थलांतराच्या वेळी झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
प्रशासनाचे म्हणणे…
पालघरचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष चौधरी यांच्याशी संपर्क साधला असता काही वर्षांपूर्वी वैद्यकीय अधिकाऱ्यांची कमतरता असल्याने अनेक प्राथमिक आरोग्य केंद्रात पुरेशा प्रमाणात मनुष्यबळ व व्यवस्था नसल्याने जोखीम असणाऱ्या मातांना अधिक सुविधा असणाऱ्या ग्रामीण रुग्णालयासारख्या आरोग्य केंद्राकडे पाठवले जात असे. मात्र आता जिल्ह्यातील सर्व ४६ प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये सामान्य प्रसूती करण्यासाठी आवश्यक सुविधा पुरवल्या गेल्या असून फक्त जोखीम मातांना ग्रामीण रुग्णालय अथवा उपजिल्हा रुग्णालयाकडे पाठविण्यात येते, असे त्यांनी सांगितले.
वरिष्ठ आरोग्य संस्थांकडे पुढील उपचारासाठी पाठवण्यात येणाऱ्या मातांची माहिती घेऊन त्याचे लेखापरीक्षण केले जात असून हलगर्जी दर्शवणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या विरुद्ध कारवाई करण्याचे जिल्हा प्रशासनातर्फे सुरू करण्यात आले आहे. जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात असणाऱ्या अनेक वैद्यकीय अधिकाऱ्यांचा अनुभव मर्यादित असल्याने त्यांच्यासाठी विशेष प्रशिक्षणदेखील आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
रुग्णसेवा अधिक प्रभावी करण्यासाठी प्रयत्न
सध्या जिल्ह्यात २६ जानेवारी २०१४ पासून कार्यरत असणाऱ्या १०८ प्रणालीच्या २९ रुग्णवाहिकांना १२ वर्षांचा कार्यकाळ झाला असून काही रुग्णवाहिकांची परिस्थिती बिकट आहे. जिल्ह्यातील ही रुग्णवाहिका सेवा अधिक बळकट करण्यासाठी ७५ रुग्णवाहिकांची मागणी करण्यात आली असून अशा रुग्णवाहिका उपलब्ध झाल्यास जिल्ह्यात अधिक प्रभावी सेवा पुरवणे शक्य होईल, असे या रुग्णवाहिका प्रणालीचे जिल्हा समन्वयक डॉ. अब्दुल खान यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.
मार्च २०२० ते ऑगस्ट २०२५ रुग्णवाहिकेतुन वाहतूक झालेली रुग्ण संख्या :
रुग्णांचे प्रकार रुग्णांची संख्या
वाहन अपघात : ९६६८
हल्ला : ११५७
जळने : ७६१
हृदयरोग : २१४२
पडणे : ४७१६
विषबाधा : ५९९१
प्रसूती ४९७०८
विजेचा : धक्का ७६
वैद्यकीय समस्या : १७०१९६
इतर : १८९४७
अनेक विकार : ७९११
आत्महत्या : १७४
एकूण : २७१४४७
रुग्णवाहिकेत प्रसूती : १४८९