बोईसर: आशिया खंडातील सर्वात मोठी औद्योगिक वसाहत म्हणून ओळख असलेल्या तारापूर औद्योगिक क्षेत्रात वाढत्या अपघाती घटनांचा प्रश्न गंभीर बनला आहे. गेल्या पाच वर्षात औद्योगिक क्षेत्रातील कारखान्यांमध्ये ९१ अपघात नोंदवले गेले असून यामध्ये ४८ कामगारांचा बळी गेला आहे तर ९० कामगार गंभीर जखमी झाले आहेत.

आशिया खंडातील सर्वात मोठी औद्योगिक वसाहत म्हणून तारापूरची ओळख आहे. तारापुर बोईसर औद्योगिक क्षेत्रात अतीधोकादायक, धोकादायक, रासायगिक व इतर एकूण १०४५ कारखाने

 नोंदणीकृत आहेत. प्रामुख्याने रासायनिक, औषधे कापड आणि पोलादावर प्रक्रिया करणाऱ्या कारखान्यांचा यामध्ये समावेश असून जवळपास दोन लाख कामगार आणि अधिकारी वर्ग यामध्ये काम करीत आहेत. औद्योगिक क्षेत्रामुळे परिसराची आर्थिक आणि सामाजिक भरभराट झाली असली तरी औद्योगिक क्षेत्रात आग, वायुगळती आणि स्फोट यासारखे अपघाती घटनांमुळे कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. मागील पाच वर्षात औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचलनालयाकडे ९१ अपघाती घटनांची नोंद करण्यात आली आहे. या अपघातांमध्ये ४८ कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून ९१ कामगार गंभीररीत्या जखमी झाले आहेत.

औद्योगिक कारखान्यांमध्ये अपघात होण्यामागे यांत्रिक बिघाड, मानवी निष्काळजीपणा, चुकीचे प्रशिक्षण आणि असुरक्षित कार्यपद्धती ही प्रमुख कारणे आहेत. अपघात टाळण्यासाठी नियमित देखभाल, कर्मचाऱ्यांचे योग्य प्रशिक्षण, सुरक्षा नियमांचे कठोर पालन, आणि धोके कमी करण्यासाठी योग्य सुरक्षा व्यवस्थापन करणे आवश्यक झाले आहे. औद्योगिक अपघातांवर नियंत्रण ठेवण्याचे काम औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचलनालय विभाग करतो. मात्र कारखान्यांवर देखरेख, नियमित तपासणी करीता या विभागाच्या पालघर येथील कार्यालयामध्ये पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध नसल्यामुळे सक्षमपणे काम करण्यास मर्यादा येत आहेत. सुरक्षित तरतूदींच्या वेगवेगळ्या उल्लंघनाबाबत  आजपर्यंत संबंधित कारखाना व्यवस्थापना विरोधात एकूण २४४  फौजदारी स्वरुपाचे खटले  न्यायालयात दाखल करण्यांत आलेले आहेत.  तसेच कारखान्यातील यंत्र सामुग्रीचे प्रेशल व्हेसल, लिफ्टिंग टॅकल यांची सुद्धा सक्षम व्यक्ती यांच्याकडून तपासणी करण्यांत येते. तारापूरमध्ये मागील दोन वषामध्ये एकूण १७ एवढे प्राणघातक अपघात झालेले आहेत. कारखाना व्यवस्थापनाचा पाठपुरावा करून मयत कामगारांच्या ७० लाख २५ हजार इतकी नुकसान भरपाई व २९ लाख २५ हजार रुपये इतके सानुग्रह अनुदान मिळवून देण्यात आलेलेआहे.

ठळक अपघाती घटना :

* मेडली फार्मास्युटिकल्स, ऑगस्ट २०२५:

  ४ कामगारांचा मृत्यू आणि २  गंभीर

* तारा नायट्रेट कंपनी, जानेवारी २०२०:

  ७ कामगारांचा मृत्यू आणि ७ गंभीर जखमी. 

* (मार्च २०१३): तारापूर एमआयडीसी मधील  आरती ड्रग्स कंपनीत स्फोट झाल्याने ५ कामगारांचा मृत्यू झाला आणि १८ हून अधिक जखमी झाले

* रिस्पॉन्सिव्ह कंपनी, ३१ ऑक्टोबर २०२५

 यंत्रामध्ये बिघाड होऊन लागलेल्या आगीमुळे तीन कामगार गंभीर जखमी.

अपघातांची कारणे :

यांत्रिक बिघाड, मानवी निष्काळजीपणा, प्रशिक्षण आणि जागरूकता यांचा अभाव, अकुशल कामगार, असुरक्षित कार्यपद्धती, रासायनिक आणि विद्युत  धोके, जुनाट आणि कालबाह्य यंत्र सामग्री, अधिकृत समंती आणि परवानगीचे उल्लंघन करून उत्पादन

अपघात रोखण्यासाठी उपाय:

यंत्रसामग्रीची नियमित देखभाल आणि तपासणी, कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण, सुरक्षा नियमांचे पालन, सुरक्षा व्यवस्थापनाची अंमलबजावणी, वैयक्तिक सुरक्षा उपकरणांचा वापर, सुरक्षित कार्यस्थळ निर्माण करणे

मोठ्या प्रमाणात धोकादायक रसायनाचा वापर असल्यामुळे आग, स्फोट व वायुगळती होऊन प्राणहानी होण्याची शक्यता लक्षात घेता औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनायाच्या अधिकाऱ्यांमार्फत कारखान्यांची काटेकोरपणे तपासणी केली जाते. तसेच तपासणी मध्ये कारखाने अधिनियम , १९४८ व महाराष्ट्र

कारखाने अधिनियम, १९६३ च्या तरतूदींचे पालन न केल्यास कारखान्याच्या व्यवस्थापना विरोधात फौजदारी स्वरुपाच्या खटल्याची कारवाई करण्यात येते. ज्या कारखान्याना सुरक्षा लेखा परीक्षेच्या तरतूदी लागू होतात अशा कारखान्यांनाचे शासन मान्यता प्राप्त सुरक्षालेखा परीक्षण करून घेण्यात येते. कारखान्यांतील कामगारांमध्ये सुरक्षेबाबत जनजागृती व्हावी म्हणून वेगवेगळ्या विषयांवर तज्ञ व्यक्तींमाफत मागील दोन वषांमध्ये एकूण १६  प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आले आहेत.- माधव तोटेवाड – सह संचालक,औद्योगिक सुरक्षा व आरोग्य, विभाग पालघर