डहाणू : मुंबईच्या दारुखाना भागातून ८ नोव्हेंबर रोजी गस्तीसाठी निघालेली ‘अमृत-१६’ ही मदत-नौका वाढवण किनाऱ्यापासून अंदाजे १० सागरी मैल अंतरावर नांगर टाकून थांबली असताना, १२ नोव्हेंबर रोजी पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास बोटीच्या काही भागात पाणी शिरल्याने बोट बुडाल्याची घटना घडली.

नौकेच्या अभियंता कक्षात (यंत्राच्या खोलीत) अचानक पाणी शिरू लागल्याचे अभियंत्याच्या लक्षात आले. पाण्याचा प्रवाह इतका मोठा होता की, काही क्षणांतच नौकेत पाणी साचू लागले. या संकटामुळे सहा कर्मचाऱ्यांपैकी (खलाशांपैकी) पाच जणांनी वेळीच बाहेर पडण्यात यश मिळवले, तर राहुलकुमार यादव (२३) हा कर्मचारी अद्याप बेपत्ता आहे.

बचावलेल्या कर्मचाऱ्यांनी तातडीने जवळ असलेल्या ‘अन्नपूर्णा’ नावाच्या दुसऱ्या मदत-नौकेकडून मदतीसाठी आवाहन केले. ‘अन्नपूर्णा’ नौकेवरील कर्मचाऱ्यांनी तात्काळ प्रतिसाद देत पाचही जणांना सुरक्षितरीत्या आपल्या नौकेवर घेतले. त्यानंतर रात्री तीन वाजण्याच्या सुमारास सागरी बचाव समन्वय केंद्राला (मुंबई) ‘अमृत-१६’ बुडाल्याची माहिती मिळताच भारतीय तटरक्षक दल केंद्र डहाणू येथून कमांडर जितु आय. जोस यांच्या मार्गदर्शनाखाली तटरक्षक दलाची आयसी-११७ ही गस्ती-नौका तत्काळ घटनास्थळी रवाना करण्यात आली. सकाळी सातच्या सुमारास तटरक्षक दलाने या पाचही कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतले आणि सकाळी नऊ वाजता त्यांना डहाणू किनाऱ्यावर आणण्यात आले.

पाचही बचावलेल्या कर्मचाऱ्यांना तातडीने डहाणू उपजिल्हा रुग्णालय, आगर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यांपैकी तिघांची प्रकृती सुरुवातीला गंभीर होती मात्र सध्या सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रभाकर भोये यांनी दिली. तटरक्षक दलाच्या वेळेवर आणि धाडसी कारवाईमुळे पाच कर्मचाऱ्यांचे जीव वाचले असले तरी, बेपत्ता कर्मचाऱ्याचा शोध घेण्यासाठी तटरक्षक दलाचे शोध आणि बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

बचावलेले (पाच):

  • पवन विष्णू राम (२९)
  • धर्मेंद्रकुमार नंदकिशोर सिंग (४३)
  • गोविंदकुमार विदेश्वर महतो (१९)
  • सुरज विश्वकर्मा (३८)
  • जदन रघुवीरसिंग पठाणीया (३०)

“अमृत-१६ या मदत-नौकेवरील आपत्कालीन संदेश मिळताच भारतीय तटरक्षक दल केंद्र डहाणू, चिखले कार्यालयाचे कमांडर जितु आय. जोस यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या पथकाने तात्काळ प्रतिसाद देत बचावकार्य सुरू केले. आयसी-११७ या गस्ती-नौकेच्या वेळेवर आणि धाडसी कारवाईमुळे ५ कर्मचाऱ्यांचे जीव वाचवता आले. समुद्राच्या प्रतिकूल परिस्थितीतही आमच्या जवानांनी धाडसाने सर्व पाच कर्मचाऱ्यांना सुरक्षित किनाऱ्यावर आणले. सध्या एक कर्मचारी बेपत्ता असून त्याचा शोध सुरू आहे.” – यशवंत शिवडीकर, मुख्य अधिकारी व स्टाफ अधिकारी, तटरक्षक दल केंद्र, डहाणू.