पालघर : पालघर येथील शिरगाव सातपाटी दरम्यान रस्त्यामध्ये घोडा आल्याने पालघर हून सातपाटी येथे जाणाऱ्या दुचाकीची घोड्याला जोरदार धडक बसली. या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यु झाला असून दुचाकी मागे बसलेल्या मित्र जखमी झाला आहे.

१ जून रोजी रात्री आठ वाजताच्या सुमारास सातपाटी येथील रहिवासी राजू शिवराम पाटील (४७) व त्याचा मित्र दुचाकीवर पालघर येथून घरी परतत होते. शिरगाव ते सातपाटी दरम्यान प्रवास करत असताना शिरगाव चुनाभट्टी दरम्यान एक घोडा रस्त्यामध्ये आला. घोड्याचा अंदाज व गाडी नियंत्रणात न आल्याने दुचाकीची घोड्याला धडक बसली. ही धडक इतकी जबर बसली की दुचाकीस्वाराच्या डोक्याला जंभीर दुखापत झाली.

या अपघातानंतर स्थानिकांनी त्यांना सातपाटी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. त्यानंतर त्यांना पालघर येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. मात्र डोक्याला दुखापत झाल्याने दुचाकी स्वाराचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला तर त्याचा अन्य साथीदार जखमी झाला असून त्याच्यावर उपचार करण्यात आले. याबाबत सातपाटी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पुढील तपास पोलिस करत आहेत. तसेच अशा घटना सतत घडत असल्याने सातपाटी पोलीस यांनी घोडेवाल्यांना चौकशी करिता बोलावले आहे.

मार्गात गुराढोरांची अडचण कायम पालघर माहीम रस्त्यावर सकाळी व संध्याकाळी वळणनाक्यापासून माहीमच्या दिशेने ठिकठिकाणी जनावरांचे कळप बसलेले दिसतात. या मार्गांवर झालेले अतिक्रमण व जनावरांनी व्यापलेल्या अधिकतर रस्त्यामुळे वाहतुकीदरम्यान रस्ता अरुंद होत आहे. हीच परिस्थिती शहरातील जवळपास सर्व रस्त्यांची झाली आहे. शिरगाव सातपाटी दरम्यान आणि घोडेवाले राहत असून अनेक वेळा घोडे मोकाट फिरताना दिसतात. अचानक घोडे समोर आल्याने, घोडे धावत रस्त्यावर अनियंत्रित होणे व यामुळे अपघात होण्याच्या घटना शहरात सर्रास घडत आहे. मोकाट फिरणारी गुरढोर मालक व घोडेवाल्यावर कोणतीही कारवाई होत नसल्याने घटना नियंत्रणात येणे कठीण झाले आहे.