बोईसर : दिवाळीनिमित्त बोईसर मधील दुकानदार,विक्रेते आणि फेरीवाल्यांनी नागरिकांना चालण्यासाठी बांधलेल्या पदपथांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करून आपली दुकाने थाटली होती. दिवाळीचा सण संपून आठवडा उलटला तरी देखील पदपथांवरील अतिक्रमणे कायम असून यामुळे नागरिकांना भर रस्त्यावरून वाहनांच्या गर्दीतून वाट काढत पायपीट करावी लागत आहे.
बोईसर परिसरातील नागरिकांना रेल्वे स्थानक, बस स्थानक पायी गाठणे सुलभ व्हावे तसेच बाजारपेठेत खरेदी करण्यासाठी वाहनांच्या गर्दीतून वाट काढत भर रस्त्यातून चालण्याची वेळ येऊ नये यासाठी बोईसर ग्रामपंचायतीमार्फत मुख्य रस्त्यांच्या दुतर्फा नवीन पदपथ बांधण्यात आले आहेत. यासाठी अंदाजे ४० लाखांचा खर्च करण्यात आला. मात्र दिवाळीनिमित्त या पदापथांवर दुकानदार, फेरीवाले यांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करून पदपथांची जागा गिळंकृत केली आहे.
दिवाळीनिमित्त निरनिराळ्या वस्तूंच्या विक्रीसाठी आपली दुकाने थाटून खास मंडप उभारले आहेत. विक्रेत्यांनी पदपथांवर केलेल्या अतिक्रमणामुळे नागरिकांवर भर भर रस्त्यातून वाहनांच्या गर्दीतून वाट काढत इच्छित स्थळ गाठण्याची वेळ आली आहे. दुकानांसोबतच पदापथांवर दुचाकींची देखील बेकायदेशीर पार्किंग केली जात आहे. मुख्य रस्त्यांवरून वाहनांच्या गर्दीतून नागरिकांना नाईलाजाने वाट काढावी लागत असल्याने बोईसर तारापूर, बोईसर पालघर आणि ओसवाल एम्पायर परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण होत असून पदपथांवर घुसखोरी केलेल्या फेरीवाल्यांवर कारवाईची नागरिकांकडून मागणी होत आहे.
ग्रामपंचायत आणि पोलीस प्रशासनाकडून संयुक्त कारवाई होणार :
बोईसर मधील पदपथांवर अतिक्रमण झाल्या प्रकरणी बुधवारी ग्रामपंचायतीचे उपसरपंच नीलम संखे यांच्या नेतृत्वाखाली सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामविकास अधिकारी यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी विकास नाईक व बोईसर पोलीस स्टेशनमधील अधिकाऱ्याची भेट घेऊन संयुक्त कारवाईसाठी पोलीस बंदोबस्ताची मागणी केली. यावेळी पदापथांवर बेकायदेशीरपणे ठाण मांडून बसलेल्या फेरीवाल्यांना आपली अतिक्रमणे हटवण्यासाठी ठिकठिकाणी बॅनर लावून कायदेशीर कारवाईचा इशारा देण्यात येणार आहे. त्यानंतर ग्रामपंचायत आणि पोलीस यांच्या माध्यमातून संयुक्तपणे कारवाई केली जाणार आहे.
