पालघर: पालघर शहरासह संपूर्ण जिल्ह्यात आज छटपूजेचा उत्साह मोठ्या प्रमाणावर दिसून आला. विशेषतः उत्तर भारतीय बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला हा सण जिल्ह्याच्या विविध भागांत असलेल्या नदीकिनारी व तलावाजवळ मोठ्या भक्तीभावाने साजरा करण्यात आला.

सायंकाळच्या वेळी सूर्याला अर्घ्य देण्यासाठी पालघर येथील गणेश कुंड, नवली तलाव, डहाणू तालुक्यातील डहाणू, आशागड, गंजाड, कासा, वाणगाव तर बोईसर येथील नांदगाव समुद्रकिनारा, बेटेगाव गणेश घाट, परनाळी बाणगंगा नदी, सरावली गाव तलाव , धनानी नगर गणेश घाट यासह जव्हार मोखडा वाडा आणि तलासरी तालुक्यातील घाटांवर, नदीकिनारी व तलावांच्या घाटांवर महिला भाविकांनी मोठी गर्दी केली होती. छठ माता आणि सूर्यदेवाची उपासना करण्यासाठी महिलांनी ३६ तासांचे कठोर निर्जल उपवास केले होते.

हा चार दिवसीय उत्सव असून आज सायंकाळी त्यांनी अस्ताला जाणाऱ्या सूर्यदेवाला (प्रत्यूषाला) बांबूच्या सुपामध्ये विविध फळे, ठेकुआ (विशेष प्रसाद) आणि इतर पूजा सामग्री ठेवून अर्घ्य दिले. यावेळी पारंपरिक लोकगीते गाऊन छठ माता आणि सूर्यदेवाकडे कुटुंबाच्या सुख-समृद्धीसाठी व मुला-बाळांच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रार्थना करण्यात आली.

नगरपरिषदेकडून विशेष दक्षता

गणेश कुंडा मधील पाणी वीस फूट खोल असल्याने व पूजे करिता महिलांची संख्या अधिक असल्याने गणेश कुंडावर विशेष दक्षता घेण्यात आली होती. यावेळी ठिकठिकाणी बॅरिकेड, रबरी ट्यूब, दोरखंड, जॅकेट्स, विद्युत व्यवस्था, निर्मल्य कलश व कुंडाची खोली असल्याने सुरक्षेच्या दृष्टीने विशेष सूचना फलक लावण्यात आले होते. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त व फायर ब्रिगेडचे कर्मचारी तैनात होते. छटपूजेनंतर संबंधित घाटांची स्वच्छता मोहीम त्वरित हाती घेण्याच्या सूचना आरोग्य विभागाला पालघर नगर परिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत जाधव यांनी दिल्या.

छटपूजेची माहिती

छटपूजा हा प्रामुख्याने सूर्यदेव आणि त्यांची बहीण षष्ठी मैया (छठी मैया) यांना समर्पित असलेला प्राचीन हिंदू उत्सव आहे. कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील षष्ठी तिथीला हा उत्सव साजरा केला जातो, म्हणून याला ‘सूर्य षष्ठी व्रत’ किंवा ‘छट पूजा’ असेही म्हणतात. हे व्रत विशेषतः सौभाग्य, समृद्धी आणि संतान प्राप्तीसाठी केले जाते. या व्रतामध्ये सूर्यदेवाच्या दोन्ही शक्ती – ऊषा (पहाटेची पहिली किरण) आणि प्रत्यूषा (संध्याकाळची शेवटची किरण) यांची एकत्रित आराधना केली जाते. स्वरूप: हे व्रत चार दिवस चालते आणि या दरम्यान व्रताचारी (उपवास करणारे) निर्जल उपवास करतात.

प्रसाद: या पूजेत प्रसादाची पवित्रता जपली जाते. गहू आणि गुळापासून तयार केलेला ठेकुआ हा प्रमुख प्रसाद असतो. या पूजेचा मुख्य विधी पवित्र जलाशयाच्या पाण्यात उभे राहून सूर्यदेवाला दुधाचे व जलाचे अर्घ्य देणे. या पूजेमुळे जिल्ह्याच्या अनेक भागांत श्रद्धेचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. मंगळवारी पहाटे उगवत्या सूर्याला अर्घ्य (ऊषा अर्घ्य) देऊन व्रताची सांगता होईल.

छटपूजे दरम्यान वाहतूक कोंडी 

पालघर येथे तीन दिवसीय छटपूजा मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. पालघर येथील गणेश कुंड येथे छठ पूजा साजरी करण्यासाठी महिलांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. पूजा करिता आलेल्या नागरिकांनी आपली वाहने रस्त्याकडेला उभी केल्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. यामुळे माहीम, टेंभोडे व छत्रपती शिवाजी महाराज चौकाकडे जाणारा रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. तर गणेश कुंडावर पोलीस बंदोबस्त देखील होता.

छटपूजे दरम्यान पावसाच्या सरी

गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाच्या सरी आज सायंकाळी पाच साडेपाच वाजताच्या दरम्यान ढगाळ वातावरण व अंशी पावसाच्या सरी पडल्यामुळे महिलांची तारांबळ उडाली होती. मात्र आपल्या पूजेची सुरक्षा ठेवण्यासाठी व दिवा विजू नये याकरिता काहींनी छत्रीचा आधार घेत पूजा पूर्ण केली.

राजकीय पक्षांची बॅनरबाजी

निवडणुकीच्या अनुषंगाने श्रेय घेण्यासाठी अनेक राजकीय पक्ष आता बॅनरबाजी करताना दिसत आहेत. छटपूजेच्या अनुषंगाने छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकापर्यंत विद्युत खांबावर राजकीय पक्षांकडून शुभेच्छांचे बॅनर लावण्यात आले होते. गणेश कुंडाच्या परिसरात नगर परिषदेच्या व्यतिरिक्त विविध राजकीय पक्षांकडून चार मांडव बनविण्यात आले होते.