५० लाख रुपयांपैकी फक्त दहा लाख रुपयांचा रुग्णांना परतावा

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पालघर : करोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान जिल्ह्यातील खासगी रुग्णालयांनी रुग्णांवर उपचार करताना शासनाच्या मंजूर दरापेक्षा वाढीव दराने आकारणी केल्याचे उघडकीस आल्यानंतर जिल्हा प्रशासनाने लेखापरीक्षण समितीद्वारे ५० लाख रुपयांची अतिरिक्त देयके रुग्णांच्या नातेवाईकांना परत देण्याचे आदेशित केले होते. मात्र या आदेशांना दीड महिन्याचा कालावधी उलटल्यानंतरदेखील यापैकी जेमतेम वीस टक्के रक्कम परत करण्यात आली आहे. उर्वरित रकमेबाबत रुग्णालयांनी वेगवेगळी कारणे पुढे करून हा विषय भिजत राहिला आहे.

दुसऱ्या लाटेदरम्यान वाढलेल्या रुग्णसंख्येमुळे तसेच रुग्णांना प्राणवायूची गरज भासत असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करणे आवश्यक झाले होते. काही खासगी रुग्णालयांनी परिस्थितीचा लाभ घेऊन रुग्णांना अतिरिक्त दराने देयके आकारली. याबाबत तक्रारी आल्यानंतर जिल्हा प्रशासनाने ११ सदस्यांची समिती स्थापन करून  केलेल्या तपासणीत ग्रामीण भागातील खासगी रुग्णालयांकडून सुमारे ५० लाख २१ हजार रुपयांची अतिरिक्त आकारणी झाल्याचे स्पष्ट झाले होते.  ही रक्कम रुग्ण किंवा त्यांच्या नातेवाईकांना तातडीने परत द्यावी असे आदेश डिसेंबर २०२१ च्या मध्यावर   प्रशासनाने दिले होते. काही रुग्णालयांनी अतिरिक्त रकमेपैकी सुमारे २० टक्के रक्कम रुग्णांना परत केल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक विभागाकडून सांगण्यात आले असून इतर रकमेबाबत काही रुग्णालयांनी आक्षेप नोंदवले आहेत. काही रुग्णांचे मेडिक्लेम (आरोग्य विमा) असल्याने त्यांना वाढीव दराने आकारणी करण्यात आली, तर इतर काही रुग्णांच्या बाबतीत प्राणवायू (ऑक्सिजन) वाढीव दराने खरेदी केल्याचे आक्षेपात उल्लेखित करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे लेखापरीक्षण समितीने आक्षेप नोंदवलेले काही रुग्ण हे रुग्णालयाचे कर्मचारी किंवा त्यांचे नातेवाईक असल्याचे कारण पुढे करण्यात आले असून हे सर्व प्रकरण अजूनही भिजत पडले आहे.

या प्रकरणी शल्यचिकित्सक विभाग व समिती सदस्यांची संयुक्त बैठक होणे अपेक्षित असून त्यानंतर आक्षेपांची पुन्हा पडताळणी करून अतिरिक्त देयकांबाबत अंतिम निर्णय घेण्यात येईल असे सांगण्यात आले.

प्राणवायू वितरकांची थकबाकी कायम

करोनाकाळात पालघर जिल्ह्यातील खासगी प्राणवायू वितरकांनी येथील खासगी रुग्णालयांना प्राणवायूचा पुरवठा केला. मात्र करोनाकाळात झालेल्या बिल आकारणीची पुनर्पडताळणी केली जाणार असल्याचे कारण पुढे करून अनेक खासगी रुग्णालयांनी प्राणवायू वितरकांची थकबाकी ठेवली आहे. करोनाकाळात केलेल्या प्राणवायू पुरवठय़ापोटी थकबाकीची रक्कम २० ते २५ लाख रुपयांच्या जवळपास असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

Palghar News (पालघर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Corona virus infection corona death patient private hospital bill amount akp