नीरज राऊत
पालघर: तारापूर येथे उभारण्यात आलेल्या देशातील पहिल्या दोन अणुभट्ट्या कार्यान्वित होण्यास आणखी पाच महिने विलंब लागणार आहे. गेल्या चार महिन्यांपासून दुरुस्तीसाठी बंद असलेल्या या अणुभट्ट्या आज, ९ मे २०२४पासून कार्यान्वित होणे अपेक्षित होते. मात्र, दुरुस्तीसाठी आवश्यक असलेल्या विशेष वाहिन्या (पाइप) इटलीतून येण्यास विलंब होत असल्याने या अणुभट्ट्यांतून वीजनिर्मिती सुरू होण्यास आता नोव्हेंबर उजाडण्याची चिन्हे आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सन १९६९ मध्ये तारापूर येथे सुरू झालेल्या देशातील पहिल्या दोन अणुभट्ट्यांच्या बाह्यभागातील प्राथमिक अभिसरण प्रणाली (प्रायमरी रिसर्क्यूलेशन) पाइपिंगमध्ये अतिसूक्ष्म चिरा गेल्याचे निदर्शनास आल्याने ही प्रणाली बदलण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. नोव्हेंबर २०१९मध्ये इंधन पुनर्भरणीसाठी घेतलेल्या ‘शटडाऊन’दरम्यान या अतिसूक्ष्म चिरा निदर्शनास आल्या होत्या. १०० वेल्डिंग जोडण्यापैकी १७ जोडण्यांची यादृच्छिक पद्धतीने तपासणी केल्यानंतर या भागांची दुरुस्ती करण्याऐवजी संपूर्ण प्रणालीमधील पाइपलाइन बदलण्याचा निर्णय घेण्यात आला. प्राथमिक प्रतिबंधित क्षेत्रात असणारा किरणोत्सर्ग, जागेची मर्यादा तसेच या प्रणालीमधील इतर उपकरणांची उपयुक्तता कायम ठेवून पाइपलाइन बदलण्याचे काम आव्हानात्मक होते. या कामासाठी देशपातळीवर निविदा काढून ३५१ कोटी रुपयांचे कार्यादेश जारी करण्यात आले.

हेही वाचा >>>राज्याचे भविष्य पालघरमध्येच; वाढवण बंदरामुळे १० लाख रोजगारनिर्मिती, ‘जेएनपीए’च्या अध्यक्षांचा विश्वास

हे काम ९ मे २०२४ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र विशिष्ट रसायन मिश्रित धातूच्या पाइपचे उत्पादन व उपलब्धता इटली येथून होण्यास विलंब झाला. त्यामुळे आता हे पाइप आल्यानंतर बसवण्यास १५ सप्टेंबर उजाडणार आहे. तसेच त्यानंतर दीड महिना या यंत्रणेची चाचणी करून प्रकल्प कार्यान्वित करण्यात येईल. त्यामुळे या दोन्ही अणुभट्ट्यांमधून नोव्हेंबरपासून वीजनिर्मिती सुरू होईल, अशी शक्यता आहे.

अणुभट्ट्यांचे आयुर्मान वाढणार

या प्रणाली बदलासोबत सुरक्षिततेची व वीजनिर्मितीची संबंधित इतर अनेक महत्त्वपूर्ण प्रणालींची सुरक्षा संदर्भातील तपासणी व देखभाल दुरुस्ती करण्यात आल्याने या दोन अणुभट्ट्यांमधून वीजनिर्मिती किमान पुढील १० वर्षे सुरू राहतील असे तारापूर अणुऊर्जा केंद्राचे प्रकल्प संचालक संजय मुलकलवार यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले. त्याचबरोबर प्रकल्पाच्या विविध बांधकामांची अद्यायावत पद्धतीने तपासणी करण्यात आली असून अनेक सुरक्षा संदर्भातील प्रणालींचे नूतनीकरण करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

वीजदरांत वाढ

२१० मेगावॅट क्षमतेने १९६९ पासून वीज निर्मिती करणारा प्रकल्प काही तांत्रिक कारणांमुळे १९८४ पासून १६० मेगावॅट क्षमतेने ऊर्जा निर्मिती करत आहेत. सन २०२० पर्यंत तारापूरच्या अणुभट्टी एक व दोनमधून निर्मित होणारी वीज दोन रुपये ४१ पैसे प्रति युनिट इतक्या माफक दराने महाराष्ट्र व गुजरात राज्याला देण्यात येत होती. प्रणाली सुधारण्यासाठी मोठा भांडवली खर्च झाल्याने या वीज दरामध्ये किंचित वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Palghar News (पालघर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Delay in power generation from tarapur nuclear reactor amy