पालघर: गेल्या काही आठवड्यांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे तसेच २३ मे पर्यंत देण्यात आलेल्या वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाच्या इशाऱ्यामुळे उन्हाळी भात, भुईमूग, परिपक्व फळे व भाजीपालाचे नुकसान होवू नये या दृष्टीने लवकरात लवकर पिकांचीकाढणी करून सुरक्षित ठिकाणी ठेवण्याचे आवाहन कृषी विभागाने दिले आहे.
जिल्ह्यात सर्वत्र ६ मे पासून सुरू झालेल्या अवकाळी पावसामुळे शेती व बागायतदारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काढणीला आलेले पिके, भाजीपाला यासह उन्हाळी भात या पावसात भिजून खराब झाल्याने हातातोंडाशी आलेला घास गेल्यामुळे शेतकरी हताश झाले आहेत. मात्र या अवकाळी पावसाचे संकट सुरूच असून प्रादेशिक हवामान विभाग, मुबंई द्वारे पुढील काही दिवसात विजांच्या कडकडे सहवादळी वारे व जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला असल्याने शेतकऱ्यांसमोर पुन्हा एकदा संकट उभे राहिले आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार पालघर जिल्ह्यांमध्ये २० ते २३ मे दरम्यान अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याचे संकेत असल्याने जिल्ह्यात काही ठिकाणी विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यांसह (40-50 किमी प्रतितास वेग) मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याचा इशारा देण्यात आला आहे. कमाल आणि किमान तापमानात थोडीशी घट होईल व किमान तापमान 24 ते 25 आणि कमाल तापमान 30 ते 34 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. तसेच पुढील पाच दिवस सकाळची आर्द्रता सरासरी 85 ते 90 टक्के आणि दुपारची आर्द्रता 55 ते 75 टक्के राहील. वाऱ्याचा वेग सरासरी 3-20 किमी प्रति तास राहण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.
त्या अनुषंगाने उन्हाळी भात, भुईमूग, परिपक्व फळे व भाजीपालाचे नुकसान होवू नये म्हणून लवकरात लवकर काढणी करून सुरक्षित ठिकाणी ठेवावे, नवीन लागवड केलेल्या व लहान झाडांना मातीची भर द्यावे व काठीचा आधार देवून दोरीने बंधावे, जनावरांचा चारा सुरक्षित ठिकाणी ठेवण्याची व्यवस्था करा व जनावरांचे शेड कमकुवत असेल दुरुस्ती करून घेण्याचा सल्ला जिल्हा कृषि हवामान केंद्र व कृषी विभागाकडून देण्यात आला आहे.
कृषी विभागाचे आवाहन
हवामान आधारित कृषी सल्ल्यामुळे शेती अधिक शाश्वत, पर्यावरणपूरक आणि उत्पादनक्षम बनत आहे. पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी हवामान अंदाज आणि कृषि हवामान सल्ल्याचा अधिकाधिक लाभ घ्यावा. जिल्हा कृषि हवामान केंद्राच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये सामील होण्यासाठी ८३७८०९४५५३, ७०६६८५४७६४ या क्रमांकावर संपर्क साधावा.