पालघर : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग क्र. ८वर पालघर जिल्ह्यात चार नवीन उड्डाणपूल उभारण्यात मंजुरी मिळाली असून त्यापैकी दोन पूल मनोरजवळील जव्हार आणि नांदगाव फाटय़ावर उभारण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे डहाणू तालुक्यात चिंचपाडा येथे तसेच तलासरी तालुक्यात आच्छाड येथे नवीन उड्डाण पुलांची निर्मिती होणार आहे.
मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर वर्दळीच्या जव्हार आणि नांदगाव फाटय़ावर उड्डाण पूल नसल्यामुळे रस्ता ओलांडून जाताना अनेकदा अपघात होत असतात. जव्हार फाटय़ामार्गाने मुंबई आणि गुजरातमधून विक्रमगड, जव्हार, मोखाडा, नाशिक, शिर्डी, औरंगाबाद, अहमदनगर भागात वाहतूक होत असते. या रस्त्यावरून होणाऱ्या वाढत्या वाहतुकीचा आढावा घेऊन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण तसेच आयआरबी यांच्यामार्फत नवीन पुलांना मंजुरी देण्यात आली आहे. यासह पालघर जिल्ह्यात डहाणू तालुक्यात चिंचपाडा येथे तसेच तलासरी तालुक्यात आच्छाड येथे नवीन उड्डाण पुलांची निर्मिती होणार आहे.
पालघर तालुक्यातील मेंढवण खिंड येथे महामार्गावर तीन-चार ठिकाणी तीव्र वळणे असल्यामुळे आत्तापर्यंत शेकडो अपघात झाले असून अनेकांना प्राण गमवावे लागले आहेत. हा वळणदार रस्ता सरळ करण्याची मागणी जिल्ह्यातील अनेक वाहनचालकांनी तसेच प्रादेशिक परिवहन मंडळ, वाहतूक पोलीस आणि स्थानिक पोलिसांनी केली होती. हा रस्ता सरळ करण्यास आयआरबी कंपनीने मंजुरी दिली असून त्यासाठी चार कोटी ८० लाख रुपयांचा निधी उपलब्ध केला आहे. हे काम देखील येत्या काही दिवसात सुरू होणार असल्याची माहिती खासदार राजेंद्र गावित यांनी दिली आहे.