पालघर: पालघर जिल्ह्यात विकासकामे व राष्ट्रीय प्रकल्पा अंतर्गत सुरू असणाऱ्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या असून या सर्व प्रकरणांची चौकशी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करून करावी अशा सूचना पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी जव्हार येथे दिली. ‘स्वच्छ पालघर सुंदर पालघर, दुर्गंधी मुक्त व प्लास्टिक मुक्त पालघर’ या पाठोपाठ त्यांनी भ्रष्टाचार मुक्त पालघर करण्याचा निर्धार व्यक्त केला.
पालघर येथे झालेल्या दोन जनता दरबार नंतर विक्रमगडचे आमदार हरिश्चंद्र भोये यांच्या विनंतीवरून जव्हार येथे आज (बुधवारी) जनता दरबारचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी यांच्या समवेत लोकांनी उपस्थित केलेल्या समस्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न केला. मुसळधार पाऊस सुरू असताना देखील या जनता दरबारात १५० पेक्षा अधिक अर्ज व निवेदन प्राप्त झाली.
जिल्ह्यात सुरू असलेल्या जल जीवन योजनांमध्ये मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या असून या नळ पाणी योजनांचे सद्यस्थिती व ठेकेदाराला देण्यात आलेल्या देयकांची देण्यात आलेली रक्कम याचा अहवाल देण्याचे पालकमंत्री यांनी जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सुचित केले. जिल्ह्यात अनेक रस्त्यांची कामे सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हा परिषद तसेच पर्यटन, ग्रामविकास सारख्या विभागाकडून दुबार पद्धतीने विविध कामे केल्याची माहिती प्राप्त झाली असून गेल्या पाच वर्षात झालेल्या कामांचा अभ्यास करून त्यामध्ये गैरप्रकार, भ्रष्टाचार झाल्याचा शोध घेण्याचे त्यांनी सांगितले.
जिल्ह्यामध्ये सुरू असलेले मुंबई वडोदरा द्रुतगती मार्ग, समर्पित मालवाहू रेल्वे मार्ग, बुलेट ट्रेन प्रकल्प व इतर राष्ट्रीय प्रकल्पांमध्ये भूसंपादन करताना मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार व अनियमितता झाल्याच्या तक्रारीच्या अनुषंगाने सखोल चौकशी करण्याचे आदेश त्यांनी जिल्हाधिकारी यांना दिले. शिवाय आदिवासी व वन विभागाच्या जमिनीमध्ये बेकायदेशीरपणे उत्खनन करून राष्ट्रीय प्रकल्पांसाठी भराव केल्याच्या घटनांची जबाबदारी प्रकल्प हस्तांतरित होण्यापूर्वी पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या. रस्त्यांच्या कामांचा दर्जा सुमार असल्याचे सांगत या सर्व कामांचा जिल्हा प्रशासनाने आगामी काळात लेखाजोखा घ्यावा असे त्यांनी सुचित केले.
जिल्ह्याचे पालकत्व स्वीकारल्यानंतर गणेश नाईक यांनी स्वच्छ व सुंदर पालघरसह प्लास्टिक मुक्त व दुर्गंधी मुक्त पालघरचा नारा दिला होता. या आपल्या विनंतीला जिल्हा प्रशासनाने तसेच स्थानिक नागरिकांनी व लोकप्रतिनिधी सकारात्मक प्रतिसाद दिल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त करत आगामी काळात पालघर जिल्ह्याला भ्रष्टाचार व गैरप्रकार मुक्त करण्याचा निर्धार व्यक्त केला.
पावसाळी परिस्थितीचा आढावा
गेल्या काही दिवसांपासून पालघर जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत असताना गणेश नाईक हे जनता दरबार जव्हार येथे आयोजन करण्यावर ठाम राहिले. मुंबईहून जव्हार येथे येताना वेगवेगळ्या रस्त्यांवर व मोऱ्यांवर साचणाऱ्या पावसाच्या पाण्याचा आढावा घेत अशा ठिकाणी रस्त्यांची उंची व रुंदी वाढवण्यासंदर्भात त्यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.
जनता दरबार सुरू होताना नागरिकांची संख्या कमी होती, मात्र काही वेळातच संपूर्ण मंडप स्थानिकांच्या गर्दीने फुलून गेला. या जनता दरबारात लोकांच्या समस्या समजून घेण्यासाठी ४०० ते ५०० शासकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
टॉवर बाधित शेतकऱ्यांना योग्य मोबदला द्यावा
जिल्ह्यातील राष्ट्रीय प्रकल्पांसाठी भूसंपादन करताना जागा मालक व जागेचा ताबा असणाऱ्या नागरिकांना विशिष्ट सूत्राद्वारे जागेचा मोबदला देण्यात आला होता. त्याच धर्तीवर जिल्ह्यात नवीन वीज वाहिनीचे टावर उभारणीचे काम सुरू असून बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांना योग्य पद्धतीने नुकसान भरपाई देण्यात यावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त करून जिल्हाधिकारी यांना सूचना दिल्या.
गावपाड्यांच्या रस्त्यासाठी वनविभाग द सहकार्य
विविध गाव व पाड्यांमध्ये रस्ते उभारण्यासाठी वन विभागाची परवानगी अडचणीची ठरत असून अशा दूरवरच्या गाव व पाड्यांमध्ये अस्तित्वात असलेल्या रस्त्यांचे रुंदीकरण व डांबरीकरण करण्यासाठी तसेच या ठिकाणी जलवाहिनी टाकण्यासाठी वन विभागाने आवश्यक ते सहकार्य करावे अशा सूचना वनमंत्री गणेश नाईक यांनी वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिला. समाजहिताच्या कामांमध्ये आपले विभाग विकासाच्या आडवे येणार नाही अशी ग्वाही त्यांनी उपस्थितांना दिली.