पालघर/बोईसर : बोईसरमध्ये कचऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. ग्रामपंचायतीकडून अनेक दिवस कचरा उचलला जात नसल्यामुळे असह्य दुर्गंधीने नागरिक हैराण झाले आहेत. त्यातच बुधवारी शहरातील भंडारवाडा येथील सेवा आश्रम विद्यालयाच्या ३० विद्यार्थ्यांना कचऱ्याच्या दुर्गंधीमुळे मळमळ आणि उलटीचा त्रास सुरू झाल्याने त्यांना दवाखान्यात नेण्याची वेळ आली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भंडारवाडा येथील सेवा आश्रम विद्यालयात चार हजार विद्यार्थी शिकत आहेत. या शाळेच्या प्रवेशद्वाराजवळ ग्रामपंचायतीच्या मालकीचे खेळाचे मैदान आहे. या मैदानात मोठय़ा प्रमाणात कचरा आणून टाकला जात असल्याने बेकायदा कचराभूमी तयार झाली आहे. या ठिकाणी ग्रामपंचायतीच्या कचरा भरलेल्या गाडय़ा रात्रंदिवस उभ्या करून ठेवल्या जातात. या ठिकाणी प्रामुख्याने शिल्लक मांस आणि मासे यांचा कचरा फेकण्यात येतो. हा कचरा ग्रामपंचायतीच्या सफाई कर्मचाऱ्यांकडून आठ ते दहा दिवस उचलला जात नाही. त्यामुळे हा कचरा कुजून प्रचंड दुर्गंधी निर्माण होते.

विद्यार्थी बुधवारी सकाळी शाळेत आले असता जवळपास ३० जणांना कचऱ्याच्या प्रचंड दरुगधीमुळे उलटी आणि मळमळीचा त्रास होऊ लागला. त्यामुळे शिक्षकांनी त्यांना पालकांच्या ताब्यात देऊन दवाखान्यात घेऊन जाण्यास सांगितले. सेवा आश्रम शाळा प्रशासनाने बेकायदा कचराभूमी हटविण्यासाठी बोईसर ग्रामपंचायतीकडे अनेकदा पत्रव्यवहार केला आहे. मात्र, याबाबत कोणतीही उपाययोजना केली जात नसल्याचे शिक्षकांनी संगितले. तक्रार केल्यानंतर काही दिवस कचरा उचलला जातो. मात्र त्यानंतर पुन्हा या गोष्टीकडे दुर्लक्ष केले जाते. शाळेजवळ असलेल्या खाद्यपदार्थाच्या गाडय़ांवर बेकायदा कचराभूमीमुळे मोठय़ा प्रमाणात माशा घोंगावत असतात. तेथेच विद्यार्थी खाद्यपदार्थ खात असल्याने ते त्यांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरत आहे.

भंडारवाडा येथील सेवा आश्रम विद्यालयाजवळील मैदानात यापुढे कचरा न टाकण्याची सक्त ताकीद देण्यात आली आहे. या ठिकाणी उभ्या असलेल्या कचरा भरलेल्या गाडय़ाही इतर ठिकाणी हलवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कायमस्वरूपी कचराभूमीची सोय नसल्याने कचरा विल्हेवाटीची समस्या निर्माण झाली आहे. – रमाकांत चव्हाण, ग्रामविकास अधिकारी, ग्रामपंचायत बोईसर

Palghar News (पालघर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Illegal dumping 30 students suffering from nausea vomiting ysh