बोईसर : तारापूर औद्योगिक वसाहतीमधील वाहनतळाचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. औद्योगिक वसाहतीमध्ये कायमस्वरूपी वाहनतळ नसल्याने मालवाहू अवजड वाहने मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यावर पार्किंग केली जात असून यामुळे वाहतूक कोंडीसोबतच रस्ते अपघातांचे प्रमाण वाढीस लागले आहे.
तारापूर औद्योगिक वसाहतीमधील कारखान्यांमध्ये मालाची ने-आण करणाऱ्या अवजड वाहनांची संख्या प्रचंड वाढली आहे. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाला औद्योगिक क्षेत्राशी जोडणाऱ्या बोईसर चिल्हार राज्यमार्गावरून दिवसभरात जवळपास ६० ते ७० हजार सर्व प्रकारची वाहने ये जा करतात. मात्र औद्योगिक क्षेत्रात कायमस्वरूपी वाहनतळाची सुविधा उपलब्ध नसल्याने बहुतांश अवजड वाहने औद्योगिक क्षेत्रातील अंतर्गत रस्त्यांसोबतच, रहिवासी परिसर आणि बोईसर चिल्हार रस्त्यावरील मुकुट टंक ते बिरसा मुंडा चौक, खैरापाडा, बेटेगाव, मान, गुंदले, नागझरी परिसरात रस्त्याच्या दोन्ही बाजूला बेकायदा पार्किंग करून ठेवण्यात येतात.
वाहनतळाअभावी अवजड वाहने मुख्य व अंतर्गत रस्त्यावर पार्कींग होत असल्याने वाहतूक कोंडी होऊन त्याचा इतर वाहने, आणि पादचारी यांना त्रास सहन करावा लागत आहे. रात्रीच्या अंधारात रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनांचा अंदाज न आल्याने अनेक वेळा अपघात होत आहेत. गेल्या आठवड्यात नागझरी येथे रस्त्याच्या बाजूला पार्किंग करून ठेवलेल्या ट्रकला धडकून अपघात होऊन पीकअप जीपचा चालक आणि सहप्रवाशाचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.
वाहनतळासाठी राखीव भूखंडावर अनधीकृत झोपड्यांचे अतिक्रमण :
तारापूर औद्योगिक क्षेत्रातील बोईसर पालघर रस्त्याशेजारील एएम-३७ हा २३०४८ स्क्वेयर मीटर क्षेत्रफळाचा भूखंड ट्रक टर्मिनलसाठी आरक्षित आहे. मात्र ट्रक टर्मिनलसाठी आरक्षित असलेल्या या भूखंडावर अनधीकृत झोपड्यांचे अतिक्रमण झाले असून बोईसर रेल्वे स्टेशन परिसर जवळच असल्याने वाहनांच्या गर्दीमुळे हा भूखंड अवजड वाहनांच्या पार्किंगसाठी गैरसोयीचा ठरून वापराविना तसाच पडून आहे. बोईसर पालघर रस्त्याशेजारील वाहनतळासाठी राखीव असलेल्या भूखंडाचे आरक्षण बदलून तारापूर औदयोगिक वसाहतीमधील बॉम्बे रेयॉन कंपनीसमोरील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या मालकीचा सेवा सुविधांसाठी आरक्षित असलेला ओएस-१/ए हा २२२३४ स्क्वेअर मीटर क्षेत्रफळाचा भूखंड हा वापराविना पडून आहे. औद्योगिक वसाहतीच्या मध्यभागी असल्याने हा भूखंड अवजड वाहनांच्या पार्किंगसाठी सोयीचा ठरणार असून भूखंड क्रमांक ओएस-१/ए या भूखंडाचे सोयीसुविधांसाठी हे आरक्षण बदलून त्या ठिकाणी वाहनतळाचे आरक्षण करण्याचा प्रस्ताव एमआयडीसीच्या वरिष्ठ कार्यालयाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे. या ठिकाणी ट्रक टर्मिनलसोबतच वाहनांचे चालक आणि वाहक यांच्याकरीता विश्रांतीगृह, उपहारगृह आणि शौचालयाची सुविधा निर्माण करण्याचे प्रस्तावित आहे.
तारापूर औद्योगिक क्षेत्रातील अवजड वाहनांच्या पार्किगसाठी ओएस-१/ए या सेवा सुविधांसाठी असलेल्या भूखंडाचे आरक्षण बदलून त्या ठिकाणी ट्रक टर्मिनलचे आरक्षण करण्याबाबत वरिष्ठ कार्यालयाकडे प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. पुढील एक दोन महिन्यात यांवर अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे. – अविनाश संखे उप अभियंता, तारापूर एमआयडीसी