पाच तालुक्यांतील ग्रामीण भागांत दुसऱ्या मात्रेचे ५० टक्के तर वर्धक मात्रेचे प्रमाण केवळ ११ टक्के

पालघर: पालघर जिल्ह्यातील पाच तालुक्यांमध्ये करोना लसीकरणाच्या दुसऱ्या मात्रेचे प्रमाण ५० टक्केच असून  वर्धक मात्राचे एकंदर प्रमाण ११ टक्क्यांच्या जवळपास राहिले आहे. अशा परिस्थितीत करोनाचा पुन्हा उद्रेक होईल अशी शक्यता वर्तविल्याने लसीकरण उद्दिष्ट गाठण्याचे जिल्हा प्रशासनासमोर आव्हान उभे आहे.

करोनाच्या नव्या परिवर्तनामुळे देशात पुन्हा या आजाराच्या संक्रमणाचा उद्रेक होईल यामुळे आरोग्य विभागाने सतर्कता वर्तवली आहे. गर्दीच्या ठिकाणी मुखपट्टी परिधान करण्यासोबत अनेक उपाययोजना सुचवल्या आहेत.    जिल्ह्यातील ग्रामीण भागात ८६ टक्के नागरिकांनी करोना प्रतिबंधात्मक लशीची पहिली मात्रा घेतली आहे.  दुसरी मात्रा घेणाऱ्या नागरिकांची संख्या फक्त ६६ टक्के इतकी आहे.

यामध्ये तलासरी तालुक्यात २६ टक्के, मोखाडा   २५ टक्के, जव्हार ४८ टक्के, डहाणू  ५२ टक्के तर विक्रमगड तालुक्यात ५३ टक्के नागरिकांचे लसीकरण झाले आहे. वर्धक मात्रा पालघर, वसई ग्रामीण भागांत प्रत्येकी ११ टक्के तर वसई- विरार महानगरपालिका क्षेत्रात १८ टक्के इतके लसीकरण झाले आहे. पालघर जिल्हयामध्ये   पहिली मात्रा २५ लाख तीन हजार ३०१, दुसरी मात्रा २२ लाख ७७ हजार ४६०  लाभार्थीना तर वर्धक मात्रा तीन लाख २४ हजार ९२ जणांना देण्यात आली आहे. लाभार्थीची एकूण संख्या ५१ लाख चार  हजार ८५२   इतकी आहे.   इतर सर्व तालुक्यात वर्धक मात्रा एकेरी आकडय़ात असल्याचे दिसून आले आहे. दरम्यान, कोविशिल्डच्या उपलब्धतेची राज्यभर समस्या असून त्यासाठी  प्रयत्न करण्यात येतील, असे जिल्हा आरोग्य अधिकारी  डॉ. दयानंद सूर्यवंशी यांनी सांगितले आहे.

वर्धक मात्रा घेण्याचे आवाहन

 पहिली व दुसरी मात्रा ज्यांनी घेतली असेल त्यांनी तिसरी मात्रा घेण्याचे आवाहन जिल्हा परिषद आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे. पहिली व दुसरी लस उपलब्ध असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.  आजपासून ते ३० डिसेंबपर्यंत पालघर जिल्ह्यामध्ये लसीकरण मोहीम घेण्यात येणार आहे. यामध्ये लसीकरणाच्या सत्रामध्ये सर्व १५ वर्षांवरील लाभार्थीना कोव्हॅक्सिन लशीचा पहिली मात्रा, दुसरी मात्रा व १८ वर्षांवरील लाभार्थीना कोव्हॅक्सिन लशीचा पहिली मात्रा, दुसरी मात्रा आणि वर्धक मात्रा देण्याचे नियोजन केले आहे. या काळात सकाळी  ९ वाजल्यापासून ते सायंकाळी  ५ वाजेपर्यत लसीकरण चालणार असून  गरोदर, स्तनदा मातांना व अपंगांना रांगेत न थांबवता त्यांचे लसीकरण करण्यात येणार आहे.

जिल्ह्यातील लसीकरण (टक्के)

तालुका पहिली दुसरी   वर्धक       मात्रा    मात्रा   मात्रा  

डहाणू   ७२ ५२ ५

जव्हार ७४ ४८ ३

मोखाडा ७१ ४५ २

पालघर १०४    ९१ ११

तलासरी     ४३ २६ १

वसई ग्रामीण    ११४    ९१ ११

विक्रमगड  ८२ ५३ २

वाडा    ९५ ६८ ६

एकूण ग्रामीण    ८६ ६६ ६

वीवीएमसी   ९२ ९९ १८

एकूण   ८९ ८१ ११