डहाणू: गणेशोत्सवाच्या उत्साहात सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे. गणपती बाप्पाच्या सजावटीत आणि पूजेत महत्त्वाचे स्थान असलेल्या केवड्याला यंदा चांगला भाव मिळत आहे. विशेषतः पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातून या केवड्याची मुंबई, ठाणे आणि नाशिकच्या बाजारांमध्ये मोठी मागणी आहे, मात्र, गेल्या काही वर्षांपासून येथील नैसर्गिक केवड्याचे उत्पादन कमी झाले आहे, ज्यामुळे व्यावसायिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
डहाणू तालुका आपल्या किनारी प्रदेशातील हवामानामुळे केवड्याच्या वाढीसाठी आदर्श मानला जातो. मात्र, इथे केवड्याची स्वतंत्र लागवड केली जात नाही. खाड्यांच्या आणि समुद्राच्या किनारपट्टीवर तसेच दलदलीच्या भागात केवड्याची झाडे नैसर्गिकरित्या उगवतात. त्यामुळे, केवडा काढणीसाठी कोणताही खर्च लागत नाही, पण काढणीची प्रक्रिया खूपच कठीण आणि वेळखाऊ असते. काट्यांनी भरलेल्या झुडपांमधून केवड्याची पाने आणि फुले काढणे हे एक मोठे आव्हान असते.
गेल्या काही वर्षांपासून डहाणू तालुक्यातील केवड्याचे नैसर्गिक उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले आहे. पूर्वीच्या तुलनेत आता केवडा कमी प्रमाणात उपलब्ध असल्याने स्थानिक व्यावसायिकांना तो गोळा करण्यासाठी अधिक कष्ट घ्यावे लागत आहेत. उपलब्ध असलेला केवडा मुंबई आणि इतर शहरांमध्ये पाठवला जात आहे, जिथे सध्या बाजारात केवड्याच्या एका पानाला (नग) ₹८० ते ₹१५० पर्यंत दर मिळत आहे.
डहाणू तालुक्यातील चिंचणी ते बोर्डी परिसरात किनारपट्टी भागात नैसर्गिकरित्या उगवणाऱ्या केवड्याचे प्रमाण अलीकडे कमी झाले आहे. पूर्वी शेताच्या कुंपणासाठी केवड्याचा वापर केला जात होता, पण आता त्याची जागा लोखंडी कुंपणांनी घेतली आहे. तसेच, वाढत्या शहरीकरणामुळे आणि मानवी हस्तक्षेपामुळे केवड्याच्या नैसर्गिक जागा कमी होत आहेत. याशिवाय, समुद्राच्या किनाऱ्यावरील वाळूचा बेसुमार उपसा हे देखील एक महत्त्वाचे कारण आहे.
समुद्रकिनारी बेकायदेशीरपणे होणाऱ्या वाळू उपशामुळे किनारा कमकुवत झाला आहे. यामुळे समुद्राचे पाणी किनाऱ्याच्या जवळ येऊन नैसर्गिक बागांमध्ये शिरले आहे. केवड्याची झाडे आणि इतर किनारपट्टीवरील वनस्पतींना गोड्या पाण्याची गरज असते, परंतु खारट पाणी आत शिरल्यामुळे त्यांच्या वाढीवर आणि अस्तित्वावर नकारात्मक परिणाम होत आहे. यामुळे डहाणू तालुक्यात एकेकाळी मोठ्या प्रमाणात उगवणारा केवडा आता दुर्मिळ होत आहे.
डहाणू तालुक्यातील किनारपट्टी भागातील वातावरण केवडा उत्पादनासाठी पोषक आहे. पूर्वी किनारपट्टी भागात नैसर्गिक रित्या उगवणाऱ्या केवड्याचे प्रमाण लक्षणीय होते. अलीकडे समुद्राचे पाणी नैसर्गिक बागांमध्ये शिरल्यामुळे उत्पादनात कमालीची घट झाली आहे. पूर्वी केवड्यापासून दोरी बनवणे, कुंपणासाठी वापर करणे इत्यादी साठी उपयोग होत होता. तसेच गणेशोत्सव निमित्त केवढ्याला चांगली मागणी आहे. मात्र एकदिवसीय महत्त्व असल्यामुळे केवड्याची स्वतंत्र लागवड केली जात नाही. तरीदेखील नैसर्गिक रित्या उगवणाऱ्या झाडांवर अनेक कुटुंबांना रोजगार मिळत होता. मात्र आता प्रमाण कमी झाल्यामुळे भविष्यात केवडा मिळेल की नाही अशी भीती व्यक्त होत आहे. – यज्ञेश सावे, कृषिभूषण शेतकरी