Tarapur Gas Leak Incident: तारापूर औद्योगिक वसाहतीमधील मेडले या कंपनीत काही दिवासांपूर्वी विषारी वायूची बाधा झाल्याने चार कामगारांचा मृत्यू झाला. अशा घटना अनेकदा या भागात होत असतात, मात्र त्या रोखण्यासाठी ठोस पावले उचलली जात नसल्याचे दिसून येत आहे. शासकीय व्यवस्थेची अनास्था या दुर्घटनांना प्राथमिकरीत्या कारणीभूत ठरत आहेत.
मेडले या औषध रसायननिर्मिती करणाऱ्या कंपनीमध्ये मिथाईल मरकॅप्टन या विषारी वायूची गळती झाल्याने चार कामगारांचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे या वायू गळतीबाबत कंपनीचे इतर कर्मचारी, अधिकारी दीड ते दोन तास किंवा त्यापेक्षा अधिक काळ अनभिज्ञ राहिले. असे तीन ते चार किंवा त्यापेक्षा अधिक कामगार अपघातामध्ये मृत्युमुखी पडण्याचे प्रकार या औद्योगिक वसाहतीमध्ये अनेकदा घडले आहेत. दरवेळी अपघात घडल्यानंतर या विषयाची चर्चा काही दिवसांपर्यंत परिसरात रंगते, औद्योगिक सुरक्षितता प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी कारवाई करतात आणि पुन्हा सर्व पूर्वपदावर येते. हेच चित्र गेले अनेक वर्षे तारापूरमध्ये दिसून येत आहे.
काही महिन्यांपूर्वी तारापूर येथील औषध रसायन निर्मिती
ही कंपनी प्रतिबंधक असणारी व आफ्रिकी देशांमध्ये नशा येण्यासाठी गैरवापर होणाऱ्या औषधांची निर्मिती करीत असल्याचे समोर आले. त्यावर कारवाई करण्यात आली. यासंदर्भात एका नामांकित वृत्तवाहिनीने माहिती प्रकाशित केल्यानंतर शासनाला खडबडून जाग येऊन कारवाईचा बडगा उगारण्यात आला. त्यामुळे अपघात घडल्यानंतर अथवा गैरप्रकारसंदर्भात माहिती प्रसिद्ध झाल्यानंतरच शासकीय यंत्रणा सतर्क होत असल्याचे तारापूरच्या घटनाक्रमांवरून स्पष्ट होत आहे.
कोणत्याही कंपनीमध्ये एखादे उत्पादन सुरू करताना प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून उत्पादनाबाबत परवानगी तसेच ज्या पद्धतीने उत्पादन करण्याचे प्रस्तावित आहे त्या प्रक्रियेची औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभागाकडून परवानगी घेणे आवश्यक असते. मात्र अनेकदा योग्य परवानगीशिवाय अस्तित्वात असलेल्या यंत्रसामग्रीमध्ये उत्पादन घेताना अपघात घडल्याचे दिसून आले आहे. जागतिक स्पर्धेमध्ये टिकून राहण्यासाठी उत्पादन पद्धतीमध्ये अथवा त्यामध्ये वापरण्यात येणाऱ्या कच्च्या मालामध्ये बदल करण्याचेदेखील अनेकदा प्रयत्न केले जात असून अशा संशोधन विकास उपक्रमांदरम्यान प्रक्रियेत काही मोठे अपघात घडले आहेत. तर उत्पादन खर्च कमी करण्यासाठी वेगवेगळ्या युक्ती वापरणे व कच्च्या मालाच्या शुद्धतेमध्ये तडजोड केल्यामुळेदेखील अपघात घडण्याचे प्रकार घडले आहेत. उत्पादकता प्रक्रियेतील सहजता अर्थात ‘इस ऑफ डुईंग बिजनेस’ या गोंडस शासकीय धोरणाचा आडोसा घेऊन अशा विनाआवश्यक परवानगी करण्याच्या कृतींवर पांघरूण घातले जाते.
महत्त्वाच्या रासायनिक घटकांची टाकाऊ झालेल्या पदार्थांमधून पुनर्प्राप्ती अर्थात रिकव्हरी करण्यासाठी अनेक उद्योग विनापरवानगी काम करीत असतात. असे करताना रासायनिक प्रक्रियेवर नियंत्रण गमाविल्याने स्फोट होण्याचे प्रकार यापूर्वी घडले आहेत. औद्योगिक सुरक्षा विभागाने रासायनिक प्रक्रियेदरम्यान रिॲक्टर अथवा अन्य उपकरणांवर आवश्यक सुरक्षा उपकरणे बसवणे बंधनकारक केले असताना अशी सुरक्षा उपकरणे बसवली न गेल्याने अथवा ते प्रभावीपणे कार्यरत नसल्याने अपघात घडण्याचे प्रकार घडले आहेत.
ज्या ठिकाणी घातक रसायनांचा वापर अथवा निर्मिती केली जाते त्या ठिकाणी कुशल मनुष्यबळ ठेवणे आवश्यक आहे. अशा कर्मचारी व अधिकाऱ्यांना सातत्याने प्रशिक्षण देऊन त्यांना सुरक्षिततेबाबत सातत्याने सतर्क ठेवणे आवश्यक आहे, मात्र पैशाची बचत व उत्पादन खर्च मर्यादित ठेवण्याच्या दृष्टीने अनेकदा कंत्राटी व अकुशल कर्मचाऱ्यांकडून उत्पादन घेतली जात असताना त्यांची निष्काळजी व अज्ञानामुळे अपघात घडल्याचे प्रकार तारापूरमध्ये घडले होते.
अनेक कंपन्यांनी त्यांच्या परिसरात बेकायदा बांधकाम व हंगामी शेडद्वारे विस्तार केला आहे. उद्योगांमध्ये अपघात घडल्यानंतर बचाव कार्यामध्ये अडथळे निर्माण होत असतात. त्यामुळे अशा बेकायदा बांधकामांवर कारवाई करणे तसेच इतर नियमांवर लक्ष ठेवणे यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळाची जबाबदारी महत्त्वपूर्ण ठरत आहे.
उपक्रमांचा प्रभावा ओसरला
एकेकाळी तारापूर औद्योगिक परिसरात अपघातांची मालिका घडत असे त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी तारापूर येथील उद्योजकांची संस्था असलेल्या ‘टीमा’ यांच्या सुरक्षा समितीमार्फत नियमितपणे कामगारांच्या प्रशिक्षण व कार्यशाळा आयोजित केल्या जात. कालांतराने या कार्यशाळांना हजेरी लावण्यासाठी वरिष्ठ व्यवस्थापकीय मंडळी, अधिकारी वर्ग हे सातत्याने गैरहजर राहून या कंपनीचा सहभाग दर्शवण्यासाठी सुरक्षा कर्मचारी अथवा कनिष्ठ कर्मचारी वर्ग पाठवत असल्याने या उपक्रमाच्या प्रभावाला आगामी काळात खीळ बसली. सुरक्षिततेविषयी जनजागृती करणारे उपक्रम अधिक प्रभावीपणे व नियमितपणे राबविणे गरजेचे झाले आहे.
मनुष्यबळाचा अभाव
कंपनीमधील उत्पादने योग्य परवानगीच्या आधारे घ्यावी जावीत, त्यादरम्यान आवश्यक सुरक्षितता उपाय योजनांची पूर्तता व्हावी तसेच कामगारांच्या हक्कांपासून त्यांना वंचित ठेवण्यात येऊ नये यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळ, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय तसेच कामगार विभाग कार्यरत आहेत. या विभागांची तारापूर परिसरात कार्यालये असली तरीही मनुष्यबळाचा अभाव हे त्यांच्या अकार्यक्षमतेमागील प्रमुख कारण असून शासनाने या दृष्टीने आवश्यक पावले उचलणे गरजेचे झाले आहे.