पालघर : निसर्ग संवर्धनाच्या उद्देशाने पालघर जिल्ह्यात विद्यार्थ्यांकडून तयार करण्यात आलेले १२ हजार बीजगोळे आळंदी ते पंढरपूर या वारीच्या मार्गावर रस्त्याच्या दोन्ही बाजूने टाकून वृक्ष संवर्धन करण्यात येत आहे. विठ्ठलाच्या नामासोबत या अनोख्या वृक्षवारीतून वारकरी संप्रदाय देखील निसर्गप्रेम जपत आहे.
पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आणि वृक्षारोपण चळवळीला प्रोत्साहन देण्यासाठी पालघर जिल्ह्यातील ‘प्रश्न फाउंडेशन’ ही संस्था मागील तीन वर्षापासून वृक्षवारी हा आगळावेगळा उपक्रम राबवत आहे. या वारीदरम्यान गेली दोन वर्ष हजारो बिजगोळे वारकऱ्यांना वाटप करण्यात आले आहे. तर यंदा मार्च एप्रिल महिन्यामध्ये उपक्रमासाठी जिल्ह्यातील डहाणू, वाणगाव, तारापूर, नवापूर, पालघर या शहरांतील जिल्हा परिषद व आश्रम शाळेच्या विद्यार्थ्यांकडून बीजगोळे तयार करण्यात आले होते. पर्यावरणाचे महत्त्व लहान वयातच रुजवण्यासाठी आणि त्यांना या कार्यात सहभागी करून घेण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांकडून हे बिजगोळे तयार करण्यात आले होते.
हे बीजगोळे तयार करण्यासाठी शेण, माती व खैरबाभुळ, चिंच, गुलमोहर, वड, पिंपळ अशा देशी बियांचा वापर करून गोळे बनवून ते उन्हाळ्या दरम्यान सुकवण्यात आले होते. पावसाला सुरुवात होताच माळराणावर, मोकळ्या जागेवर व डोंगराळ भागात हे बिजगोळे टाकून वृक्ष संवर्धनाला सुरुवात झाली आहे. तर आषाढी एकादशी करिता पंढरपूरला जाण्यासाठी वारी निघाली असून या वारीदरम्यान वारकऱ्यांना या बियांचे वाटप सुरू करण्यात आले आहे. वारकरी देखील विठू नामाचा गजर करत या बिया स्वीकारत असून पंढरपूरच्या वारी सोबत वृक्षवारी करण्याचा संकल्प त्यांनी घेतला आहे.
गेली तीन वर्ष बीजगोळे निर्मिती प्रकल्पात काम करत असताना वनराई फुलवताना छान वाटते. पण या वर्षी वृक्षवारी या उपक्रमात भाग घेऊन बीज गोळ्यांची संकल्पना अनेक लोकांपर्यंत पोहोचवता आली. येत्या काळात देखील असे उपक्रम आम्ही राबवत जाऊ असे संस्थेचे अध्यक्ष सुरज बिडगर यांनी सांगितले. बीज गोळ्यांचे हे निसर्गदान वृक्षवारीचे सदस्य शुभम तसेच प्रश्न फाउंडेशनचे स्वयंसेवक रसिका वाघमळे, अभिजीत देशमुख, ऋषिकेश देशमुख आणि रजत नवले यांच्या उपस्थितीत पार पडले.
वृक्षवारीचा मार्ग
आळंदी ते पंढरपूर वारी मार्गावर बीज गोळ्यांचे निसर्गदान करण्यासाठी वृक्षसंवर्धनाचा नवा संकल्प हाती घेतला आहे. १९ जून पासून आळंदी येथून या बीजगोळ्यांचे वाटप सुरू झाले असून पुणे, सासवड या भागात वाटप झाले आहे. तर ६ जुलै पर्यंत चालणाऱ्या या वारीत जेजुरी, लोणंद, फलटण, माळशिरस व पंढरपूर दरम्यान मोठ्या संख्येने बीजगोळे वाटप करण्यात येणार आहेत.
आयोजकांचा उद्देश
या उपक्रमात वारकऱ्यांना हे बीजगोळे प्रदान करण्यात येत असून वारी मार्गावर रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी पेरले जाणार आहेत. यामधून भविष्यात नवीन वृक्षांची वाढ होईल, भविष्यात वारीदरम्यान रस्त्यावरून चालणाऱ्या भाविकांना सावलीचा आधार मिळेल आणि पर्यावरणाचा समतोल पुन्हा साधता येईल, असा उद्देश आयोजकांचा आहे.