पालघर : केळवे रोड ते कपासे (सफाळे) दरम्यान असणाऱ्या रस्त्याची दुरवस्था कायम असून या रस्त्यावरून अवजड व अधिक आकाराचे बांधकाम साहित्य घेऊन वाहतूक करणाऱ्या वाहनांमुळे अनेकदा वाहतूक कोंडी होत आहे. राष्ट्रीय प्रकल्पांच्या उभारणीच्या नावाखाली केळवे रोड येथील आठ ते १० हजार नागरिक त्रस्त झाले असून या भागातील समस्यांकडे जिल्हा प्रशासन गांभीर्याने बघत नसल्याचा सूर उमटला आहे.
प्रथम समर्पित मालवाहू रेल्वे मार्ग व नंतर पश्चिम रेल्वेच्या चौपदरीकरण प्रकल्पामुळे या भागात भराव करण्याच्या उद्देशाने मोठ्या प्रमाणात गौण खनिज वाहतूक करण्यात आली होती. यामुळे केळवे रोड ते कपासे (सफाळे) दरम्यान असणाऱ्या रस्त्याची चाळण झाली होती. या भागात काही प्रमाणात दुरुस्ती करण्यात आली असली तरीही बुलेट ट्रेनच्या प्रकल्पामुळे परिस्थिती पूर्ववत झाली आहे. बुलेट ट्रेनच्या खांबांची उभारणी करण्यासाठी मोठ्या आकाराचे खड्डे केले जात असे. या खड्ड्यामध्ये माती रस्त्यालगत आहे. या काळ्या मातीमुळे रस्त्यावर चिकटपणा पसरत असून त्यावर दुचाकी सरकून अपघात घडण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत.
बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी उच्च दर्जाच्या रेडीमेड काँक्रीटची आवश्यकता असून त्याची वाहतूक करणारी अनेक वाहनांची वाहतूक या केळवे रोड सफाळे दरम्यानच्या रस्त्यावरून होत असते. या रस्त्याची रुंदी मर्यादित असल्याने तसेच रस्त्याची साईडपट्टी मजबूत करण्याचे संबंधित ठेकेदार अथवा प्रकल्प मार्फत होत नसल्याने अनेकदा वाहने रस्त्याच्या बाजूला रुतून बसतात. त्यामुळे समोरून येणाऱ्या वाहनांना मार्ग काढणे कठीण होत असून परिणामी होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे स्थानिकांना प्रवास करणे कठीण होत आहे.
या संदर्भात बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या जनसंपर्क अधिकारी यांच्याशी संपर्क साधला असता स्थानिकांना भेडसावणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी संबंधित ठेकेदारांनी स्थानीय पातळीवर मदत कक्ष स्थापन करावा असे सुचित करण्यात आलेले सांगण्यात आले. तसेच उपस्थित केलेल्या समस्यांबाबत बुलेट ट्रेन व्यवस्थापन संबंधित ठेकेदारापर्यंत माहिती पोहोचून वाहतुकी संदर्भातील समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करावेत असे बुलेट ट्रेनच्या प्रवक्ते यांनी लोकसत्ता ला सांगितले.
बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या उभारणीसाठी मोठ्या आकाराच्या बांधकाम साहित्याची वाहतूक केली जात असताना अशा वाहनांना मार्गदर्शन करण्यासाठी किंवा इतर वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी व्यवस्था नसल्याने समोरासमोर अवजड वाहन आल्याने तासनतास वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. या परिसरात आठ ते दहा गावांमधील नागरिकांना त्याचा फटका बसत असेल. स्थानिक पोलीस व जिल्हा प्रशासनाने याबाबत लक्ष देऊन समन्वय साधण्याची मागणी दुर्लक्षित राहायचे आरोप होत आहे.
भुयारी मार्ग कुचकामी
भुयारी मार्गात पावसाचे पाणी व माती काढण्यासाठी पश्चिम रेल्वे व समर्पित रेल्वे मालवाहू मार्गाने मोठ्या क्षमतेचे डिझेल व विद्युत पंप बसवले आहे. त्यामुळे पावसाचे पाणी या मार्गातून पूर्णपणे निघत नाही. या पार्श्वभूमीवर या भुयारी मार्गांचा वापर होऊ शकत नसल्याने नागरिकांच्या गैरसोईत वाढ होत आहे.
उकिरडे व सांडपाणी लगतच्या शेतामध्ये
बुलेट ट्रेनची या भागात उभारणी करणारे एल अँड टी कंपनीचे वर्कशॉप रोठे भागात असून या ठिकाणी येथील कार्यालयातील व लगतच्या कर्मचारी वसाहती मधून निघणारे शौचालयाचे पाणी, सांडपाणी, खानपानाचे उकिरडे हे लगतच्या शेतांमध्ये सोडले जात आहे. त्यामुळे किमान २० शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे असून याबाबत मायखोप गावच्या सरपंचानी सफाळे पोलिसांच्या समक्ष संबंधित कंपनीला समज दिली आहे.