पालघर : सर्वसामान्यपणे पालघर परिसरात उच्च दर्जाचे बांधकाम, बाह्य सजावट यासाठी अडीच ते साडेतीन हजार रुपये प्रति चौरस फूट इतके दर असून अंतर्गत सजावटीसाठी अडीच हजार रुपये प्रति चौरस फूट असे दर आकारणी होत आहे. मात्र नगरपरिषदेने आपल्या कार्यालयीन इमारतीसाठी सर्व बाबी अंतर्भूत असणाऱ्या अंदाजपत्रकात ७०८६ रुपये प्रति चौरस फूट दराने निविदा मंजूर केली असून अंतर्गत सजावटीवर रेलचेल दाखवून करदात्यांच्या पैशाची लूट करीत असल्याचे आरोप होऊ लागले आहेत.

चार मजली इमारतीच्या उभारणीच्या दृष्टीने बांधकाम हाती घेतले असून या इमारतीला बाह्य काचेचे आवरण, अंतर्गत सजावट, फर्निचर, मध्यवर्ती वातानुकूलित यंत्रणा, फॉल्स सिलिंग, बांबू सिलिंग, ध्वनिरोधक सभागृह तसेच अंतर्गत सुशोभीकरण अंतर्गत असून या इमारतीचा उभारणी आराखडा विजेटीआय संस्थेने मंजूर केला आहे. ही इमारत ३०९९.१८ चौरस मीटर (३३३६० चौरस फूट) क्षेत्रफळाची असून याचे बांधकाम सध्या सुरू आहे.

मे. अतुल कुडतरकर अँड असोसिएट (बदलापूर) यांनी या प्रकल्पात तांत्रिक सल्लागार म्हणून काम पाहिले असून १५ मार्च २०२४ रोजी निर्गमित केलेल्या शासन निर्णयामध्ये या कामासाठी २८ कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. नगरपरिषदेच्या कार्यालयीन इमारतीच्या उभारणी साठी ३१ जुलै २०२४ रोजी प्रशासकीय मंजुरी देण्यात आली असून २६ ऑगस्ट २०२४ रोजी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मुख्य अभियंता यांनी या कामाला तांत्रिक मंजुरी दिली आहे. याकामी मे. स्टर्लिंग इंजीनियरिंग अँड कन्स्ट्रक्शन एलएलपी पालघर या कंपनीने २४.७२ लक्ष रुपयाला काम घेतले असून निविदा मंजुरीच्या ठराव ३० सप्टेंबर २०२४ रोजी नगर परिषदेने मंजूर करून ४ ऑक्टोबर २०२४ रोजी इमारतीचे बांधकाम सुरू करण्यात आले आहे.

तांत्रिक मान्यताप्राप्त अंदाजपत्रकानुसार पालघर नगर परिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे बांधण्यासाठी आरसीसी व इतर सिविल कामासाठी १५.१७ कोटी रुपये मंजूर असून या कामाला ४५४७ रुपये प्रति चौरस फुट इतका दर निश्चित करण्यात आला आहे. तर या कामासोबत विद्युत जोडणी खर्च पकडून १८.२५ कोटी रुपये खर्च येणार असून याचा एकंदरीत दर ५४४२ रुपये प्रति चौरस फुट इतका आहे. मात्र संपूर्ण प्रकल्पाचा दर पाहिल्यास ३३ हजार चौरस पोटासाठी २३.६४ कोटी रुपयांचा खर्च अंदाजे असून या इमारतीचे नगरपरिषदेला ७०८६ प्रति चौरस फूट इतक्या दराने पडल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

पालघर परिसरात सुरू असलेल्या वेगवेगळ्या रहिवासी व वाणिज्य वापरातील जमिनीचा बांधकाम दर सध्या १५०० ते ३००० रुपये प्रति चौरस फूट इतका असून अंतर्गत सजावटीसाठी नामांकित कंपनीकडून काम करून घेतल्यास २५०० रुपये प्रति चौरस फूट इतकी आकारणी केली जात आहे. अशा परिस्थितीत पालघर नगर परिषदेच्या इमारतीचे बांधकाम अवाजवी व फुगीर अंदाजपत्रकाद्वारे केले जात असल्याचे आरोप पालघरचे माजी नगराध्यक्ष उत्तम पिंपळे यांनी केले आहेत. बांधकाम खर्च हा सामान्य उभारणी खर्चाच्या दीडपट ते दुप्पट असून अंतर्गत सजावटीच्या नावाखाली पैशाची लूट केली जात असल्याचे आरोप स्थानिक वास्तु विशारद यांच्याकडून केली जात आहे.

पालघर नगरपरिषद नवीन प्रशासकीय इमारत बांधकामाच्या अंतिम करण्यात आलेल्या संकल्पना आराखड्यानुसार तांत्रिक सल्लागार अतुल कुडतरकर अँड असोसिएट यांनी तयार केलेल्या अंदाजपत्रकास मुख्य अभियंता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण ठाणे यांच्याकडून तांत्रिक मान्यता देण्यात आलेली आहे. या प्रस्तावास शासन निर्णयानुसार जिल्हाधिकारी यांच्याकडून प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली आहे. त्यानुसार या कामाची ई-निविदा प्रक्रिया करून लघुत्तम दराच्या निविदेस मंजुरी दिल्यानंतर कामाचे कार्यादेश देण्यात आलेले आहेत. तसेच या कामाच्या दराबाबत काही तक्रारी असल्यास त्याबाबत पुन्हा तपासणी करण्यात येईल. नानासाहेब कामठे, मुख्याधिकारी पालघर नगरपरिषद

कामअंदाजीत खर्च (कोटी)
आरसीसी ७.६६
फिनिशिंग ७.५०
फर्निचर १.६७
बाह्यकाच १.६२
अग्निशमन ०.५५
एचवीएसी १.२४
विद्युत काम ३.०८
एकूण २३.६३
एकूण (जीएसटीसह) २७.९७