पालघर : पालघर रेल्वे स्थानकात पश्चिम रेल्वेला लूप लाईन (विना फलाट साईडिंग) उभारण्याची गरज भासल्याने समर्पित मालवाहू मार्गीकेच्या रचनेमध्ये व परिणामी नवली येथील फाटकावरील उड्डाणपुलाच्या रचनेत बदल झाले. या अनुषंगाने अनेक महिने लांबलेल्या या उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्प्यात आले असून या पुलावरून पादचारी वाहतूक ऑगस्टच्या अखेरपर्यंत तर वाहनांची वाहतूक सप्टेंबर महिन्यात सुरू होण्याची अपेक्षा आहे.
एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात नवली येथील रेल्वे फाटक बंद केल्यानंतर त्यावर ११ एप्रिल रोजी स्टीलचा बो- स्टिंग गर्डर बसविण्यात आला. हे काम पूर्ण झाल्यानंतर रेल्वेने नेमलेल्या ठेकेदारामार्फत प्रलंबित असलेल्या एका खांबाची (पिलर) उभारणी करण्यात आली. रेल्वेच्या ठेकेदारामार्फत त्यांचे काम पूर्ण झाल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने नेमलेल्या ठेकेदाराने पूर्वेकडील दोन गर्डर व पश्चिमेकडील एक गर्डर स्पॅन उभारण्याचे काम हाती घेतले.
या उंभारणी प्रक्रियेतील पूर्वेकडील एक स्पॅन २९ मे रोजी उभारण्यात येऊन त्यावर गर्डर कास्टिंगचे काम २३ जून रोजी पूर्ण करण्यात आले. पूर्वेकडील दुसरे गर्डर तयार करण्याचे काम पूर्ण झाले असून हा गर्डर आज (ता १४) व उद्या (ता १५) दरम्यान या पुलावर बसविलेल्यात उर्वरित गेर्डर लगत जोडण्यात येणार आहे. हे गर्डर उभारताना (लॉन्च करताना) सुरक्षिततेच्या दृष्टीने नवली जुन्या फटका कडे जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात आली आहे. या ३० मीटर लांबीचा गर्डर उभारणी झाल्यावर त्यावर स्लॅब टाकण्याचे काम ऑगस्ट महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात हाती घेण्यात येणार आहे. त्यानंतर या गर्डरच्या काँक्रीटचे मजबुतीकरण (क्युरिंग) पूर्ण होण्यास दोन – तीन आठवड्याचा अवधी लागण्याची शक्यता आहे.
दरम्यान पश्चिमेकडील गर्डरचे काम पुलाच्या लगतच्या भागात उंचावर करण्यात आले असून त्याचे कास्टिंग व स्लॅब टाकण्याचे काम २० जुलै रोजी पूर्ण करण्यात आली आहे. ऑगस्ट महिन्याच्या अखेरच्या आठवड्या पर्यंत नवली पुलाच्या गर्डर उभारणी संदर्भातील काम पूर्ण होणार असून या प्रत्येक गर्डरच्या अखेरीस असणाऱ्या एक्सपांशन (expansion) जॉईंटच्या अवतीभवती डांबरी थर टाकण्याचे काम प्रलंबित राहणार आहे. सद्यस्थितीत पाऊस सुरू असल्याने डांबरीकरणाचे काम हाती घेणे शक्य झाले नाही. मात्र पावसाने उघडीप घेतल्यास काही दिवसातच हे काम पूर्ण करून त्यावरील वाहतूक सुरू करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग प्रयत्नशील आहे. या पार्श्वभूमीवर सप्टेंबर महिन्यापासून या पुलाचा वापर पादचारी करू शकतील अशी स्थिती आहे. मात्र मोठ्या वाहनांसाठी हा पूल कार्यरत होण्यासाठी सप्टेंबर महिन्याचा मध्य उजाडेल अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
नवली उड्डाणपूल बंद असल्याने पालघर शहरात पूर्व पश्चिम वाहतूक करणाऱ्या वाहनांना छत्रपती शिवाजी महाराज चौकातून प्रवास करावा लागत आहे. यामुळे तसेच शहरात पूर्व पश्चिम ओलांडण्यासाठी एकमेव उड्डाणपूल सध्या उपलब्ध असल्याने नागरिकांना वाहतूक कोंडी व मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे.
नवली उड्डाणपुरावर अखेरचा गर्डर आज पहाटे बसवण्यात आला. त्यामुळे पुलाचे उर्वरित काम करण्यासाठी असणारे सर्व अडथळे दूर झाले आहेत.
पश्चिमेकडील सेवा रस्त्याची रुंदी वाढवण्याचा प्रस्ताव
उड्डाणपुलाच्या पश्चिमेच्या बाजूला पालघर तहसील कार्यालय, पंचायत समिती कार्यालय तसेच पिडको येथील औद्योगिक वसाहत कार्यरत असून या ठिकाणी वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात आहे. उड्डाणपूलाच्या लगत ३.९५ मीटर रुंदीचा सेवा रस्ता सध्या कार्यरत असून परिसरात झालेले नागरीकरण व वाहनांच्या वर्दळीमुळे या रस्त्यावरून दोन वाहनांना सहजपणे वाहतूक करता येत असल्याने या सेवा रस्त्यांची रुंदी सहा मीटर करण्याचे विचाराधीन आहे. यासाठी अस्तित्वात असलेले घटक रस्त्याच्या टोकापासून १५ मीटर दूरवर स्थलांतरित करून रस्त्याच्या रुंदीकरणासाठी प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तयार करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.
पश्चिम रेल्वेकडून नवली उड्डाणपूलाच्या संदर्भात आवश्यक कामांची उभारणी पूर्ण झाल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून अग्रक्रमाने हे काम पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सद्यस्थितीत बहुतांश काम अंतिम टप्प्यात असून या पुलावरील वाहतूक लवकरात लवकर सुरू करण्यासाठी प्रयत्नशील आहोत. – पोपट चव्हाण, उप अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग, पालघर