लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने लाच स्वीकारल्या प्रकरणी केली होती महिला सरपंचाला अटक

वाडा : लाचखोरीच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या महिला सरपंचाने ग्रामसभा बोलावण्याचा केलेला अजब कारभाराचा प्रताप समोर आला आहे. खर तर ह्या लाचखोर आरोप असलेल्या महिला सरपंचावर प्रशासनाने तातडीने पदमुक्त अथवा अपात्रतेची कारवाई  करणे अपेक्षित असताना ती न केल्याने ग्रामस्थांनी व नागरिकांनी प्रशासनाच्या भूमिकेवरच संशय व्यक्त करत मोठा रोष व्यक्त केला आहे.

दरम्यान ह्या महिला लाचखोर सरपंचावर नक्की कुणाचा आशीर्वाद आहे.? अशी चर्चा परिसरात जोरदार रंगु लागली आहे.

वाडा तालुक्यातील “सापरोंडे – मांगाठणे ग्रामपंचायती”च्या महिला सरपंच शोभा सुनील गवारी यांनी “ग्रामपंचायत कार्यालय विस्तारीकरण” करण्याच्या कामाचे मंजूर केलेल्या बिलाच्या रकमेपैकी दोन टक्के प्रमाणे एकूण २० हजारांची लाच मागणी केल्यानंतर तक्रारदाराच्या तक्रारीनुसार ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचत १९ हजारांची लाच स्वीकारल्या प्रकरणी लाचखोरीच्या प्रकरणात त्यांना मागील महिन्यात (२५ एप्रिल) अटक केली होती.

त्यानुसार लोकप्रतिनिधी असलेल्या महिला सरपंचा विरोधात वाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.

यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तातडीने सक्षम अधिकाऱ्यांना (कोंकण विभागीय आयुक्त व पालघर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी) सरपंचा विरोधात कारवाईसाठी प्रस्ताव पाठविला होता.

मात्र या सक्षम अधिकाऱ्यांकडून या लाचखोरीचा आरोप असलेल्या महिला सरपंच शोभा गवारी यांच्या विरोधात पदमुक्त किंवा अपात्रता अथवा निलंबित करण्यासाठी कुठलीही कारवाई केलेली नसल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे प्रशासनाकडून कारवाईसाठी झालेल्या दिरंगाईचा फायदा घेत लाचखोरीचा आरोप असलेल्या सरपंच शोभा गवारी यांनी आता थेट प्रशासनालाच आवाहन देत ग्रामसभा बोलावण्याचा प्रताप केला आहे.

लाच स्वीकारून व त्या गुन्ह्याखाली अटक होऊन देखील सरपंच पद शाबीत राहिल्याने २३ “मे”ला ग्रामसभा बोलविण्यासाठी थेट ग्रामपंचायतीच्या लेटर पॅडवर “ग्रामसभा अजेंडाचे पत्र” ग्रामपंचायत अधिकारी किरण हरड यांनी अवघ्या १० दिवसांतच (०६ मे) काढले. व त्यावर लाच स्वीकारल्याचा आरोप असलेल्या सरपंच शोभा गवारी यांचे सही व शिक्का घेऊन प्रसिद्ध केला आहे. त्यामुळे या प्रकाराबाबत ग्रामस्थांकडून आश्चर्य व संताप व्यक्त केला जात आहे.

येत्या २३ “मे”ला या लाचखोर सरपंचाच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या ग्रामसभेवर ग्रामस्थांनी बहिष्कार घालण्याची तयारी दर्शवली असल्याची माहिती मिळाली आहे.

* लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार –

लोकप्रतिनिधी किंवा शासकीय अधिकारी वा कर्मचारी यांना लाच घेताना पकडल्यास त्यांना भ्रष्टाचार प्रतिबंध कायद्याखाली “लोकसेवक” असेच संबोधले जाते. त्यामुळे लोकसेवकांनी “लाच” स्विकारल्या प्रकरणी त्या कारवाईस “लोकसेवक” पात्र आहेत.

अलीकडे लोकप्रतिनिधी किंवा शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी वेगवेगळे भ्रष्टाचाराचे नियम किंवा कायदे नसून ते केवळ एकच “लोकसेवक” कक्षातच  येतात. त्यामुळे लोकप्रतिनिधी सरपंच ह्या कारवाईस पात्र ठरत असल्याचे सांगितले.

त्यामुळे प्रशासनाकडून आता नक्की काय कारवाई होणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

*  कारवाईची पार्श्वभूमी

* २५ एप्रिल २०२५ रोजी १९ हजारांची लाच स्वीकारल्या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून महिला सरपंच शोभा गवारी यांना अटक करण्यात आली.

* जवळपास सहा दिवसांनी जामीनावर त्यांची सुटका झाली.

* सरपंच विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने चौकशी करून सक्षम अधिकाऱ्यांना (विभागीय आयुक्तांना व पालघर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना) कारवाईसाठी प्रस्ताव पाठविला.

* मात्र पालघर मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडुन तातडीने कारवाई झाली नसल्याने त्यांच्याकडून सुनावणी सुरू असल्याचे सांगितले जात आहे.

* त्यामुळे लोकप्रतिनिधी भ्रष्टाचार किंवा लाच स्वीकारून देखील सरपंच पदावर शोभा गवारी ह्या अद्यापही कार्यरत राहिल्या आहेत.

* सरपंचाने लाच मागितल्याची तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली म्हणून सरपंच यांचे पती सुनील गवारी व त्यांच्या साथीदारांनी मनात राग धरून तक्रारदाराला शिवीगाळ, दमदाटी करून ॲट्रॉसिटी या खोट्या गुन्हात अडकविण्याची धमकी दिली. याबाबत तक्रारदाराने वाडा पोलीस ठाण्यात आरोपीं विरुद्ध तक्रार नोंदविली आहे.

* एखाद्या लोकसेवकांनी लाच स्वीकारून देखील कारवाई होत नसेल यापुढे कुणीही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईचा उद्देश सफल कसा होईल आणि त्यावर नागरिक विश्वास कसा ठेवतील असा प्रश्न उपस्थित होत आहे.

* लाचखोरीचा आरोप असलेल्या लोकप्रतिनिधी सरपंचावर कारवाई होत नसल्याने प्रशासनाच्या भूमिकेवरच व कार्यपद्धतीवरच संशय व्यक्त केला जात आहे.

* लोकप्रतिनिधी व शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून केलेल्या लाचेची मागणी विरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून अनेकदा कारवाई केली जात आहे.

मात्र ही कारवाई फक्त केवळ दिखाव्या पुरतीच किंवा कागदोपत्री केली जात आहे का.?

* असे असेल तर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे नागरिक लाच किंवा भ्रष्टाचाराविरोधात तक्रारी कसा करतील किंवा करण्यासाठी पुढे कसे येतील असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

लोकसेवकांना लाच स्वीकारल्या प्रकरणात अटक केल्यानंतर त्यांना निलंबित किंवा कायदेशीर कारवाईसाठी आमच्या स्तरावरून सक्षम अधिकाऱ्यांना प्रस्ताव आठवड्याभरात पाठविला जातो. त्यावर त्यांनी निर्णय घेऊन कारवाई करणे गरजेचे असते, मात्र यात दिरंगाई होत असल्याने कारवाई वेळीतच होत नाही.

मात्र अधिकाधिक नागरिकांनी जागृत होऊन लाच मागणाऱ्या लोकसेवकांच्या विरोधात तक्रारी निसंकोच नोंदवाव्यात. – शिवराज पाटील– पोलीस अधिक्षक,  लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, ठाणे परिक्षेत्र

ग्रामसभा नियमानुसार आयोजित केलेली आहे. सरपंचावर अपात्रतेची कारवाई झालेली नसल्याने त्या ग्रामसभा घेऊ शकतात. यासंदर्भात वाडा गटविकास अधिकारी व विस्तार अधिकारी (ग्रामपंचायत) यांचे मार्गदर्शन मिळाले आहे.

जो पर्यंत अपात्रतेचा निर्णय येत नाही तो पर्यंत त्या सरपंच पदावर राहू शकतात असे त्यांनी सांगितले.  किरण हरड-  ग्रामपंचायत अधिकारी,  सापरोंडे – मांगाठणे ग्रामपंचायत