पालघर : डहाणू तालुक्यातील ऐतिहासिक सेवगा गडावरील चेडोबा दैवताची शोध मोहीम यशस्वी झाली असून चेडोबा दैवताचे स्थान निश्चित करण्यास दुर्गमित्राला यश लाभले आहे. डहाणू प्रांतातील ऐतिहासिक डोंगरी दुर्गात सेवगा किल्ल्याचा समावेश असून हा किल्ला डहाणू मधील करंजविरा गावातील एका निमुळत्या वैशिष्ट्यपूर्ण टेकडीवर वसलेला आहे. स्थानिक पातळीवर या दुर्गास सेगवा या नावाने ओळखले जाते. हा किल्ला शिवकाळ व पेशवेकाळ दोन्हींचा इतिहास जपत आहे.
किल्ले वसई मोहीम परिवार अंतर्गत ६ जुलै (आषाढ शु ११ रोजी) सेवगा किल्ल्यावर अभ्यास शोध चिकित्सा भटकंती पूर्ण करण्यात आली. उत्तर कोकण प्रांताचे इतिहास इतिहास अभ्यासक व किल्ले वसई मोहीमेचे प्रमुख श्रीदत्त नंदकुमार राऊत यांनी १० ऑक्टोबर २०२३ रोजी संकलित केलेल्या कागदपत्रांत नमूद केलेल्या ऐतिहासिक नोंदीची चिकित्सा करण्यासाठी दुर्गमित्र गडावर पोहोचले. या अभ्यास मोहिमेचा प्रमुख उद्देश गडावरील ऐतिहासिक देवतांचा शोध, स्थान निश्चिती, अवशेष पडताळणी हा होता.
श्रीदत्त राऊत यांनी जवळपास दीड वर्ष सदर मोडी कागदपत्रे अभ्यासून सेवगा वरील चार पेशवेकालीन दैवते नोंदी संकलित केल्या. यात श्री अमृतेश्वर, श्री सेवगाई, चेडोबा, म्हसासुर या चार देवतांचे संदर्भ प्राप्त झाले. यापैकी या गडावर महादेवाचे मंदिर आहे. कागदपत्रांत महादेवाचे नाव श्री अमृतेश्वर असल्याच्या नोंदी उपलब्ध झाली आहे.
या मोहीमेत राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली चेडोबा दैवताचे स्थान निश्चित करण्यात दुर्गमित्र प्रतिक भायदे वसई याची महत्वाची भूमिका ठरली. किल्ल्याच्या सुट्या डोंगर माचीच्या खालील अंगास बेचक्यात अगदी सावधगिरीने उतरून प्रतिक भायदे यांनी एका अनगड शिळेवरील चेडोबा देवतेची आकृती निदर्शनास आणून दिली.
या मोहिमेत दुर्गमित्र श्रीदत्त राऊत, प्रीतम पाटील, स्नेहा पाटील, समीर पाटील, हिंदवी पाटील उपस्थित होते. गेली अनेक वर्षे गडाच्या माचीच्या खालील अंगास अगदी निर्जन ठिकाणी (पारंपरिक रूढी, व्यवस्थेनुसार) असणारा चेडोबा (देवीचा संरक्षक शक्ती तत्व) ओळखण्यात दुर्गमित्रांना यश आले. विशेष म्हणजे या शिळेचे अध्ययन करताना दुर्गमित्रांनी अनेक सुक्ष्म निरिक्षणे नोंदवून ठेवली. महाराष्ट्र प्रांतातील लोकसमजुती प्रमाणे सदर देवता भूत पिशाच्च म्हणून ओळखली जाते, पण अभ्यासकांच्या मते मात्र तसे मुळात नसून पौराणिक कालखंडात आदिशक्ती महाकालीचे दैत्य, असुरांसोबत युद्ध झाले तेव्हा महाकालीच्या सहाय्याकरता महादेवाने आपले शक्तिशाली सैन्य पाठवले होते ते सैन्य म्हणजेच चेडा. देवीचा संरक्षक व साहाय्यक या भूमिकेतून त्याचे स्थान देवीच्या जवळपास असते.
पालघर जिल्ह्यातील विविध प्राचीन देवता, देवालये यांची हजारो मोडी लिपी पत्रे श्रीदत्त राऊत गेली अनेक वर्षे सातत्याने संशोधन करीत आहेत. त्यात उपलब्ध पत्रांचा चिकित्सक अभ्यास करून प्रत्यक्ष भटकंतीने नवा इतिहास पुढे आणत आहेत. सेवगा गडाच्या दैवतांच्या सविस्तर तपशील नोंदी त्यांच्या आगामी संशोधनपर पुस्तकात प्रकाशित होत आहेत.
पालघर जिल्ह्यातील दुर्गांवर भुईसपाट झालेल्या अनेक वास्तू अवशेष आजही संवर्धन, संशोधनाची वाट पाहत आहेत. प्रत्यक्ष भटकंती माध्यमातून वेळोवेळी नवीन परिमाणे संशोधित करून पुढे आणणे हीच इतिहास सेवा ठरणार आहे. – प्रीतम पाटील, दुर्गमित्र नावझे
“ऐतिहासिक सेवगा गडावरील दैवतांची स्थान निश्चिती व शोध मोहीम ही अत्यंत महत्वाची बाब कागदपत्रे माध्यमातून बोलकी झाली, या गोष्टीचा उपयोग करून दुर्गमित्रांनी गडाचा सातत्याने अभ्यास करणे आवश्यक आहे.” – समीर पाटील दुर्गमित्र, बोईसर