जिल्हा परिषदेत शिवसेनेच्या दोन जागांमध्ये वाढ तर राष्ट्रवादीची पिछेहाट, भाजपला पंचायत समितीत लाभ

जिल्हा परिषद, पंचायत समिती पोटनिवडणूक

पालघर: पालघर जिल्ह्य़ातील १५ जिल्हा परिषद व १४ पंचायत समितीच्या जागांसाठी झालेल्या पोटनिवडणूक निकालात प्रमुख पक्षांना यशाचा आनंद घेताना, अपयशाच्या दु:खालाही सामोरे जावे लागले आहे. शिवसेनेने जिल्हा परिषदेत दोन जागांची कमाई केली असली तरी पंचायत समितीत तीन जागांवर त्यांना फटका बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्हा परिषदेत दोन जागा गमावल्या असल्या तरी पंचायत समितीत वाढलेल्या एका जागेचे समाधान त्यांच्या पदरी पडले आहे. भारतीय जनता पक्ष व कम्युनिस्ट पक्षाने आपले संख्याबळ राखले असून भाजपच्या पंचायत समितीत दोन जागा वाढल्या आहेत.  

नागरिकांचा मागास प्रवर्ग जागांसाठी असलेले आरक्षण ५० टक्क्य़ांपेक्षा अधिक होत असल्याने सर्वोच्च न्यायालयाने या आरक्षणामधून निवडून आलेल्यांचे सदस्यत्व रद्दबातल ठरवले होते. त्यामुळे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सात, भाजपच्या चार, शिवसेनेच्या तीन व कम्युनिस्ट पक्षाची एक जागा रिक्त झाली होती. तर पंचायत समितीत शिवसेनेची आठ, राष्ट्रवादी काँग्रेसची भाजप, बहुजन विकास आघाडी आणि अपक्ष प्रत्येकी एक, तर मनसेच्या दोन जागा रिक्त झाल्या होत्या. रिक्त जागांवर झालेल्या पोटनिवडणुकीत ५ ऑक्टोबर रोजी झालेल्या मतदानाचा निकाल बुधवारी जाहीर झाला. निवडणुकीची मतमोजणी तालुकानिहाय करण्यात आली. यामध्ये जिल्हा परिषदेत शिवसेनेने सावरा-एम्बुर व नंडोरे देवखोप (पालघर), मोज व पालसई (वाडा) तसेच पोशेरा (मोखाडा) अशा पाच जागांवर विजय मिळवला आहे. जिल्हा परिषदेच्या गतवेळच्या सदस्य संख्येमध्ये शिवसेनेने दोन जागांची भर घातली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे वाडा तालुक्यातील अबिटघर, गारगाव व मांडा तसेच कासा (डहाणू) येथील उमेदवार विजयी झाले असून, मोखाडा तालुक्यातील आसे येथील राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत अपक्ष उमेदवार विजयी झाला आहे. मात्र दोन जागांवर त्यांना फटका बसला आहे. भाजपने डहाणू तालुक्यातील बोर्डी, सरावली व वनईसह विक्रमगड तालुक्यातील आलोंडे जागेवर विजय मिळवला आहे. कम्युनिस्ट पक्षाने तलासरी तालुक्यात उधवा येथील जिल्हा परिषद जागा राखली आहे. 

महाविकास आघाडीमधील घटक पक्ष असलेले शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस हे अनेक ठिकाणी लढतीमध्ये होते. तसेच याच पक्षांचे लोकप्रतिनिधी प्रचारात कार्यरत होते.  निवडणुकीच्या प्रचारादरम्यान विविध स्थानिक समस्यांबाबत आश्वासनांची खैरात केल्याचे दिसून आले. एका अर्थाने सत्तेत असलेल्या लोकप्रतिनिधींनी गेल्या दोन वर्षांंच्या काळात आपल्या हातून ग्रामीण भागांतील अनेक समस्या सोडविण्यास अपयश आल्याची जणू कबुली निवडणुकीच्या प्रचारादरम्यान दिली.

सत्ताधाऱ्यांकडून आश्वासनांची खैरात

महाविकास आघाडीमधील घटक पक्ष असलेले शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस हे अनेक ठिकाणी लढतीमध्ये होते. तसेच याच पक्षांचे लोकप्रतिनिधी प्रचारात कार्यरत होते.  निवडणुकीच्या प्रचारादरम्यान विविध स्थानिक समस्यांबाबत  आश्वासनांची खैरात केल्याचे दिसून आले. एका अर्थाने सत्तेत असलेल्या लोकप्रतिनिधींनी गेल्या दोन वर्षांंच्या काळात आपल्या हातून ग्रामीण भागांतील अनेक समस्या सोडविण्यास अपयश आल्याची जणू कबुली निवडणुकीच्या प्रचारादरम्यान दिली.

खासदार पुत्राचा पराभव

पालघरचे खासदार राजेंद्र गावित यांनी शिवसेना पक्षश्रेष्ठींकडे आपले वजन वापरून त्यांच्या चिरंजीवासाठी डहाणू तालुक्यातील वणई जिल्हा परिषद जागेची उमेदवारी मिळवली होती. या निवडणुकीत स्थानिक विरुद्ध बाहेरचा उमेदवार असा प्रचार सामना रंगला असताना प्रमुख पक्षांनी ही जागा अत्यंत प्रतिष्ठेची केली होती. रोहित गावित यांच्याविरुद्ध स्वपक्षांबरोबर आदिवासी एकता परिषद, भूमी सेना तसेच जिजाऊ संघटनेने मोर्चा उघडला होता. या निवडणुकीत रोहित गावित तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले. इतकेच नव्हे तर दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या वर्षां वायडा या स्थानिक काँग्रेसचा उमेदवारापेक्षा खासदार पुत्र यांना ८८६ मते कमी पडली, तर विजयी उमेदवार भाजपचे पंकज कोरे यांच्यापेक्षा १२९८ मतांनी पिछाडीवर पडून गावित पुत्र यांचा दारुण पराभव झाला. विशेष म्हणजे वणई गटातील निवडणुकीसाठी शिवसेनेचे ना. एकनाथ शिंदे, दादा भुसे, आमदार रवींद्र फाटक, राष्ट्रवादी काँग्रेसचे ना. जितेंद्र आव्हाड, नवाब मलिक, आमदार सुनील भुसारा, भाजपचे आमदार रवींद्र चव्हाण इत्यादी दिग्गजांनी या मतदारसंघावर लक्ष केंद्रित केले होते. या ठिकाणी सर्वच उमेदवारांनी जणू पैशाचा पाऊस पाडल्याचा आरोप होत होता. तरीदेखील स्थानिक उमेदवार या मुद्दय़ावर निवडणुकीचा निकाल लागल्याचे दिसून आले.

पंचायत समितीत शिवसेनेचे अपयश

पंचायत समितीच्या १४ जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत शिवसेनेला पाच जागा मिळाल्या आहेत. त्यांच्या गतवेळचे संख्याबळ पाहता तीन जागांमध्ये त्यांची घट झाली आहे. रद्द झालेल्या पंचायत समिती जागांमध्ये शिवसेनेकडे आठ सदस्यांचा समावेश होता.  भाजप व बहुजन विकास आघाडी या दोन्ही पक्षांना प्रत्येकी तीन जागा मिळाल्या आहेत. याच बरोबरीने राष्ट्रवादी काँग्रेसला दोन, तर मनसेचा उमेदवार एका ठिकाणी विजय झाला आहे. पालघरमध्ये असलेल्या सहा सदस्यांपैकी शिवसेनेला चार जागांवर विजय मिळवता आला. शिवसेनेकडे असलेल्या वसई तालुक्यातील दोनही पंचायत समिती जागांवर पराभव होऊन त्या ठिकाणी बहुजन विकास आघाडीने पुन्हा आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. मनसेने पालघरमधली एक जागा राखली असून वाडय़ातील एका जागेवर पराभव पत्करावा लागला आहे. तर भाजपने पालघरमध्ये दोन जागांची भर घातली. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसनेदेखील पालघर पंचायत समितीमध्ये एक जागेवर विजय मिळवला आहे.

ओबीसी हा मुद्दा नाही

नागरिकांचा मागास प्रवर्ग आरक्षणाच्या मुद्दय़ावर रिक्त झालेल्या जागांवर याच ओबीसी समाजाचे उमेदवार देण्याचे प्रथम सर्वच राजकीय पक्षांनी भूमिका घेतली होती. मात्र अनेक जागांसाठी बिगर ओबीसी व काही ठिकाणी चक्क आदिवासी उमेदवार दिल्याचे दिसून आले आहे. निवडणूक ओबीसी मुद्दय़ावर लढवली गेली नसल्याचे निवडणूक निकालावरून दिसून आले.

विजयी उमेदवार जिल्हा परिषद 

* बोर्डी — ज्योती प्रशांत पाटील (भाजप)

* सरावली — सुनिल दामोदर माच्छी (भाजप)

* वनई —  पंकज दिनेश कोरे (भाजप)

* कासा — लतिका लहू बालशी (राष्ट्रवादी कॉंग्रेस)

* उधवा — अक्षय प्रवीण दवणेकर (कम्युनिस्ट पक्ष)

* आसे — हबीब अहमद शेख (अपक्ष)

* पोशेरा — सारिका प्रकाश निकम (शिवसेना)

* सावरा—ऐंबूर — विनया विकास पाटील (शिवसेना)

* नंडोरे—देवखोप — निता समीर पाटील (शिवसेना)

* आलोंडे — संदीप दूंदू पावडे (भाजप)

* मोज— अरुण शांताराम ठाकरे (शिवसेना)

* मांडा— अक्षता राजेश चौधरी (राष्ट्रवादी कॉंग्रेस)

* गारगाव — रोहिणी रोहिदास शेलार (राष्ट्रवादी कॉंग्रेस)

* पालसई — मिताली मिलिंद बागूल (शिवसेना)

* आबिटघर — भक्ती भाई वलटे (राष्ट्रवादी कॉंग्रेस)

पंचायत समिती  डहाणू :

* ओसरवीरा : स्वाती विपुल राऊत (राष्ट्रवादी काँग्रेस)

* सरावली: अजय वाल्या गुजर (भाजप)

वाडा :

* सापने—बुद्रुक : दृष्टी दीपेन मोकाशी (शिवसेना)

पालघर तालुका:

* नवापूर: मिलिंद ज्ञानेश्वर वडे (शिवसेना)

* सालवड: मेघा विपुल पाटील (भाजप)

* सरावली: ममता विलास पाटील (शिवसेना)

* सरावली: रेखा दिलीप सकपाळ (भाजप)

* मान: तृप्ती योगेश पाटील (मनसे)

* शिगाव खुताड:अनिल अनंत काठय़ा (बविआ) बऱ्हाणपूर: किरण पद्मकर पाटील (शिवसेना) ढाण: कमळाकर रामचंद्र अधिकारी (शिवसेना)

* नवघर घाटीम: कामिनी रमेश पाटील (शिवसेना)

वसई

* भाताने: अशोक आत्माराम पाटील (बविआ) तिल्हेर: गिता गुरुनाथ पाटील (बविआ)

पंचायत समिती (जागा १४)

पक्ष          पं.स रद्द जागा        प. स निकाल  

शिवसेना             ८                  ५

राष्ट्रवादी             १                  २

भाजप              १                   ३

कम्युनिस्ट          ०                ०

बविआ              १                  ३

काँग्रेस              ०                  ०

अपक्ष               १                  ०

मनसे               २                  १